Skip to main content

भोग आणि ईश्वर २७४

भोग आणि ईश्वर  २७४

वास्तविक आपण सुरवात, ईश्वराच्या  आराधनेला  नाम घेत लगोलग त्याच्या स्मरणाने करतो आणि इथेच आपण खरतर चूक करतो. आपल्या मनाला अनेक वर्षे सवय नसते, त्यात सध्याची व्यवधानं, व्याप, व्यस्तता इतकी आहे की, नामस्मरण सुरू करा असं म्हणणं आणि नामस्मरणाची गोडी लागणं, यात खूप अंतर आहे. अर्थात असंही म्हटलं जातं की, एकदा सुरू करा , गोडी त्यामागून आपोआप येईल. 

पण याबाबतीत माझं मत थोडं वेगळं आहे. मनाला त्याबद्दलची ओढ लगेच लागली नाही किंवा मन त्यात गुंतलं नाही तर चांगली गोष्ट वा सवय किंवा उपासना व साधना असूनही, मधेच सुटण्याची शक्यता आहे. याचबरोबर त्यातून अवेळी मनाची निवृत्ती होण्याची शक्यता आहे आणि असं झाल्यास वृत्तीतील अनिष्ट प्रवृत्ती जास्त जोरात डोकं वर काढण्याची शक्यता आहे. याच करता आपण दोन भागात बघितलं त्याप्रमाणे आधी श्रवण, मनन, चिंतन, श्रवण केलेला नामाचा, प्रार्थनेचा, कल्पनेतील नादाचा  आनंद अनुभवण्याची सवय व गोडी एकदा लागत गेली की, तद्नंतर नामाकडे त्याला हळूहळू वळवता येईल, असं माझं प्रामाणिक मत आहे. 

मुळात जन्माला येण्याआधी आणि मागील जन्मातील देह सोडल्यानंतर, चैतन्यरूपात वास करत असताना, सर्वच गोष्टी स्मरणात, जाणिवेत, ध्यानात व ज्ञानात असतात. पण देहात आल्यानंतर आपण मागील सर्व विसरून जातो आणि देहाच्या ज्ञानेंद्रियांना जे दिसतं, त्याची जी जाण मेंदूमार्फत बुद्धीला व त्यामार्फत जाणिवांना पोचते, तेच आणि तितकंच ज्ञान आपण ग्रहण, आत्मसात आणि ज्ञात करतो. अर्थात यात कोणता दोष वा आरोप नाहीच. 

एक साधं उदाहरण घ्या श्रीकृष्णाने जन्मतः ज्या आईला पाहिलं, तिलाच माता म्हणून मानलं. पण ईश्वर असल्याकारणाने, सर्वज्ञ म्हणून हे नक्कीच माहीत होतं वा असणार की,खरी जन्मदात्री आई कोण आहे. त्यानंतर सर्व जन्म त्याने माता देवकीला सोबत ठेवलं, यशोदा आणि नंदराय यांना,गोकुळ सोडल्यानंतर अथवा द्वारकेला आल्यानंतर सोबत नेलं नाही. याचा आपल्याला मानव म्हणून अचंबा वाटतो. पण यातून त्याने दिलेला बोध खूप महत्वाचा आहे, असं मला वाटतं. 

श्रीकृष्णाचा संपूर्ण जीवनप्रवास व त्यातील प्रत्येक टप्पा  हा मला एकेका जन्मासारखा भासतो. तो जर त्याच दृष्टीने पाहिला तर लक्षात येईल की, आयुष्याचा एक टप्पा सरल्यावर त्याने त्याकडे नन्तर वळूनसुद्धा पाहिलेलं नाही. म्हणजेच मोहाचे किंवा भावनिक गुंता होण्याचे व त्यातून व्यक्तित्वाच्या संघर्षाचे प्रसंग हेतुपुरस्सर टाळलेले दिसतात. जसं एकदा वृंदावन, गोकुळ, मथुरा सोडल्यानंतर, त्या त्या ठिकाणी पुनः कधीही न जाणं. एखादी व्यक्ती वा टप्पा, आयुष्यातून वजा केल्यानंतर वा वजा करावा लागल्यानंतर, त्याने आपलं भावनिक क्षेत्र मर्यादित राहील, याची काळजी घेतली. 

आपण वास्तविक त्याच संघर्षाची बीज रोवून, मूळ उद्देशांना विसरून भावनिक संघर्षात गुंततो, जे आपल्या प्रकृतीच्या विरुद्ध आहे. इतिहासात ज्यांनी ज्यांनी भावना व कर्तव्य यात कर्तव्य श्रेष्ठ मानलं आणि विनाकारण गुंता केला नाही, त्यांनी त्यांनी, आयुष्यात अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत. म्हणून आपण सुद्धा भावनिक संघर्ष टाळून कर्तव्याला श्रेष्ठत्व व ज्येष्ठत्व द्यायला पाहिजे. 

म्हणून आपलं उद्देश आत्मप्राप्ती हेच असलं पाहिजे. पण त्यासाठी  जन्मतः आपण देह हाच श्रेष्ठ, हा बोध जाणिवांना दिला, तो हळूहळू मन, बुद्धी यातून काढून, त्याजागी आत्मा हा श्रेष्ठ ही जाणीव जागी करण्याचा प्रयत्न करत राहिलं पाहिजे. मला असं वाटतं की, आपला या देहात आल्यानंतरचा जीवनाचा प्रवास हा देह, देहाने प्राप्त ज्ञानेंद्रिय, त्यातून प्राप्त झालेल्या स्थूल जाणिवा, यांच्यापासून ते आत्म्याची जाणीव व बाह्य पंचेंद्रिय व ज्ञानेंद्रिय यांना आत वळवून, आत्मज्ञानाच्या जाणीवा जागृत करण्याकडे वाटचाल, असा सुक्ष्माकडे, असला पाहिजे. 

थोड्या गहन विषयात जात आहोत, म्हणून आज इथेच थांबून, उद्या या विषयात, जरा आत जाऊन, सोप्प्या पद्धतीने आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया. पण ते साध्य होण्यासाठी आवश्यक तयारी नामानेच येईल, म्हणून ते घेत रहा. 

उद्या हाच मुद्दा व विषय पुढे नेऊ, तोपर्यंत श्रवण, मनन, कल्पना आनंद आणि स्मरण याचा अनुभव घेत रहा. 

भाग २ ची नोंदणी आजच सुरू केली आहे. ३० ऑगस्ट रोजी पुस्तक प्रकाशित होईल आणि त्यानंतर लगेच कुरियर होईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०). 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख आहेत. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.  श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
३१/०८/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...