Skip to main content

भोग आणि ईश्वर २५५

भोग आणि ईश्वर २५५

काल आपण पाहिलं की, मनाच्या परिघातून, नकार, विकार व अनिष्ट विचार पुसून टाकले की, मनाचा आरसा स्वच्छ होतो. खरतर एखादा आरसा पुसायला, स्वच्छ कपडा हवा आणि तो कपडा नित्य स्वच्छ करत राहणं सुद्धा आवश्यक आहे. अन्यथा एका काळानंतर त्या कपड्याची घाण आरशाला लागायची आणि आरसा स्वच्छ होण्याऐवजी, अजूनच अस्वच्छ व्हायचा.

म्हणजे व्यवहारात हे तंत्र आपण कोणतीही वस्तू स्वच्छ करायला वापरतो. मग मन,बुद्धीआणि आत्म्या यांच्या बाबत हे तंत्र का नाही वापरायचं. नव्हे तंत्र हेच वापरायचं आहे, पण इथे कापड नसेल तर, एक असं माध्यम प्रत्यक्ष ईश्वराने निर्माण केलं आहे की, ज्याच्या योगे आपण मन बुद्धी आणि आत्मा या तिन्हींची शुद्धता साधू शकतो.

ते तंत्र काळाच्या कोणत्याही कसोटीवर आणि युगांच्या कोणत्याही स्थितीत अनंत पापांची रास, लीलया स्वच्छ करून मन, बुद्धी व आत्मा यांना लख्ख करून, उजळून प्रकाशमान करून देतं. त्या तंत्राचं नाव आहे, सद्गुरू आणि त्यांची कृपा. या गुरुचरणांना वंदून, त्यावर नीत लवून आणि शरण राहून, आपली साधना करत राहणं, इतकंच आपलं कर्म आहे.

या एकाच कर्माचं फळ अनंत रुपात, अनंत क्षणात, अनंत जन्मात प्राणी नित्य प्राप्त करू शकतो. परंतु यात कोणताही किंतु, परंतु वा हेतू असता कामा नये. असा किंतु असणं म्हणजे पूर्ण शरण न जाणं आणि पूर्ण श्रद्धा न साधणं. असा किंतु असणं म्हणजे, त्या आरशाला, त्यावरील आच्छादन वा पडदा यांसह पुसणं. म्हणजे जर तो आरसा त्यावरील आच्छादन अथवा पडदा न काढता पुसत राहीला, तर त्या पडद्यावरील धूळ वा अस्वच्छता पुन्हा त्या आरशावर चढत राहील आणि पुसणाऱ्याला त्या क्रियेचं पूर्ण समाधान मिळणार नाही व उद्देशसुद्धा साध्य होणार नाही.

म्हणून जे माध्यम विधात्याने निर्माण करून आपल्यापुढे मांडून दिलं आहे, त्यामागचा विधात्याचा उद्देश हाच आहे की, मनुष्य अनेक व्याप, ताप, व्यथा, द्विधा, भोग, यातना, विकार, विचार, आचार, उच्चार व माया या सर्व माध्यमा तून व कर्मातून, अनेक नकारात्मक गोष्टी, अनिष्टता यांची काजळी आणि पुटं मनावर, बुद्धीवर आणि आत्म्यावर चढवून घेतो आणि जन्मोजन्मी ती बाळगूनच जगतो आणि पुन्हा पुन्हा जन्मास येतो.

या सर्व प्रवासात त्याला मन बुद्धी आणि आत्मा या तिन्हीना स्वच्छ करून, नवनवीन कर्मासाठी आणि जुन्या कर्मदोषांना पुसण्यासाठी अथवा भोगून संपवण्यासाठी सिद्ध करत राहणं, जमेल असं नाही. किंवा त्याचं ज्ञान असेल, उपजेल, निपजेल व जमेल हे सांगता येणार नाही.

म्हणून या सर्वातून जाऊन, स्वतःला सिद्ध केलेले आणि अनेकांना सहाय्यभूत होऊ शकणारे सिद्धपुरुष या भूलोकात घडवणं, त्यांना इथे देहरूपात व नन्तर चैतन्य रूपात विहरू देणं, त्यांना अनेक जीवांचा उद्धार करण्याची शक्ती व सामर्थ्य देणं, हे कार्य नित्य करण्याचं मोठं कर्तव्य, ईश्वर या भूलोकी नित्य करत असतो.

कारण ईश्वर जरी विश्वरूप व विश्वव्यापी असला आणि सर्व प्राणीमात्रांना साध्य असला तरी, प्रत्यक्षात वा व्यवहारात तो नित्य येईलच व येऊ शकेलच हे साध्य वाटत नाही. म्हणूनच प्रत्येक प्राणीमात्राला नित्य प्राप्त होऊ शकणारं आणि मन बुद्धी व आत्मा प्रकाशित करून लाखो जीवांचा उद्धार साधू शकणारं, एक स्वप्रकाशीत व्यासपीठ विधात्याने मर्त्य मानवास सुपूर्द केलं आहे.

त्याचा सदुपयोग करून घेण्यासाठी प्राणीमात्राला मात्र गुरुचरणी स्थिर राहून, नित्य उपासना करून, गुरुआज्ञेत राहणं आणि स्वहित साधणं इतकंच करायचं आहे. यासाठी श्रद्धा आणि शरणागती या दोन गोष्टी कायम स्वरूपी लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणून गुरुचरणी स्थिर रहा नाम घेत रहा, उद्धार साधत रहा. उद्या हाच विषय पुढे नेऊ.

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लाभलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. त्याचबरोबर भोग आणि ईश्वर भाग २ चं काम पण सुरू आहे. त्याची सुद्धा घोषणा लवकरच करण्यात येईल.

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.

©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१२/०८/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...