Skip to main content

वाफाळलेला चहा आणि नाम

वाफाळलेला चहा आणि नाम

वाफळलेल्या चहाचा परिमळ अर्थात गंध दुरून जरी आला तरी मनाला प्रफुल्लित आणि प्रसन्न करतो. हा बहुतेक सार्वत्रिक अनुभव आहे. पंचेंद्रियांना जाणवणाऱ्या बाह्य गोष्टींमध्ये सर्वात उच्च म्हणजे गंधाचा अनुभव देणारी नासिका अर्थात घ्राणेंद्रिय आणि आवाजाचा प्रत्यय देणारे कर्णेद्रीय. 

याचं कारण म्हणजे डोळे उघडून एखादी गोष्ट पहावी त्यांनतर त्या दृश्याचं  ज्ञान होतं. त्वचेपर्यंत एखादी गोष्ट नेली तरच त्याच्या स्पर्शाचं  ज्ञान त्वचेला होतं आणि जिव्हेला त्यापर्यंत एखादी वस्तू नेली तरच त्याच्या चवीचं ज्ञान होतं.  पण कर्ण आणि नासिका  किंवा घ्राणेंद्रिय यांचं तसं नाही. दुरून येणाऱ्या लहरींचं ज्ञान त्या लहरी त्या इंद्रियांपर्यंत पोहोचल्या तरी त्यांना त्याचं ज्ञान होतं. म्हणजेच विश्वनिर्मात्याने जग निर्मिती करून जीवनिर्मिती करताना असे काही संकेत दिलेत ज्यायोगे प्राणी आहे त्या जागी काही गोष्टींचं ज्ञान करून घेऊ शकतो. 

अर्थातच यात शरीरातील कर्णेद्रीय आणि घ्राणेंद्रिय या सारखी ज्ञानेंद्रिय आहेत, जी कोणतीही शारीरिक हालचाली न करता, ज्ञान प्राप्त करून देऊ शकतात. पण नीट विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल कि, या  शारीरिक इंद्रियांना त्यांची मर्यादा फक्त भौतिक जगापुरती घालून दिली आहे. त्यातही शारीरिक मर्यादा आहेतच. म्हणजेच प्रत्येकाला प्रत्येक इंद्रियाचा सर्वसामान्यपणे वापर करून ज्ञान प्राप्त करून शारीरिक कार्य करण्याची शक्ती दिली आहे. तरीही याला अपवाद काही व्यक्ती आहेत ज्यांना यात मर्यादा दिल्यात. ज्या कदाचित जन्मतः असतील वा अपघाताने किंवा कर्मधर्मसंयोगाने घातल्या जातील. ज्या प्रारब्धानुसार व संचितानुसार प्राप्त होतात. 

या मर्यादा पूर्णपणे मान्य करूनसुद्धा एक विचार येतो कि, विधात्याने या मर्यादा काही जणांच्या बाबतीत आणि सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत वयोमानानुसार दिल्यात, तरीसुद्धा अशी काही इंद्रियनिर्मितीव्यवस्था  विधात्याने केली नाही का कि जी सर्वांना प्राप्त आहे, उपलब्ध आहे आणि सहजशक्य आहे. म्हणजेच हा शारीरिक भेदभाव (जो अर्थातच कर्मानुसार प्रत्येक जीवाला प्राप्त होतो), निर्माण करताना अध्यात्मिक, मानसिक स्वास्थ्यासाठी काही व्यवस्था निर्माण केली नाही का ज्यायोगे कोणताही मनुष्यप्राणी आपली त्या त्या जन्मातील उन्नती करवून या जन्मातील वा पुढील जन्मातील यात्रा सुखकर करून मोक्षप्राप्तीच्या अंतिम उद्देशाप्रत पोहोचेल. 

नक्कीच अशी व्यवस्था प्रत्येक मनुष्यप्राण्याला दिली आहे, अगदी शारीरिक मर्यादा असलेल्या व्यक्तीला देखील हा हक्क व अधिकार निर्मात्याने दिला आहे. अर्थातच त्यासाठी योजलेलं वा निर्माण केलेलं इंद्रिय म्हणजे 'मन'. हे एक इंद्रिय असं आहे कि, जे प्रत्येकाला एकसारखं देऊनच या पृथ्वीतलावर पाठवण्यात आलं. या मनाची शक्ती अद्वितीय आहे, जो कदाचित एका वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकतो, म्हणून येथे त्यावर विवेचन नको. ते मन आणि त्या मनाबरोबर भौतिक देहाला योग्य त्या सवयी लावून, विधात्याला इच्छित असलेलं उद्देश  अर्थातच आत्म्याचं परम आत्म्याशी मिलन वा संयोग घडवून आणण्याचं कार्य, प्रत्येक मनुष्यप्राणी करू शकतो. अर्थात यासाठी काही नीती व नियम हे आत्मसात करावे लागतात, ज्यायोगे मन आणि देह यांना त्या उद्देशाचा मार्ग धरून त्यावर मार्गक्रमण करता येऊ शकतं . 

अर्थातच यासाठी शास्त्र, पुराणं , वेद , ऋषीमुनी, संतमहंत यांनी अनेक म्हणजे नऊ मार्ग सांगितले आहेत. ज्यावर वाटचाल करून जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करून घेता येऊ शकते. भक्तीच्या या नऊ मार्गांचा अवलंब करून व कालानुसार व युगानुसार अंमलात आणून सिद्धी प्राप्त करून घेता येऊ शकतात. अर्थातच त्या सिद्धी अंतिम उद्देशाप्रत घेऊन जाऊ शकतात. परंतु यातील काही खडतर आहेत, काही दिसायला सोपे परंतु आचरणात आणताना त्यातील मर्यादा जाणवतात. हे सर्व जाणून यावर विचार करूनच साधुसंतांनी सर्वसामान्य संसारी जीवासाठी एक सहजसाध्य  मंत्र योजून दिला आहे वा सुचवलेला आहे. जो कोणताही मनुष्यप्राणी सहजी आचरणात आणून त्यावर मार्गक्रमण करत,  एका नाही परंतु काही जन्मात नक्कीच मोक्षप्राप्तीच्या अंतिम उद्देशाप्रती पोहोचू शकतो. 

अर्थातच तो मार्ग म्हणजे  विधात्याचं , त्याच्या कोणत्याही रूपाचं सतत केलेलं स्मरण. मुळात स्मरण हे पुन्हा निर्गुण स्वरूप आहे, लहरींवर अवलंबित आहे. ज्या लहरी मनात उत्पन्न कराव्या लागतील आणि अश्या स्मरण निर्मितीला देहाच्या व  काळाच्या मर्यादा असू शकतील. मग हे स्मरण कसे सध्या होणार. यावर देखील आपल्याला काहीही विचार करायची आवश्यकता नाही. कारण विधात्याने संतमहंत, ऋषीमुनी व विविध अवतार यांच्या माध्यमांतून गुरुपद निर्मिती करून मनुष्याला एक सूत्र हातात दिलं आहे. ते म्हणजे सद्गुरू वचन मार्गक्रमण. 

कोणतेही सद्गुरू हे आपापल्या अवतार निर्मितीच्या उद्देशानुसार, काळानुसार एका विशिष्ट तत्वाचा पुरस्कार करतात. त्या त्या सद्गुरुंचे साधक त्या त्या तत्वाचा अंगीकार करून त्यांनी घालून दिलेल्या बंधनांची, नियमांची मर्यादा पाळून जे सहज सध्या कर्म आहे ते नामस्मरणाचं सूत्र पाळून जीवनोन्नती करून घेऊ शकतात. 

म्हणजेच प्रत्येक मनुष्यप्राण्याला मनाला एका विशिष्ट संस्काराची जोड देऊन , नियमाची मर्यादित स्वरूपातील बंधनं पाळून नामस्मरणाची सवय लावून, त्याची दृढता साध्य करून, देहाच्या कोणत्याही अवस्थेत सहजसुंदर नाम घेऊन मनाचा आनंद अमर्याद वृद्धिंगत करून परमईश्वराच्या सान्निध्यात राहण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. हे इतकं सहज सध्या साधन, जे कलियुगात अमर्याद प्राप्ती करून देऊ शकतं त्याचा अंगीकार करून आपण विधात्याला इच्छित उद्देश साध्य करून घेऊ शकतो. 

म्हणून नेटाने, कशोशीने, कटाक्षाने, नियम घालून घेऊन, अष्टौप्रहर, (जे फक्त जिव्हेने वा मनाने, इतर शारीरिक कर्मे करता करतादेखील सहजी करता  येतं ), नामस्मरण करण्याचा प्रयत्न आपल्याकडून करूया. या कार्यात प्रेरणा, बल आणि यश देण्यास आपापले सद्गुरू नक्कीच समर्थ आहेत हा दृढ विश्वास आणि श्रद्धा असूद्या. 

श्रीराम जयराम जय जयराम !!!!

सदगुरुस्मरण नमोनमः !!!

प्रसन्न आठवले 
२९/०८/२०२०
०८:५१























Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...