Skip to main content

नवरात्री २०१९ माळ ३


नवरात्रातील तिसरी माळ माता चंद्रघंटा देवी

पिण्डजप्रवरारूढ़ा चण्डकोपास्त्रकेर्युता।
प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता॥

माता दुर्गेच्या तिसऱ्या स्वरूपाचं नाव चंद्रघंटा देवी आहे. अत्यंत निर्मळ पवित्र स्वरूप आहे चंद्रघंटा देवीचं. देवी शांतस्वरूप आहे. देवीच्या मस्तकी घंटेच्या आकाराची चंद्रकोर आहे म्हणून देवीच्या या रुपाला चंद्रघंटा हे नाव मिळालं. देवीला दहा हात असून प्रत्येक हातात खड्ग , त्रिशूळ आदी अस्त्र शस्त्र असून डाव्या हातात कमंडलू आहे. देवीची वर्णकांती सुवर्णासमान असून देवी सिंहारुढ आहे. तिची ही मुद्रा युद्धासज्ज आहे. परंतु भक्तांसाठी हे स्वरूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे.

देवीच्या आराधनेने व साधनेने साधक अलौकिक शांती आणि सुखाचा अनुभव घेतो. देवीची साधना पाप आणि इतर बाधा यांचं निवारण करते. देवीची साधना शीघ्र फलदायी आहे. देवी भक्तांच्या हाकेला त्वरेने धावून येते असा तिचा लौकिक आहे. या देवीचे साधक सिंहाप्रमाणे पराक्रमी, निर्भय आणि निश्चिन्त होऊन जातो. देवीचं ध्यान केल्याने घंटानाद होऊन बाह्य बाधे पासून भक्त रक्षिला जातो. देवीच्या मस्तकावर असलेल्या घंटानंदाने समस्त असुर पिशाच्च इत्यादी थर थर कापतात , भयकंपित होतात.

देवीच्या साधनेने भक्त निर्भयता व विरता यांचा अनुभव करतो. परंतु त्याचसोबत विनम्रता व सौम्यता यांचाही विकास होतो. देवीच्या कृपेने व साधनेने भक्तांच्या मुख, नेत्र व काया यावर एक दिव्य तेज व कांतीची झळाळी पाहायला मिळते. देवीचे भक्त जिथे जातील तिथे लोकांना परम शांतीचा अनुभव येतो. आराधकांच्या शरीरातून दिव्य परमाणूंचा उत्सर्ग होतो.जो साधारण डोळ्यांना दिसत  नाही. परंतु अश्या साधकांच्या संपर्कात येणारे या गोष्टीचा अनुभव करू शकतात.

देवीची महती थोर आहे. तिचं गुणगान करायला शब्द अपुरे आहेत. तरीही देवीचं गुणगान खालील प्रार्थनेने करूया

शीघ्र फलदायी तू साधका तारिसी
घंटारूप अर्धचंद्र मस्तकी धारिसी
कांती तव सुवर्ण भक्तीने पावसी
भक्तांच्या हाकेला अतिवेगे धावसी ll
जयदेवी चंद्रघंटा तव रूपे भारिसी

सिंहारुढ तव स्वरूप दशभुजा देवी
अस्त्रांनी शस्त्रांनी सज्ज तव मूर्ती
निजभक्ता रक्षाया येसी ही कीर्ती
पापाचा मेरूही सहजी तू पाडसी ll
जयदेवी चंद्रघंटा तव रूपे भारिसी

गांजले भक्तगण ब्रीद राखी आपुले
साधका दिव्यत्व तव भक्तीने दिधले
सुखशांती समाधान मिळवून तरले
ऐश्या या स्वरूपाची प्रचिती दाविसी ll
जयदेवी चंद्रघंटा तव रूपे भारिसी

आईच्या शीघ्र फलदायी कीर्तीचा अनुभव घेऊन भक्तिरसात न्हाऊन जाऊया.

जय देवी चंद्रघंटा !!! 🌹🌹🌹

©® लेखन आणि काव्य : प्रसन्न आठवले
०१/१०/२०१९
माळ तृतीय अर्पण !!!  🚩🚩🚩🌷🌷🌷

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...