Skip to main content

पार्वतीचं बाळ - श्रीगणेश आगमनाप्रीत्यर्थ , कैलासावरील आंखोदेखा हाल

पार्वतीचं बाळ - श्रीगणेश आगमनाप्रीत्यर्थ, कैलासावरील तयारीचा आंखोदेखा हाल

कैलासावर लगबग लगबग सुरू आहे. खरतर प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी तोच गोंधळ , तीच धावपळ, त्याच त्याच चुका गणांकडून होत आहेत. पण गजाननाची स्वारी सजण्यात नटण्यात आणि बागडण्यात मग्न असल्यामुळे त्याचं या गोंधळाकडे लक्षच नाहीये. काही गण बाप्पाला तर काही गण मूषकाला सजवण्यात मग्न आहेत. एरवी मूषकाला फार किम्मत न देणारे गण आज मूषकाचे नखरे सांभाळता सांभाळता मेटाकुटीला आलेत.

कारण गणेशाने तसा दमच दिलाय. पूर्ण दहा दिवस तोच एकटा साथीला आहे. त्यामुळे तो नाराज होईल असं कोणतंही काम कुणीही करायचं नाहीये. गाठ माझ्याशी आहे आणि हे मूषकाने ऐकल्यापासून तो आपले सर्व लाड पुरवून घेतोय. अगदी शेपटीपासून नाकाच्या शेंड्यापर्यंत सर्व अंगावर दाग दागिने,  पाठीवर झुल, डोक्यावर छोटासा मुकुट, गळ्यात कंठीमण्याची माळ, पायात छोटे छोटे घुंगरू लावलेले वाळे, शेपटीला सोन्याची चेन, कपाळावर अबीर, अष्टगंध आणि शेंदूर यांचं उभं गंध आणि त्यावर एक सुंदरसं पदक. हे सर्व घातलं नाहीये, थांबा , हे सर्व घालण्यासाठी गणांची होणारी धावपळ बघून बालगणेश अगदी हसून हसून लोळत होता. त्यामुळे मूषकाला अजून चेव येत होता.

अश्याप्रकारे एकदाचा हातापाया पडून गणांनी मूषकाला सजवला. पण पुढचं कार्य अजून कर्मकठीण होतं. मस्ती खोर , व्रात्य  अत्यंत चलाख , चतुर, तूंदिल तनु असून चपळ साजिरी मूर्ती असलेल्या बाळ गणेशाला सजवून पार्वती मातेसमोर उभा करणं. खरतर हे काम माता म्हणून पार्वती देवीने करणं गरजेचं आहे. पण बाळ गणेशाच्या विरहाने प्रतिवर्षीप्रमाणे व्यथित आणि दुःखी झालेल्या मातेने स्पष्ट नकार दिला असल्यामुळे हे काम भगवान शंकरांनी गणांना दिलंय हे सांगून की, मोरेश्वराची काहीही तक्रार येता उपयोगी नाही , अन्यथा पार्वतीचा कोप सहन करावा लागेल त्याला.

अर्थातच या गोष्टीचा मूषकाप्रमाणेच गिरिजात्मजानेदेखील लाभ उठवून गणांना पार सळो की पळो करून सोडलंय. चपळ शरीर पण उत्तम शरीरसंपदा लाभलेल्या विघ्नेश्वराला प्रस्थानासाठी पूर्ण तयार करण्यात गणांचा अवघा अर्धा दिवस गेला. इकडे हे सर्व चालू असताना या गडबडी पलीकडे कैलासावर शिव पार्वती वेगळ्याच विवंचनेत आहेत. बघूया तरी काय चालू आहे.

शिव : उमे काय हा वेडेपणा, प्रतिवर्षीप्रमाणे.

पार्वती : मुळात तुम्ही प्रतिवर्षी जायची अनुमती देताच का कळत नाही मला, तेही चांगलं दहा दिवस. माता म्हणून माझ्या काळजाचं काय होत असेल ते तुम्हा निष्ठुर हृदयाला समजणार नाही.

शिव : तस नाही.  पण विचार कर की आज करोडो भक्तगण मोठ्या उत्साहात जय्यत तयारी करून बाळ बल्लाळेश्वराच्या आगमनाची प्रतीक्षा करत असतात. त्या सर्व भक्तांचा किती विरस होईल. त्यात गजानन म्हणजे बाळ गोपाळांचा आवडता. बिचारे किती उत्साही असतात त्या दहा दिवसांत.  काय होईल त्यांच्या मनाची अवस्था.  तुंही एक माता आहेस , तुला समजून घेता येईल.

पार्वती : हे खरं असलं तरी मी पण एक माता आहे. दहा दिवस माझ्या डोळ्याला डोळा लागत नाही. तुम्ही बसणार समाधी लावून कैलासावर. तुम्हाला काहीच फरक पडणार नसतो. कसं समजेल तुम्हाला. त्यात आता किती धोके वाढलेत पृथ्वीवर प्रदूषण, घातपात , महागाई, कर्णकर्कश आवाज, इतर अनेक चिंता या सगळ्यात माझा बाळ दहा दिवस कसा राहील हीच चिंता लागून राहिली आहे मला.

शंकर हसून वदतात

" उमे मला सांग तू तर विश्वामाता आहेस आणि सिद्धीदाता, विघ्नहर्ता , एकदंत हा तर सर्व विघ्नांचा त्राता आहे. असं असताना त्याला कसली आहे भीती. म्हणून व्यर्थ चिंता सोड. साक्षात चिंतामणीची माता आहेस तू.  तो प्रसन्न होऊन शुभाशीष देऊन पूजा नैवेद्य स्वीकृत करून यथासांग पाहुणचार घेऊन लवकर येईलच. त्यांनतर एका पक्षापश्चात तुलाही तिथे जायचय नऊ दिवस आहे ना लक्षात. तेंव्हा सुहास्य वदने निरोप दे गणरायाला. बाकी सर्व सुरळीत पार पडण्यास श्रीगणेश समर्थ आहे. फक्त माता म्हणून तुझा हात पाठीशी असुदे त्याच्या, म्हणजे तुझ्या मागे मी पण आहेच उभा. "

पार्वती लटक्या रागाने

" मला माहीत होतच तुम्ही असं काही सांगून माझी प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी मनधरणी करून तयार करालच. आता काय, येते मी , बघते या गणांनी काय काय गोंधळ घातलाय माझ्या बाळांना सजवण्यात."

शिव : बाळांना ?

पार्वती : हो मूषक तो ही गणेशा इतकाच द्वाड आहे, पण बाळच आहे तो माझा. येते मी."

इतकं बोलून हास्यवदनी पार्वतीच्या हास्यात स्वये सदाशिव सुद्धा सामील होतात.

गणपती बाप्पा मोरया !!

मंगलमूर्ती मोरया !!!

©® कल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
३१/०८/२०१९
१०:२३

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...