Skip to main content

बंगाल न भूतो निवडणूक निकाल !!! १

बंगाल न भूतो निवडणूक  निकाल !!!

राजकीय पुनरुत्थानाचं घडामोडींचं आणि घटनांचं केंद्र वा उगमस्थान , इतिहासात मुख्यतः बंगाल , महाराष्ट्र आणि पंजाब होतं. कदाचित तिथल्या लोकांची मानसिकता बंडखोरवादी वा परिस्थिती झुगारून देण्याची वा अन्यायाचा प्रतिकार करण्याची असावी.

सद्यस्थितीत म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारतात बंगाल हा अनेक घडामोडींचा प्रदेश राहिला आहे. प्रस्थापित काँग्रेस राजवट झुगारून सत्तावीस वर्ष कंम्युनिस्ट पक्षाला सत्ता देणारा प्रांत अचानक ममता बानोच्या तृणमूल पक्षाला सत्ता सुपूर्द करू शकतो.

स्वातंत्र्यपूर्व काळातसुद्धा अनेक देशभक्त या देशाला देणारा प्रांत आहे बंगाल. विशेषतः क्रांतिकारी विचारधारेच्या प्रवाहात असताना सुद्धा रवींद्रनाथ टागोर, बँकिंमचंद्र चटोपाध्याय , मानवेन्द्रनाथ बॅनर्जी, जगदीशचंद्र बसू यांच्यासारखे थोर विचारवंत देता झाला. सुभाषबाबूंसारखा धडाडीचा राष्ट्रीय नेता , ज्यांना काँग्रेसचे अध्यक्ष असताना निव्वळ गांधी आणि नेहरू यांना पसंत नाही , यास्तव बहुमताने मिळालेलं अध्यक्षपद सोडून सशस्त्र लढ्याचा वेगळा मार्ग अवलंबावा लागला. पण अनेक अग्निदिव्यातून त्यांनी तो तडीस नेऊन दाखवला. त्यासाठी जगभर प्रवास आणि संपूर्ण आयुष्य परवड झाली. असो.

आज हे सर्व आठवण्याचं खूप महत्वाचं कारण म्हणजे या निवडणुकीतून होणारं पपश्चिम बंगालचं अजून एक पुनरुत्थान. हे पुनरुत्थान सर्वस्वी आगळं आणि रोमांचकारी असेल. माझ्या स्वतःच्या राजकीय अनुमानानुसार भाजपाच्या यशात खूप मोठा आणि मनाचा तुरा हा येथून खोवला जाईल. हा विजय इतका अनपेक्षित विरोधकांना असेल, तितकाच तो भाजपाला सुखद धक्का देणारा असेल. मी आतापर्यंतच्या मोदींच्या सभा , दौरे, प्रचारयात्रा बघूनच हे अनुमान काढलंय.  याचं खूप महत्वाचं कारण ममता बानोमुळे झालेलं हिंदू मतांचं प्रचंड ध्रुवीकरण. हे ध्रुवीकरण पाण्याच्या पृष्ठभागावर जितकं अपेक्षित दिसतं त्याच्या कितीतरी पट पृष्ठभागाखाली आहे, तेथील सध्याच्या दहशतवादी वातावरणामुळे.

माझ्या अंदाजानुसार उत्तरप्रदेश मधल्या २०१४ व विधानसभेतील २०१५ सालच्या विजयापेक्षा अनपेक्षित यश देणारी मानसिकता आज तिथल्या लोकांची , म्हणजेच हिंदू मनाची झाली आहे. या सर्वाचा परिणाम जितका पृष्ठपातळीवर दिसतो आहे त्याही पेक्षा कित्येक पट पातळीखाली आहे. याच संयुक्तिक कारण म्हणजे मूळ बंगाली पिंड पुनरुत्थानी मानसिकतेचा आहे.  त्यात आधी काँग्रेस, नन्तर डावे आणि आता हिरव्या पातीचे सशक्त समर्थक तृणमूल यांनी बंगाली जनतेचा भ्रमनिरास केलेला आहे. त्यामुळे त्यांची मानसिकता आज तो पर्याय निवडण्याची आहे जो एक वा दोन पिढी आधी त्यांनी कधीही विचारात सुद्धा घेतला नाही.

बंगाली समाजाचा डाव्या विचारावर ठाम विश्वास अनेक वर्षे टिकला. यात सुरवातीला  मतपरिवर्तनातून मिळालेली सत्ता तदनंतर ती गुंडगिरीच्या बळावर टिकवण्यात डावे मश्गुल झाले. डाव्याच्या विशिष्ट विचारसरणीमुळे तिथे आर्थिक विकास फार प्रमाणात होऊच शकला नाही. काळाच्या ओघात युनियानिझम हा फोल आहे हे जाणवलं. त्यातच पुढे ममतांच्या काळात नॅनोसारखा एक मेगा प्रोजेक्ट घालवून चुकीचा संदेश उद्योग जगतात व जगात दिला गेला. ज्याचे परिणाम आज तिथल्या जनतेलाच भोगावे लागत आहेत. या व्यतिरिक्त डावी विचारसरणी चीन सोडून इतर कुठेही आज फारशी अस्तित्वात दिसत नाही.

हीच वास्तविकता स्वीकारत साधारण दहा बारा वर्षांपूर्वी तृणमूल काँग्रेस हा दुसरा पर्याय तिथल्या जनतेने स्वीकारला. कारण एकच की डावे नकोत पण दिल्लीची कॉंग्रेससुद्धा नको. पण जे 34 वर्षात डाव्यानी केलं, तेच थोड्या कमी अवधीत तृणमूल काँग्रेसने केलं. त्यात अजून भर म्हणजे शारदा चिटफंड घोटाळा, ज्याने तृणमूलचं नाव पूर्ण घालवलं. या घोटाळ्यात सत्तेतीलच काही सदस्य आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी सत्ता अनैतिक पातळीवर ममता बानो यांनी राबवली आणि भरडले गेले लाखो छोटे गुंतवणूकदार. इतकंच नव्हे तर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला काम करू न देता तेथील मुख्य पोलीस आयुक्त यांच्यासाठी स्वतः मुख्यमंत्री उपोषणाला बसले हा खेळ अत्यंत हास्यास्पद ठरला. जवळ जवळ घटनात्मक पेच निर्माण केला गेला. वास्तविक गुन्हे अन्वेषण विभाग आपले काम सुप्रीम कोर्टात प्रलंबित असलेल्या दाव्यासाठी करत होतं. हा सर्व निंदनीय खेळ जनता उघड्या डोळ्यांनी बघत होती. कारण त्यावेळी जनतेच्या हातात काहीही नव्हतं ,फक्त बघण्याशिवाय.

त्यात भरीस भर म्हणजे अतिरेकी मुस्लिम लांगुलचालन , शेजारील बांगलादेश व म्यानमार मधील मुस्लिम शरणार्थींना पश्चिम बंगालचं उघडून दिलेलं दार आणि त्यांच्या पुनरुत्थानासाठी ममतांनी चालवलेला आटापिटा. हे सर्व करत असताना तेथील हिंदूंवर होत असलेले अत्याचार , धार्मिक बंधनं, दुर्गापूजेच्या वेळेस केलेला अत्याचार आणि यावर आता केलेला कळस म्हणजे जय श्रीराम म्हणणाऱ्यांना तुरुंगवास. हे सर्व निव्वळ तेथील मुस्लिम मतदार वाढून आपली वोटबँक तयार व्हावी यासाठी. याचा आजचा परिणाम कित्येक भागात  हिंदूंना मायनॉरिटीमध्ये जावं लागलं आहे.

वरील सर्वांचा खोल परिणाम हिंदू वोटबँक तयार होण्यावर झाला. ज्या मानसिकतेत त्यांना प्राप्त परिस्थिती व ममता बानो यांनी जाण्यास भाग पाडलं. कारण डावे आधीच मुस्लिमधार्जिणे आहेत. त्यामुळे एकच उपयुक्त पर्याय निवडणे हा एक मार्ग बंगाली हिंदू जनतेला उरला. यात संपूर्ण देशपातळीवर भाजपा हा एकच समर्थ व तृणमूल आणि त्यांच्या अतिरेकी  मुस्लिम लांगुलचालनाला पर्याय आज उपलब्ध आहे. यात भरीसभर म्हणून मोदिजीनी त्यांना जय श्रीराम या सशक्त मंत्राने घातलेली साद. त्याचा उचित परिणाम हा 23 मेला नक्कीच दिसेल. जो आधी म्हटल्याप्रमाणे पृष्ठभागावर आहे त्याच्या पेक्षा पृष्ठभागा खाली जास्त आहे.

म्हणून माझा अंदाज या सुप्तमतानुसार आणि त्या मानसिकतेचा अंदाज बांधला तर भाजपला बंगालमध्ये न भूतो विजय मिळवून देण्यात नक्कीच होईल. त्यासाठी उपयुक्त कामगिरी, प्रचार आणि सर्व यंत्रणा उपयुक्ततेने राबवण्यात भाजपा पश्चिम बंगाल आणि केंद्रीय नेतृत्व संपूर्ण प्रमाणात यशस्वी झालंय.

भाजपचा बंगाल विजय हा कमीतकमी २५ ते ३० जागाच्या दरम्यान असेल हा माझा वयक्तिक अंदाज आहे, जर ममताने काही घातपात केला नाही तर. 

© प्रसन्न आठवले
१४/०५/२०१९

नावासकट हा लेख प्रसारित करा आणि २३ मेला ताडून बघा.

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...