भोग आणि ईश्वर ४३७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
कालच्या विषयात पुढे जाऊया. मुळात श्वास व मनाची गती शक्ती आणि वेग यांचा ताळमेळ जमवतांना त्रास सुरवातीच्या काही दिवसात होऊ शकतो. म्हणजे विचारांचा आवेग गती, विषय अचानक वाढून, एकाग्रता न होता, उलट मन जास्तच भाराऱ्या मारतं. पण हा सुरवातीचा टप्पा आहे.यामध्ये बैठक न सोडता, नेटाने प्रयत्न करत राहणं हाच उत्तम उपाय आहे. कोणत्याही कर्मात प्रयत्नांना पर्याय नसतो.
त्यामुळे, इथेही तो नेटाने करावा. यामध्ये लक्षात ठेवण्याचा मुद्दा म्हणजे, मन हे सवयीचं गुलाम आहे. म्हणूनच एखादी नवीन चांगली व लाभदायक सवय लावायला, सुरवातीला नक्कीच त्रास होऊ शकतो. पण काही दिवसांनंतर आपण मन व श्वास यांना, एका लयीत आणण्यात, यशस्वी होणार हे ध्यानात ठेवावं. यात एक महत्वाचं सूत्र म्हणजे आपलं लक्ष श्वासांवर केंद्रित असावं किंवा तसा प्रयत्न करत राहावं.
म्हणजे श्वासांची वाढलेली गती, हळूहळू नियंत्रित होताना मनाचं पूर्ण लक्ष त्यावर केंद्रित करण्यास, आपण प्रयत्नपूर्वक यशस्वी होऊ. आधी श्वास वेगात असल्या मुळे, श्वासांचा आवाज व कंपनं गतीपूर्वक घडताना जाणवतात, ती कंपनं व आवाज आता हळूहळू स्थिर होऊन,एका संथ लयीत सुरू झालेला दिसेल.
यामध्ये कुठलाही जोरजबरदस्तीपूर्वक प्रयत्न करू नये वा न जमल्यामुळे निराश होता कामा नये. त्यामुळे, एकतर मनाला देहाला व बुद्धीला कार्य सोडून द्यायला कारण मिळेल. मन स्वतःच ठरवेल, की जमत नाही.
इथे चिकाटी अर्थात पेशन्स उपयोगी येतात. प्रयत्न आणि चिकाटी यामुळे, एकदा हा समन्वय साधला की मग पुढील क्रिया सुरू करायला हरकत नाही. श्वासांवर मिळालेलं नियंत्रण व गती तशीच ठेवत, आपण श्वास आणि उच्श्वास याद्वारे, मनातील निराशा, काळज्या, दुःख, अनिष्ट विचार, कुविचार, यांना श्वासावाटे बाहेर सोडत आहोत, त्यांचं उत्सर्जन करत आहोत, असा कल्पनापूर्वक प्रयास करायचा.
मन व मनाचं कार्य हे विचारांवर चालत असल्यामुळे, जसा आपण विचार करू, त्याप्रमाणे आपलं मन कार्य करतं. या स्थितीला श्वास व मन यांचा ताळमेळ साधलेला असताना,मनातील,विशेषतः सुप्त मनातील, नकारात्मक, अनिष्ट व अप्रस्तुत विचार, भाव व साठलेले अनुभव हे आपण त्याज्य समजून, सोडून देत आहोत, असे विचार मनात आणायचे. कल्पनेतून मनातील जळमटं, जाळ्या, कोळीष्टकं आपण साफ करत आहोत, अशी भावना व भाव मनात आणायचे.
मनाचा एक मोठा गुणधर्म इथे उपयोगात येतो. तो म्हणजे, जसा भाव, तसं कार्य मन घडवून आणतं. मनाच्या या शक्तीचा, आपल्या सत्कार्यासाठी उपयोग करून घ्यायचा. ही प्रक्रिया, शक्य असेल तितका वेळ करून झाल्यावर. मनाला, शांत करून, फक्त श्वासांवर एकाग्र व्हायचं. काही काळ असाच शांतपणे गेल्यावर, हळूहळू मनाला बुद्धीला व नन्तर देहाला, भानावर आणायचं.
तद्नंतर काही मिनिटांनी सावकाशपणे उठून, आपल्या कार्याला लागायचं. याप्रकारे,, हीच प्रक्रिया, रोज ते आठवड्यात एकदा अशी करावी. यामध्ये, एकाग्रता जितकी साधेल, तितकाच हा उपाय, मनातील, त्याज्य, नको असलेल्या गोष्टी, विचार, जाणीवा काढून टाकेल आणि मनाला खूप हलकं वाटेल.
याचा मुख्य लाभ म्हणजे, गंभीर, अडचणी असलेल्या काळात वा प्रसंगात,मन खंबीर राहून, विचारपूर्वक कृती होते आणि विवेक जागृत राहतो, विचारात ठामपणा येतो. मन पुर्णपणे सकारात्मक राहतं आणि सकारात्मक मनाचे अनेक लाभ आहेत, हे आपण जाणतोच.
यावर पुढील।चिंतन उद्याच्या भागात. पण तोपर्यंत नामाने श्वासाला बांधून घालण्याचा प्रयत्न सुरूच ठेवू.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१०/०२/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment