भोग आणि ईश्वर ४५५ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
जलतत्व प्रभावित व्यक्तींचा एक स्वभाव आपण बघितला की, त्यांना, स्वतःला, सहसा कुठेही सामावून घ्यायला, समस्या येत नाही. म्हणजे अश्या व्यक्ती, जलाप्रमाणेच असतात. जसा प्रवाह, मार्ग, काळ, संगत असेल त्या प्रमाणे ते, त्या त्या प्रसंगात, समूहात व साच्यात स्वतःला सावरून व सामावून घेतात. यांना सहसा क्रोध वा नैराश्य येत नाही. कारण जसा काळ तसा स्वतःमध्ये, विशेषतः स्वतःच्या आचार, विचार व उच्चारात आवश्यक बदल करण्याचं कसब, त्यांच्याकडे जलतत्व प्रभावाने आलेलं असतं.
या लोकांना समूहात सामूहिक मानसिकता व एकांतात एकाग्रता, दोन्हीही साध्य होतं.म्हणजे विचारांचा ठामपणा असूनही, आपलाच हेका न चालवता, जसं सर्वमताने ठरेल, त्यानुसार करण्याचं तंत्र यांना जन्मतः अवगत असतं. पण कधीकधी अश्या व्यक्तींना समूहात स्वत्व गमावून, असेल ते स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागते. अर्थात यामध्ये आपण काही गमावत आहोत किंवा आपलं काही नुकसान करून घेत आहोत, असा कोणताही भाव, यांच्या मनाला स्पर्श करत नाही.
या गोष्टीचा एक फायदा असाही आहे की, बरेचवेळा मनात येणारे, भय, निरुत्साह, द्वेष, मत्सर, न्यूनगंड इत्यादी भाव त्यांच्या मनाला स्पर्श करत नाहीत. ज्यामुळे गैरभाव, गैरसमज यापासून जलतत्व प्रभावी देह बुद्धी व मन असणारी व्यक्ती लांब असते. किंबहुना स्वतःचं नुकसान करू शकणारे, स्वभावाचे कंगोरे यांच्या मनात असत नाहीत, हा खूप मोठा गुण या व्यक्तींचा असतो.
या विरुद्ध, पृथ्वीतत्वाने युक्त व्यक्ती, बऱ्याचश्या स्थिर स्वभाव, स्थिर मतं, ज्याला हट्टाग्रही किंवा दुराग्रही किंवा इंग्रजीत ज्याला rigid म्हणतात, तशा असतात. यांना आपलं मत, विचार, समज यातील काहीही बदलायला वा परिस्थिती व सत्यता,यानुसार पारखून त्यात आवश्यक बदल अर्थात upgradation व updation करायला जमत नाही व रुचतही नाही.खरं कार्य अश्या लोकांच्या स्वभावबाबत करणं गरजेचं आहे.
यांच्यात पृथ्वीतत्वाने युक्त जडत्व असल्यामुळे, आपलं म्हणणं, चूक वा बरोबर असं दोन्ही प्रकारचं, मांडायला वा सांगायला जमत आणि रुचत नाही. यांना आपलं मत, बुद्धी यामध्ये कोणाच्या सांगण्यावरून बदल करायला आवडत नाही. फक्त अधिकारी व्यक्ती, योग्य प्रकारचं ज्ञान या माध्यमातून आवश्यक बदल करण्यासंबंधीचं चिंतन या व्यक्ती, करण्याचा प्रयत्न मनामध्ये करतात. प्रत्यक्षात बदल करणं, खूप कठीण अर्थातच जडच जातं.
उद्याच्या भागात उरलेल्या तीन तत्वांच्या प्रभावतील व्यक्तींचा अभ्यास करूया. परंतु तोपर्यंत आपलं नामाचं नित्यकर्म करत राहण्याचं धोरण न सोडता.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२८/०२/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment