भोग आणि ईश्वर ४४२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
Have patience म्हणजेच जरा सबुरीने घ्या,हे वाक्य आपण अनेकदा ऐकलं असेल किंवा कोणाला बोललो सुद्धा असू. वास्तविक आपण असं कोणाला बोललो, म्हणजे आपल्याकडे जास्त सबुरी किंवा पेशन्स असेलच असं नाही.पण त्या प्रसंगात वा त्या गोष्टीपुरतं आपल्याला समोरच्या व्यक्तीची अधीरता किंवा impatience जाणवलेली असते. म्हणजे ती आपली जागृत दृष्टी असते, भले प्रासंगिक असो, पण असते.
म्हणून आपण त्या प्रसंगात त्याला त्याची अधीरता दाखवून देतो. अगदी अधिकाराने. पण याचा अर्थ आपण कायमस्वरूपी तसे असूच, असं शंभर टक्के, सांगता येणार नाही.कारण आपल्याला जाणवलेली,त्या व्यक्तीची अधीरता ही, त्या प्रसंगात आपली जाणिवेची खिडकी उघडली होती म्हणून आलेली, त्या प्रसंगापूरतीची जाग म्हणू शकतो. पण म्हणजे आपण लोका सांगे ब्रह्मज्ञान या प्रकारात मोडतो का.
तर नक्कीच नाही. कारण त्यावेळी काही कारणास्तव आपण जाणिवेबाबत, त्या व्यक्तीच्या उच्च स्थानी असू. कारण जी गोष्ट घडत असेल वा घडत आहे किंवा जी गोष्ट आपण त्याला सांगत असू, त्याबद्दल, त्याच्या कारणां बद्दल किंवा परिणामांबद्दल, आपल्याला थोडी जास्त माहिती असल्यामुळे,आपण त्या व्यक्तीला अधिकाराने तसं बोलू शकलो. पण प्रत्येकवेळी, प्रत्येकाला, तसं ज्ञान असेलच असं नाही. पण तरीही, आपण, त्या परिस्थितीत तसं एखाद्याला त्यावेळी बोललो, ते सत्यच होतं.
फक्त आपण सर्वज्ञ नसल्यामुळे, प्रत्येकवेळी हे ज्ञान वा जाणीव असेलच, असं नाही. तरीही आपण लोकांसांगे या प्रकारात नक्की येत नाही, अस माझं मत आहे. कारण त्यावेळी आपण जे बोललो, ते योग्यच होतं. मात्र सर्व काळ ते लागू होईलच असं नाही. पण यातून एक सत्य मात्र लक्षात आलं असेल, त्याचं आता चिंतन करूया.
पहिली गोष्ट म्हणजे, एखाद्या गोष्टींबाबत पूर्ण ज्ञान असण्याने, आपल्याला परिणाम, त्या परिणामांची व्याप्ती माहीत होते. त्यामुळे ज्यांना ती माहीत नसते, त्यांना त्या बाबत वा त्यांच्या कृतीतील विसंगती, कृतीची वा कर्माबाबत वास्तविक अपेक्षा आणि घडत घडलेलं कर्म, त्यामुळे चुकीच्या घडणाऱ्या गोष्टी, काय कर्म अपेक्षित आहे, या सर्वांचा अंदाज येऊन, योग्य आलेख व प्रत्यक्षात घडणाऱ्या कर्माची अचूकता वा चूक लक्षात आणून देऊ शकतो.
त्यामुळे एखादी व्यक्ती एखाद्या कृतीबाबत काय करत आहे आणि तिने काय करायला हवं, याबाबत आपण अपेक्षित आलेखानुसार, न घडल्याचे आपल्या लक्षात येताच, आपण तशी सूचना त्या व्यक्तीला देतो. साधारण हीच गोष्ट, याच तर्कांने, वेगवेगळ्या कार्यक्रमात असलेले जजेस वा परीक्षक करतात आणि समोरच्या स्पर्धकाला गुण देतात.
दुसरी महत्वाची गोष्ट, एखाद्याच्या कृतीतून आपल्याला जाणवलेली चूक ही त्याच्या अज्ञानाचं व आपल्या त्या प्रसंगातील ज्ञान व जाणिवेची जाग, यांना अधोरेखित करतं. पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, आपल्यापेक्षा ज्ञानी असलेली व्यक्ती मार्गदर्शन, पथदर्शन करते, म्हणजे त्या व्यक्तीचा त्या विषयातील दृष्टकोन, किती विशाल व सर्वव्यापी असेल. त्याच पायावर, त्या व्यक्तीला, आपल्या न घडलेल्या किंवा भविष्यात घडू शकणाऱ्या चुका जाणवतात.
यात आपण अनेक नवीन गोष्टी समजल्या वा जाणल्या, त्याचं चिंतन करूया. पण उद्याच्या भागात. तोपर्यंत नामाने साध्य होऊ शकणारी शांती मिळवण्यासाठी नाम घेऊया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१५/०२/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment