श्रीरुक्मिणी स्वयंवर १४
llश्रीगणेशाय नमःll
llश्रीमुकुंदाय नमःll llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll
हाच मोहिनी रूप घेता झाला देव असुर याना ठगवता झाला पण शंकरांना याची मोहिनी झाली. राहू केतू देवांच्या बाजूला आले आणि अमृत प्राशन करते झाले, याची तक्रार केली रवी चंद्र यांनी. म्हणजे त्यांचा सहभाग इतकाच. मारलं कोणी त्यांना याने. बघा पण जन्मभर त्रास कोणाला तर रवी चंद्र यांना. बरं याला रूप नाही ,गुण नाही, एक ठावठिकाणा नाही, एके देशी वास नाही, याला काय करायचंय सिंहासन मानमरातब देऊन. हा वृत्तीशून्य आहे , याला कसला अभिमान नाही , कसला भोग भोगायचा नाहीये, फक्त सवंगडी जमवायचे मौजमजा करायची हाच छंद आणि हाच योग.
अश्या माणसाकडे धन कोठून येणार, हा निर्धन भाजीपाला खाऊन दिवस कंठणारा. हा काय माझ्या भगिनीला सुखात ठेवेल. याला माता पण दोन द्वैत आणि अद्वैत दोन्ही भाव समान असं मानणारा हा, त्यामुळे एक माता देही आणि एक माता याला विदेही पाहते. एक स्वतःबद्दलचा अभिमान वाढवते, तर दुसरी विषयप्रिती वाढवते आणि हा दोघीनाही सोडून धर्मरक्षक म्हणवून घेतो. धर्माच्या घरी उष्ट खाणारा हा ब्राम्हणांना घाबरणारा त्यांनी हाणलेली लाथ हा छातीवर अभिमानाने मिरवणारा.
याला आपल्या घरची मुलगी द्यायची म्हणजे समाजात स्वतःचा मानमरातब कमी करून अवमानित जिणे जगावे लागेल. अहो बोलावल्याशिवाय कुठेही जाणारा , कसलाही मान सन्मान याची तमा न बाळगणारा हा कृष्ण आणि याच्याशी वाङ्निश्चय करणे व सोयरीक जोडणे ही शुद्ध मूढमती असेल, हे माझे बोल त्रिवार सत्य आहेत हे लक्षात ठेवा.
आपलं कुळ गोत्र कुलाचार हे सर्व अत्यंत श्रेष्ठ आहे आणि आचार विचार यांनी व जन्म उच्च नीच या सर्व गोष्टींची जाण सगळ्यात जास्त व याचे महत्व सर्वात अधिक मला ज्ञात आहे. समाजात वावरताना या गोष्टी बघाव्याच लागतात. अश्या कोणत्याही कोष्टकात न बसणाऱ्या वा अश्या गोष्टींची काही चाड न बाळगणाऱ्या माणसाला मुलगी देणं हेच मुळात महापाप समजतो मी. या सर्व रीतिरिवाज, चाली या मागे निश्चित काही उद्देश आहे, जे मला माहित आहे. त्यामुळे ते आपण माझ्या नजरेने पाहूनच निर्णय घ्यावा असे मला वाटतं.
चैत्य देशाचा राजा महाभिमानी, महाशूर जो शिशुपाल तोच आपल्यासाठी सुयोग्य वर आहे. ज्याच्या पराक्रमाचे गोडवे गायले जातात, ज्याच्या वचनांचे दाखले दिले जातात असा साभिमानी आणि सुयोग्य वर आहे शिशुपाल भीमकीसाठी. आपल्याकडे असलेले महापंडित , ज्ञानी , ज्योतिषी , शास्त्रवेत्ते यांची बैठक बोलावून सर्व जातक योग जुळवून मग वाङ्निश्चयाचा सुमुहूर्त काढूनच असे विवाहादी निर्णय घेतले जातात. ते लगोलग करा.म्हणजे ही सोयरीक शिशुपालाशी जुळवण्याच्या दृष्टीने यत्न करा.
आपण कसला विचार केला नाही आणि निघाले श्रीकृष्णांचा विचार करायला. त्याचे गोत्र, जातक, कुळ यांचा थांग नाही. सोयरीक जुळवल्यांनतर योग कसे आहेत याचे शास्त्राने घालून दिलेले नियम बघितले नाहीत आणि त्याच्याशी सोयरीक जोडण्यास निघालात आपण. सोयरीक जोडताना, शरीरसंबन्ध जोडताना शास्त्राने पुरणाने काही नियम व दाखले घालून दिलेले आहेत. त्या सर्वांचं पालन करून मगच या गोष्टी कराव्या लागतात.
परंतु इकडे भीमकीची अर्थात रुक्मिणीची मनःस्थिती अत्यंत विचित्र होती. मनाने तिने श्रीकृष्णाला वरले होते. निश्चय पक्का होता तिचा. जर वरले तर काया वाचा मन या तिन्हीनी मी श्रीकृष्णांचीच होईन. पण बाहेर बंधू रुक्मि तर चर्चा वेगळीच करतो आहे. श्रीकृष्णाला नावे ठेवतो आहे, टीका करतो आहे. त्यातच रुक्मिणीने शिशुपालाचे नाव ऐकले आणि तिच्या मस्तकी वीज चमकावी तसे जाहले. सिद्धास जसे सिद्धी प्राप्त होताच स्थिती होते तशीच स्थिती भीमकीची झाली.
ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परामानंदम कृष्णम वंदे जगतगुरुं ll
© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणामस्तू ll
१०/१२/२०१९
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment