Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर १८

श्रीरुक्मिणी स्वयंवर १८

llश्रीगणेशाय नमःll

  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll
 
द्विजवर विचार करता झाला की इतकी भव्य दिव्य अतिसुंदर द्वारका नगरी पाहण्याचा योग राजकुमारी रुक्मिणींच्या कारणे आला. अन्यथा हा भाग्ययोग या जन्मी येण्याची संभवता काहीही नव्हती. अर्थात द्वारकाधीश आणि रुक्मिणीदेवी यांच्या हस्तसामुद्रीक भाग्यरेषेतील अद्भुत व अतर्क्य योगामुळे आला आहे , हे निश्चित. पूर्वपुण्याई , वाडवडिलांची कृपा आणि भगवंताशीष यामुळे हे जमून आले. 

अचानक भानावर येत द्विजवर स्वतःशीच वदला, ज्या कार्याप्रीत्यर्थ मला येथे धाडण्यात आले आहे, त्या कार्याची पूर्तता करणे हे निकडीचे आहे. द्वारकेत जास्त रमणे उचित नव्हे.  हा विचार येताच स्वतःला आपल्या वस्त्रप्रावरणांना नीट नेटके करून, श्रीकृष्णाधाम कुठे आहे याची पृच्छा करत करत, प्रत्यक्ष श्रीकृष्ण राहात असलेल्या राजमहालकडे जाण्याचा मार्ग विचारत विचारत विप्रवर तेथे जाऊन पोहोचला. सभोवार त्याने पाहिले, अनेक संरक्षक व्यवस्थेचे उचित जाल पसरले होते. 

परंतु द्विजवराकडे कौंडिण्यपुरचे पत्र हा एक मोठा आधार असल्यामुळे सर्व व्यवस्था चोख पार पाडत थेट वासुदेव जिथे उपस्थित होते, महालातील  त्या कक्षाकडे द्विजवरास नेण्यात आले. कारण द्विजवराने तशीच इच्छा प्रकट केली की हा संदेश गुप्त असून तो फक्त द्वारकाधीशांच्या हाती सुपूर्द करून, त्यांचं उत्तर घेऊन त्वरित रवाना होण्याची मला आज्ञा आहे. द्विजवरास हेमसिंहासनी विराजित, प्रत्यक्ष श्रीनारायाण अवतारी, श्रीयोगेश्वर यांच्यासमोर प्रतिहारींनी सन्मानपूर्वक आणले. प्रत्यक्ष परमेश्वराला पाहण्याचे भाग्य, योग द्विजाच्या प्रारब्धात जुळून आला. 

द्विजवर दिगमूढ होऊन पहात होता. द्विजवरास पाहताच श्रीकृष्ण सर्व जाणते झाले की, या द्विजवराच्या आगमनाने एक भाग्ययोग जुळून येणार आहे. प्रतिहारी जाताच लाभलेल्या एकांतात या द्विजवराशी वार्ता करण्याचा योग येईल हे ओळखून प्रतिहारीकडे स्मितवदन पाहिले मात्र प्रतिहारी भाव जाणून, वंदन करत, कक्षाबाहेर जाता झाला. प्रतिहारीचे गमन होताच सिंहासनावरून त्वरेने खाली उतरून,जराशी उडी मारूनच, उच्चस्थान उतरून पायऊतार होऊन आणि द्विजवरासमक्ष उपस्थित झाले.

द्विजवरासमीप येऊन त्यांनी ब्राम्हणदेवतेला चरणांवर मस्तक ठेवून शिरसाष्टांग प्रणिपात केला. ज्या योगीयांच्या योग्याची सतकीर्ती ऐकून द्विजवर कुतूहलाने त्या योगिराजांस पाहण्या साठी आणि रुक्मिणीदेवींचा संदेश पाहोचता करण्यास्तव आला होता , तोच भगवंत स्वये आपल्यालाच साष्टांग नमन करतो आहे , हे पाहून, द्विजवर आशीर्वच देऊन थोडे संकोचते झाले. श्रीकृष्णाने त्यांची ही मानसिकता ओळखून त्यांना आश्वस्त करण्यासाठी कथन केले. 

" हे द्विजवर , आपण निःसंकोच असावे. आपण ब्राम्हण आहात, आपण माझ्यासाठी निःसंशय बृहस्पतिरुप आहात. आपला सुयोग्य आदर सन्मान हे या सनातन धर्माचे आणि या राज्याचे आद्य कर्तव्य आहे."  इतके बोलून यादवनरेशाने  स्वहस्ते द्विजास उच्चासना वर नेऊन बसवले.  चांदीच्या पात्रात त्यांचे पाय ठेवून, शुद्ध जल भरलेले सोन्याचे कलश मागवून विधिवत पाद्यपूजा केली. तद्नंतर त्या दोन्ही पायांना चंदनाचे गंध , अक्षता वाहून पूजाविधी यथास्थित पूर्ण केला. 

द्विजवरास आपल्यासोबत स्नानगृहात नेऊन सुगंधी उटणे लावून त्या द्विजवराला उत्तमोत्तम औषधी व गंधयुक्त उन्ह पाण्याने स्वहस्ते स्नान घातले. तदपश्चात पितांबर नेसवून त्रिपुटी चंदन कपाळावर व कंठ , दंड , छाती यावर लावून नंतर पुनः शिरसाष्टांग प्रणिपात केला. 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परामानंदम कृष्णम वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

१६/१२/२०१९
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...