श्रीरुक्मिणी स्वयंवर २४
llश्रीगणेशाय नमःll
llश्रीमुकुंदाय नमःll llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll
llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
त्याच प्रमाणे तुझ्या यादव सेनेतील , दैत्यांच्या मर्दनात व दैत्यांशी युद्ध व द्वंद्व करण्यात, जे निपुण आहेत , असे निवडक योद्धे पुढे घालून वा त्यांना संगे घेऊन तू पूर्ण तयारीनिशीच विदर्भाकडे निघावेस.
हे श्रीकृष्णां , समस्त जगत तुला आणि तुझ्या या रूपा तील, देहातील आणि स्वरूपातील अस्तित्वाला जाणत असल्या कारणाने, तुला या दिशेने येताना सर्व जण ओळ्खतीलच, परंतु तुझ्या शिशुपालादिक शत्रूंचे गुप्तचर हे देखील तुला पाहून, तशी चाहूल आपापल्या राजांना देतील. या कारणे तू गुप्तरुपघेऊन व गुप्तवेषे येथे प्रकटावेस हा माझा तुला संदेश आहे.
हे यदुनाथा , तू म्हणशील की मी प्रत्यक्ष श्रीकृष्णाला शिकवते आहे, माझ्या बुद्धीने वागण्यास सांगते आहे. मी हे पूर्ण जाणून आहे की, तू अनादी , अनंत, जगतव्यापक आणि श्रेष्ठ बुद्धी आहेस.परंतु माझ्या हृदयातील श्रीकृष्णाप्रति माझ्या आराध्याप्रति माझं प्रेम, माझी प्रीती इतकी आहे की, त्या प्रीतीमुळे मला भीती वाटते आहे आणि त्या भितीपोटी काळजी आहे. हे द्वारकेशा ,या माझ्या,तुझ्याचप्रति असलेल्या ओढीनेच मी तुला मार्गदर्शन करत आहे.
तू हेही म्हणशील की, मी प्रबळ योद्धा आहे आणि युद्धनीती तज्ज्ञ आहे. मग अश्यास ही का आगंतुक मार्गदर्शन करते आहे. तर त्याचे मुख्य कारण हे आहे , की इकडील स्थिती मी जाणून आहे. तुझे शत्रू , अर्थात माझ्या माहेरची माणसे व त्यांचे आप्तेष्ट , सखेसंबंधी हेसुद्धा तितकेच प्रबळ आहेत. पण त्याही पेक्षा ते घातकी आहेत. ते कोणाचा,कधी ,कसा घात करतील हे स्वये ईश्वरालादेखील कळणार नाही. म्हणून तुला मार्गदर्शन , हा आगाऊपणा, करण्याचं धारिष्ट्य मी दाखवते आहे.
हे सर्वेशा , माझा सख्खा बंधू रुक्मि , त्याचे अनेक सखे व आप्तेष्ट जसे शिशुपाल ,मगधनरेश जरासंध इत्यादी तुझ्याशी शत्रुत्व ठेवून आहेत,. हे सर्व खल आज इथे एकत्र आहेत. या कार्यानिमित्ताने, सर्वजण सैन्यानिशी आलेले आहेत. तुला या सर्वांना परास्त करून मला येथून घेऊन जायचे आहे. म्हणून उच्च रणनीती व गुप्त योजना करताना मदत व्हावी याच हेतूने मी तुला इकडील माहिती व त्यायोगे करावयाचा उपाय याविषयी मार्ग दाखवीत आहे. किंबहुना ही आगंतुकी करत आहे.
तू हाही विचार करशील की, ही सर्वज्ञ, मला मार्गदर्शन करून व येण्याचे आमंत्रण देऊन, मला घेऊन जाण्याचा आगाऊ मार्ग दावत आहे. पण मी हा तिचा मार्ग का अवलंबावा. तर असा विचार तू करू नयेस हा आर्जव आहे. कारण तू अजिंक्य आहेस , वीर आहेस, तू तुझ्या शत्रूंना पराजित करण्यात सर्व नितींचा कुशल वापर करतोस,नव्हे तर यात तू वाकबगार आहेस. याव्यतिरिक्त शरणागतरक्षक हे तुझे धोरण आहे. या कारणे तू आळस झटकून , वीरवृत्तीचा अंगीकार करून, पूर्वयोजना आखून व त्वरेने धावत यावेस.
ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम् वंदे जगतगुरुं ll
© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
२३/१२/२०१९
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment