श्रीरुक्मिणी स्वयंवर ७
llश्रीगणेशाय नमःll
llश्रीमुकुंदाय नमःll llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll
विद्येचे , वाङ्मयाचे , शब्दांचे , बुद्धीचे दैवत श्रीगजानन आणि देवी श्रीशारदा यांना सादर वंदन. परमपावन, मंगलमय, जगतकारण, जगतपालक आणि मनातील अधिष्ठाता भगवान श्रीकृष्ण यांना प्रणिपात. माझे सद्गुरू श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी माझ्या अल्पमतीतुन हे कार्य करवून घेण्याचे योजिले आहे, त्यांनाही साष्टांग दंडवत.
हे तिन्ही लोकांतील देव ऋषी, गुरूवर आपण स्वये येऊन माझ्या लेखणीत अध्यात्मिक रसनिष्पत्ती करावी. त्यायोगे श्रोते व वाचक यांचे नेत्र व कर्ण तृप्तीप्रत न्यावेत. पण त्यातील तृप्तता पुढील वाचनाची अतृप्ती वा अभिलाषा जागृत करेल हे सुद्धा योजावे, ही नम्र प्रार्थना. ज्यायोगे आपले अस्तित्व आणि या कथेतील आपलाही सहभाग, कथेच्या संपूर्ण यात्रेत, निश्चित राहील आणि वाचकांना यातील शब्द, अर्थ, गहनार्थ, काव्यात नाथांनी मांडलेली अद्भुतता, रसाळता यांचे यथार्थ दर्शन या गद्य प्रवासात प्राप्त होईल.
हे काव्य वाचताना नाथांचा एक एक शब्द किती अनमोल आहे, याचा प्रत्यय पदोपदी येतोच. पण त्याचा अंशमात्र तरी , मला माझ्या वाचकांच्या नेत्रमार्गे हृदयापर्यंत पोहोचवता येवो हीच मनोकामना ठेवून व ही कथा पूर्णत्वाकडे नेण्याच्या या दृढ संकल्पात, माझ्या अणुमात्र सहभागात, आपण महायोगदान द्यावे, हा आर्जव करून, आता आपण इथून पुढे मूळ कथेकडे वळतो.
अर्जुनाचा नातू राजा परीक्षित हा आपल्या सभेत सिंहासना रूढ होऊन विनम्रतेने, महर्षी ज्ञानयोगी तपस्वी शुक यांना प्रश्न विचारतो आहे.
"हे महायोगी ऋषींवर कृष्णचारित्रामध्ये विशेष करून भीमकी अर्थात रुक्मिणी हरण हे विशेष करून ऐकावयाची माझी इच्छा आहे."
शुक मुनींचा प्रश्नार्थक चेहरा पाहून राजा परीक्षित कर जोडून पुनः वदता झाला
"हे ऋषीवर कृष्णकथेची गोडी इतकी अवीट आणि माधुर्यपूर्ण आहे आणि ती आपल्या अमृतमय वाणीतून ऐकून माझे श्रोत्र अर्थात कर्ण मस्तिष्क मार्गे माझे हृदय व आत्मन हे अतृप्ती चाच अनुभव घेत आहे. म्हणून ते पुनः पुनः आपल्या मुखाने ऐकण्याची इच्छा जागृत होत आहे.
आपण हेदेखील जाणता की, या कथेच्या श्रवण किर्तन या योगाने जे ज्ञान मिळेल ते जर यथायोग्य जाणले तर प्राणीमात्र सर्व योग प्राप्त करून मोक्षाप्रत , अर्थात विधात्याच्या ध्येयाप्रत, पोहोचतो. म्हणूनच आपण माझ्यासह समस्त श्रोतृवर्गाला तृप्ती अतृप्तीच्या या सागरात निथळून काढावे आणि या अमूल्य पुण्याची प्राप्ती करून द्यावी. हीच आपल्या चरणांशी प्रार्थना आहे."
राजाचं हे आदरयुक्त आणि अंतःकरणातुन आलेलं कथन ऐकून मनोमन संतोषलेले ऋषीवर शुक राजाला वदले.
"हे राजन, ईश्वरचरित्र हा एक अद्भुत रम्य असा लीलांचा अमृतसंचय आहे. सादरीकरण करताना तुझ्याप्रमाणेच श्रोता जर प्राप्त झाला, तर तो एक अलौकिक योगच असतो. याचा कथा सादरीकरण कर्त्यासही महद आनंद हा विनासायास प्राप्त होईल.
हे राजा तुझ्या प्रश्नानुसार श्रीकृष्ण चरित्रातील भीमकीहरण या लालित्यपूर्ण आणि रसाळ घटनेची पूर्ण कथा मी कथन करतो. तुझ्यासह सर्व श्रोतृवर्गाला त्यांच्या त्यांच्या शुभयोगाने श्रवणभक्तीचे इच्छित लाभ व फल यांची प्राप्ती होवो हीच श्रीयोगेश्वराकडे प्रार्थना. राजा ऐक तर.
वसुदेवाच्या तपोबलाने प्रत्यक्ष त्रैलोकीच्या नाथांना, वसुदेव यांची भार्या अर्थात देवकी हिने आपल्या गर्भात धारण केलं . कृष्ण ज्यावेळी या भूलोकात देवकीच्या गर्भात तेजोमय स्वरूपात प्रकटले त्यावेळी त्यांची कृष्णशक्ती अर्थात महालक्ष्मी गर्भरूपात विदर्भ देशी प्रकटती झाली. अर्थातच जशी कनकासवे कांती आणि सुर्यासवे त्याची दीप्ती ही येतेच तद्वत श्रीकृष्णांसमवेत त्यांची शक्ती अर्थात कृष्णशक्ती, देवी महालक्ष्मी भूलोकी प्रकटली."
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परामानंदम कृष्णम वंदे जगतगुरुं ll
ll श्रीएकनाथमहाराज की जय ll
© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणामस्तू ll
०३/१२/२०१९
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment