Skip to main content

गीत विश्लेषण - आकाश पांघरुनी जग शांत झोपलेले भाग २

गीत विश्लेषण - आकाश पांघरुनी जग शांत झोपलेले भाग २ 

आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे 
घेऊन एकतारी गातो कबीर दोहे

गगनात हासती त्या स्वप्नील मंद तारा
वेलीवरी सुखाने निजला दमून वारा
कालिंदीच्या तीरी या, जळ संथ संथ वाहे

भरला स्वरात त्याच्या भक्तीतला सुगंध
ओठांत आगळाच आनंद काही धुंद
त्याच्या समोर पुढती, साक्षात देव आहे

काहूर अंतरीचे भजनात लोप होई
भक्तीत श्रीहरीच्या मन हे रमून जाई
उघडून लोचनांना तो दिव्य रूप पाहे

गीतकार ः मधुकर जोशी 
संगीतकार ः दशरथ पूजारी
गायिका ः सुमन कल्याणपूर

बघूया त्याचा मनोहारी गूढ गर्भीत अर्थ. 

आकाश हे पंचतत्वातील एक तत्व. निर्गुण ब्रम्हस्वरूप. पृथ्वीला झाकोळून उरलेलं. अर्थातच सर्वसमावेशक तरीही दशांगुळे उरलेलं. ज्याची तुलना फक्त परम ईश्वराशी होऊ शकते. म्हटलं तर सगुण म्हटलं तर निर्गुण निराकार. कारण त्याचा काहीही विशिष्ट आकार नाही. त्या त्या वेळी जसं दिसतं तसं भासतं . ईश्वराचं तसंच आहे. म्हटलं पृथ्वी अर्थातच सजीव निर्जीव सृष्टीचं प्रतीक. जडत्वाशी संबंध असलेली आणि जडत्वाचं प्रतिनिधित्व करणारी माता वसुंधरा. जी सर्व लेकरांची पापं पोटात सामावून घेते. कारण तिच्याच कुशीवर पापी आणि पुण्यात्मे एकाच प्रकारे चिरनिद्रा घेतात आणि आपल्या जडत्वाचा पृथ्वीरूप भाग देहभाग विलीन करतात. 

अश्या या  ईश्वराच्या प्रेममय दृष्टीचा लाभ घेत, त्याच्या प्रेमाच्या शीतल छायेत विसावून हे जडरूप जग शांत झोपलं आहे. अर्थातच हि शांतता रात्रीची आहेच. पण प्रतीकात्मकपणे कर्म करून सर्व ईश्वरार्पण करून पुन्हा कर्मरत होण्यास सिद्ध होत आहे. त्याआधी या ईश्वररूप आकाशाचा प्रेमळ हात पांघरूण म्हणून लपेटून काही क्षण विसावलं आहे. अश्या शांत वेळी अर्थातच ज्यावेळी सर्व जग कर्माच्या चक्रात बद्ध असतं, त्यावेळी संत कबीर ईश्वरी नामाचा उच्चार करत, त्या ईश्वराला स्मरत जागा आहे. इथे काही गोष्टी या उलगडून दाखवल्या नसल्या तरी त्या काव्याचा गर्भित अर्थ जो मला गवसला तो असा आहे. 

मुळात जगाची हि निद्रा अनंत ब्रह्मांडाच्या मालकाच्या शक्तीवर, कर्तृत्वावर, क्षमतेवर विसंबून शांतपणे निजकार्यात मग्न आहे. ती निद्रा प्रतीकात्मक आहे. कारण जेंव्हा जग कर्मगतीच्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात हरवून गेलंय , त्यावेळी काही पुण्यात्मे हे या जगताच्या कल्याणार्थ, मार्गदर्शनार्थ पृथ्वीवर जन्म घेतात. किंबहुना त्यांना अश्याप्रकारे जन्म घेण्यातच आपल्या आयुष्याची इतिश्री आहे हे माहित असतं . त्यांचं पंचमहाभुत रूपातील देहधारी अस्तित्व हे केवळ आपल्याला दिसण्यासाठी असतं . 

बाकी त्यांना त्या देहाची गरज फक्त जगात कल्याणार्थ असते. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती म्हणतात ते याच साठी. तर अश्या प्रतीकात्मक निद्रेत असलेल्या जगाच्या चिंता वाहायला, त्या जगातला कर्मगतीच्या झोपेतून जागं करायला, जन्ममृत्यू, सुखदुःख, यातील फोलपणा दाखवण्यासाठी सत्चित आत्मे जागृत असतात. 

एकतारी म्हणजे एकच तार असलेलं वाद्य. जे पुराणकाळापासून अर्थात देवर्षी नारदांपासून संत मीराबाई, संत तुलसीदास, संत कबीर यांपर्यंत निजानंदी एकरूप झालेल्या सर्व भक्तांनी आपलंस केलं.  अर्थातच याचं कारण एकतारी हे एक तत्वाचं प्रतीक, एकच नाम, एकच ध्येय, एकच मार्ग, एकच लक्ष्य. असं लक्ष हाती म्हणजे समोर ठेवून त्या लक्ष्याला सतत स्मरत, त्या लक्ष्याचा मागोवा घेत जाणं हे प्रेमरूप भक्तीचं मुख्य लक्षण. त्याचंच प्रतीक म्हणजे एकतारी. 

क्रमशः 

©® विश्लेषक : प्रसन्न आठवले
०८/०९/२०२०

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...