भोग आणि ईश्वर ४२५ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
मनातील ऊर्जा व शक्ती यांच्यावर नियंत्रण ठेवू शकतील, म्हणण्यापेक्षा मनातील विचारांवर नियंत्रण ठेवून चागल्या लहरी अर्थात vibes निर्माण करू शकतील असे तीन घटक, जे आपल्या नियंत्रणात असतात किंवा मानवी कक्षेत येतात ते म्हणजे संगती, विचार व कर्म. आता एकेक घटकाचा विचार करूया. म्हणजे मनातील ऊर्जा व शक्ती सकारात्मक रीतीने कशी वापरता वा वळवता येईल यावर विचार करूया.
संगतीमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे पूर्वसंचिताने मिळणारी संगती आणि दुसरी म्हणजे आपण निवडलेली वा आपल्याला निवडता येणारी संगती. पहिल्या प्रकारा तील संगती ही जन्माने व आपल्या नियंत्रणा शिवाय प्राप्त होते आणि त्या संगतीच्या व्यक्ती व वातावरणात, आपलं प्रारब्ध घेऊन जातं. किंवा त्यांच्या संपर्कात आपण येतो. याचा मनाच्या ऊर्जा व शक्तींशी काय संबंध, यासाठी हे लक्षात घ्या की, या गोष्टी अनेकदा किंवा बऱ्याचवेळा आपल्या पूर्वसंचिताने आपल्या संस्कारांचा भाग म्हणून आयुष्यात येतात.
आपल्या देहासह बुद्धी व मन यांची जडणघडण या गोष्टींनी ठरते किंवा आखली जाते. मनाचा खणखरपणा, राकटपणा, मृदुता, कोमलता, निरागसता, नकारात्मकता व सकारात्मकता या सर्व गोष्टी किंवा यातील काही गोष्टी काही प्रमाणात, नक्कीच संगती व संगतीतून आलेल्या संस्कारातून घडतात. एखादी व्यक्ती हळवी म्हणून घडते, खणखर म्हणून घडते, भावनाशून्य किंवा भावनाशील अश्या विविध पातळीवरील संस्कार हे मनावर आपल्या पूर्वसुकृतामुळे घडतात.
म्हणजेच नकळतपणे आपण तसे घडले जातो. हा आपल्या नियंत्रणाबाहेरील भाग बरेचदा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन जातो. एखाद्याच गोष्टीची भीती वाटणं किंवा कसलीच भीती न वाटणं, अश्या भिन्न स्वभावी व्यक्ती अगदी एखाच घरातसुद्धा असू शकतात. एखादं मूल हळवं, भावनाशील व एखादं अगदी विरुद्ध घडायला त्या घरातील संस्कारांपेक्षा पूर्वजन्मीच्या संचिताची असलेली संगत कारणीभूत असते.
या संगतीदोषाने घडलेलं मन, अनेक गोष्टी, याच प्रभावा खाली करतं. म्हणून या संगतीचा प्रभाव आपल्या कक्षे बाहेर असतो. हा आपल्या पूर्वपुण्याई वर अवलंबून असतो. कदाचित अश्याच मनाच्या जडणघडणीतून बुद्धीचा विकास होतो वा खुंटतो. मन व बुद्धी या दोन गोष्टी व्यावहारिक वा सांसारिक प्रगती वा अधोगती आणि आध्यात्मिक व आत्मिक उन्नती व उद्धार यांसाठी आवश्यक असतात. व्यवहारात बरेचदा निर्णय घेण्याची पद्धत व क्षमता, ही बौद्धिक व मानसिक विकासावर अवलंबून असते.
म्हणून या अनियंत्रित संगतीने घडणारे संस्कार हे सुसंस्कार आहेत की कुसंस्कार आहेत हे संचित ठरवतं. आता हा झाला संगतीचा आपल्या नियंत्रणाबाहेरील प्रकार. उद्याच्या भागात आपण, आपल्या नियंत्रणातील किंवा आपल्या कक्षेतील संगतीबद्दल विचार करूया. मनाच्या एकूण जडणघडणीत या दोन्हींचा सहभाग आणि त्यातून घडणारं व्यक्तित्व, याचा सखोल विचार व त्यात आपण काय करू शकतो, याचा उद्याच्या भागात आपण विचार करूया. पण नामाची आपण धरलेली संगती, अशीच दृढ धरून पुढे जाऊया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२९/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment