भोग आणि ईश्वर ४१५ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
खरतर ज्यावेळी मनात विचार येतो की आता भोग आणि ईश्वर आटोपतं घ्यावं का, त्याचवेळी, एखादा लेख इतका उत्तमप्रकारे जमून येतो, की वाटतं, महाराजांना अजून पुढे सांगणं अपेक्षित आहे. कालच्या लेखात, निष्काम कर्मयोगाचं उदाहरण चपखलपणे आणि साध्या शब्दात सांगितल्यावर आता प्रश्न उरतो, जर इतकं सहज आहे तर, जमत का नाही किंवा इतक्याच सहज साध्य होईल का. बघूया आज.
मुळात सर्व गुंता आहे, सांसारिक व देहातील गोष्टीत मन रमल्यामुळे आणि त्यातून ते काढून घेणं सर्वात अवघड असल्यामुळे, सर्व प्रश्न सुरू होतात. कारण मुळात एक गोष्ट आपण विसरतो की, हा देह, हेच मुळात तात्पुरतं निवास स्थान आहे, आत्मरुप तत्वाचं. त्याचा मुख्य उद्देश देहाचा वापर करून, आत्म्याला प्रत्येक जन्मात हळूहळू परमात्म तत्वाशी एकरूप होण्यासाठी पुढे पुढे नेणं. म्हणजे आत्म्याला ज्ञात असतं की, मला देह फक्त एका उद्देशाने देण्यात आला आहे.
पण हा उद्देश आत्मा, देहात आला की, सर्वस्वी विसरून जातो किंवा देहातील मन बुद्धी, मनाची चंचलता, प्राप्त सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती, देहाच्या प्राप्त स्थितीत देहाची कर्म व कर्तव्ये, या सर्वात मन देह व बुद्धी कधी गुंतून जातात,ते लक्षातच येत नाही. किंवा या देहाचे मनाचे व बुद्धीचे विषय कधी आत्म्यावर काजळी निर्माण करून, त्याला झाकोळून टाकतात, तेच कळत नाही.
मनाची विविध ठिकाणी असलेली गुंतवणूक, विविध नाती, अनेकविध संबंध व त्या संदर्भातील उद्देष्ये तयार करून, मनापुढे, कधी सुख, उपभोग, समाधान, आनंद, हर्ष, कधी दुःख, भोग, दैन्य, कधी गरजा, अपेक्षा, कधी विष्यवासना, कधी मोहमाया इत्यादी वेगवेगळ्या भावा तील बंध निर्माण करतात आणि त्या बंधात अडकून, कधी मनाचं एक सांसारिक विश्व निर्माण होतं, ते समजत नाही.
त्यात मन बुद्धी व देह इतके गुरफटून जातात, की गर्भात असेपर्यंत लक्षात असलेलं, आत्मा पार विसरून जातो. म्हणजे देहाचा खरा चालक, आत्मा असूनही, त्याला पूर्णपणे दुर्लक्षित केलं जातं. देह आपले भोग, मन, बुद्धी व वाचा या माध्यमातून, उपभोगत जातो आणि त्यातून अनेक प्रकारच्या ऋणाना जन्म दिला जातो. त्यातून मग कर्म आणि फल यांची साखळी तयार होऊन, आत्मा त्या ऋणात पूर्ण अडकून जातो.
यासाठी ही जाणीव व ही जागृती महत्वाची आहे की, देह हा आत्म्याला मिळालेलं भाड्याचं घर असून, त्या घराचा incharge आत्मा आहे.ही सर्व व्यवस्था तात्पुरती असून संसार हा या प्रवासातील एक स्थानक आहे,पण शेवटचा थांबा नाही आणि अंतिम ध्येय वा उद्देश नक्कीच नाही. म्हणजे एका व्यापक अर्थाने, मनाचा बुद्धीचा व्यास वाढवून, आपण करत असलेल्या प्रत्येक कर्माचा विचार करणं, गरजेचं आहे.
हा विचार काय असावा किंवा असला पाहिजे, हे पुढच्या भागात पाहूया. अर्थातच नामाच्या शिदोरीचा आधार घेत घेतच.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१९/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment