भोग आणि ईश्वर ४१३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
सांख्य म्हणजे ज्ञानाने समृद्ध झालेला जीव, जो आत्मा आणि परमात्मा यांना जाणणारा आणि त्यामुळे सर्व जाणून, आपण निरिच्छ झालेला. प्रत्येक क्षण नित्य यज्ञ करणारा. पण असं जीवन आणि असं ज्ञान प्रत्येकालाच प्राप्त होईल असं नाही. किंबहुना असं ज्ञान प्राप्त झालेला योगी लाखात एखादा असू शकेल.
पण नित्य कर्म करूनही त्यात रत न झालेला वा कर्म करूनही अकर्मी किंवा निष्कर्मी असलेलासुद्धा कर्माच्या बंधनात न अडकता, आपला मोक्षाचा मार्ग सुकर करू शकतो. म्हणजे असा जीव कर्म करताना, त्यामध्ये मन बुद्धी यांनी गुंतत नाही. कारण जीवाला बद्धता आणते ती त्यामध्ये असणारी आसक्ती.
पण हेच आसक्तीराहित आणि चित्तवृत्ती निरोधीत करून केलेलं कर्म, ज्यामध्ये जीव गुंतत नाही, ते कर्म कोणत्याही नवीन बांधनाला जन्म देत नाही. अश्या जीवाला नैष्कर्मी म्हणतात. आता हे कसं शक्य आहे. तर यासाठी सर्वात प्रथम मी कर्म करतो हा भाव आणि याचा अहंकार, अर्थातच देहाभिमान नाहीसा झाला पाहिजे.
कारण देह आणि त्याच्या अस्तित्वाचा अहंकार बद्धता निर्माण करतो. याऊलट त्या कर्मातील मी जर नाहीसा झाला, तर मी करत नाही, हा भाव दृढ होईल. हा भाव जीवाला, त्या कर्मात बद्ध होऊ देणार नाही. पण हे साधायला गुरुकृपा असावी लागते. कारण गुरूंवरील समर्पणाची भावना, माझ्यातील मी पण टाकायला लावते. एकदा मी पणाचा त्याग केला की, कर्मामागील वासना विसरायला लावते.
जिथे वासनारहित कर्म घडतं, तिथे कर्मातील बद्धता येत नाही. म्हणजे तिथे मी नाहीसा झाला आणि जे घडतं ते देहाने घडतं, हा समज दृढ होतो. म्हणजे देह करतो देह भोगतो. या भावाला आपल्या मनात स्थिरपणे स्थापित केल्यावर, घडणारं प्रत्येक कर्म तटस्थ व त्रयस्थ भावाने पाहता व जाणता येतं.
कर्मातील दोष म्हणजे कर्मामागील अशुद्ध भाव. हे भाव किंवा या अश्या भावाने केलेली कर्म, पुढील फलाला जन्म देतात. म्हणजे देहाच्या उपभोगात मनाचा सहभाग, वासनेत घडलेलं कर्म. म्हणजेच कर्तव्याच्या थोर भावनेने केलेली कर्म, ज्यामध्ये मनाच्या गुंतवणुकीला स्थान नसणं. म्हणजे कर्म तर घडतंय, पण त्यातील आसक्ती व अहंकार किंवा मीपणा संपल्यामुळे, कर्म केल्याची जाणीव नष्ट होते.
यावर अजूनही चिंतन अपेक्षित आहे, पण उद्याच्या भागात. तोपर्यंत नामात मन गुंतवण्याचा प्रयत्न करूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१७/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment