भोग आणि ईश्वर ४०८
आत्मज्ञानाची कवाडं उघडून जगतापलीकडे व देहातीत भावना प्राप्त झालेला, ज्ञानी माणूस, शांत मनःस्थितीला गेलेला असतो. सर्वसामान्य माणूस भोगांच्या काळात निराश, हताश वा नकारात्मक मनःस्थितीत जाण्याची शक्यता असते. कारण त्याला कर्मफल तर्क माहीत असला तरी त्यांची संगती लावून आपल्या मनाला, त्याआधारे, तटस्थ वा त्रयस्थ मनःस्थितीत ठेवणं, हे भोगांच्या काळात कर्मकठीण काम आहे.
कारण अश्या काळात माणूस सर्वात प्रथम विचार करतो तो लाभहानीचा. म्हणजे सर्वसामान्य मन हे एकप्रकारे व्यापारी विचार करतं. म्हणजे असं की, मी इतकं इतकं नेहमी करतो, तर त्या बदल्यात इतकं इतकं तरी मिळायला हवं. हा ढोबळ मानाने केलेला हिशोब, संपूर्ण आयुष्य, प्रत्येक दुःख व भोग प्रसंगात करत राहतो.
साधारण आपण सर्वसामान्य माणसं, देणं आणि घेणं या दोन गोष्टीत आयुष्याचे बरेचसे प्रसंग किंवा बहुदा सर्व आयुष्य मोजतो. त्यामुळे आपण आयुष्यभर देवघेव या मनःस्थितीतून कधीही बाहेर येत नाही. म्हणूनच भोग, दुःख आल्यावर सर्वात प्रथम आपण माझ्या नशिबात का. मी तर चांगला आहे किंवा इतका काही वाईट नाही. मग मला हे का. या व्यावहारिक भाषेत आणि भावनेत आयुष्य जगतो तो सामान्य.
याच भावनेत प्रत्येक गोष्ट तुलनात्मक पद्धतीने मनाला बुद्धीला सतत आपण काय केलं किंवा काय केलं नाही, या मानसिकतेत आपण प्रत्येक क्षण, एकाच दिशेने विचार करतो. मुळात ज्यावेळी कर्म आणि कर्मफल हे गणित समजतं, त्यावेळी बरीचशी कोडी सुटलेली असतात. पण मानव हा प्राणी मुळात जे समोर दिसतं, त्यावर सर्वात प्रथम विश्वास ठेवतो. तर्कसंगती ही ततपश्चात काम करते.
पण ही तर्कसंगती, मनाच्या पायावर उभी असते. त्यामुळे मन जसं आणि जितकं सशक्त व बलवान असेल, तितका माणूस या संगतीवर अर्थात कर्म व फल यांच्या संगतीवर ठाम विश्वास ठेवतो. पण मन जर कमजोर वा दोलायमान असेल, तेंव्हा हा विश्वास कमजोर असतो. विश्वास कमजोर, त्यामुळे कर्म व फल यावर माणूस ठाम राहू शकत नाही.
म्हणूनच खरं ज्ञान हे आधी, या मनाची कमजोरी घालवतं. विधाता, त्याची विश्वरचना, त्यातील आपलं अस्तित्व, विश्व रचनेची कार्यपद्धती, त्यातील काही ठाम नियम व ठाम गोष्टी, ईश्वराच्या अस्तित्वाचे ढळढळीत पुरावे, ते नाकारणाऱ्यांचे तकलादू तर्क, ईश्वराला मुळातच काहीही मिळवायचे नाही, हे सत्य ज्ञान झालं की, माणूस बुद्धीने, विचाराने, वागण्याने, स्थिर होतो.
म्हणजेच विश्वाच्या या पसाऱ्यात, माझ्यासोबत घडणाऱ्या गोष्टी या माझ्या आत्मरुप अस्तित्वाला पुढे नेण्यासाठी आहेत आणि माझं देहरुप अस्तित्व आणि आत्मरुप अस्तित्व, हे दोन्ही माझ्याच पुढील प्रवासासाठी असलेल्या पूरक गोष्टी आहेत. म्हणूनच, आत्म्याच्या उन्नतीसाठी व आत्मतत्वाला पुढील आयुष्यात उत्तम लोक व उत्तम देहप्राप्ती व्हावी यासाठी देहप्राप्ती आहे. अश्या अनेक गुह्य गोष्टी जाणल्यावर बुद्धी, मन व एकूणच देह स्थिर व्हावा आणि या तिघांनी आत्म्याच्या उन्नतीचा सर्वांगीण विचार केला पाहिजे.
यावर अजून सखोल चिंतन उद्याच्या भागात करूया. पण नामाच्या सहाय्याने पुढे जात रहात.
भोग आणि ईश्वर भाग १ व २ पुस्तक स्वरूपात उपलब्ध आहे. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधल्यास, पुस्तक मागवता येईल.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१२/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment