भोग आणि ईश्वर ४१०
आज संक्रांत आहे. त्यानिमित्ताने, संक्रातीचा अर्थ समजून आपण पुढे जाऊ. संक्रमण म्हणजे एखाद्या बिंदूवरून, ठिकाणा वरून वेगळ्या दिशेला वळणे. म्हणजे आपण एखाद्या सीमेपर्यंत जाऊन, त्याला स्पर्श करून, मग तिथून पुन्हा आपल्या मार्गाने माघारी येणे. खरतर पृथ्वीच्या विशिष्ट भ्रमणामुळे, वर्षातून दोन वेळा सूर्य, एकदा उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि एकदा दक्षिणे कडून उत्तरेकडे येतो.
त्यातील एक कर्कवृत्तावरून सूर्याचं दक्षिणेकडे प्रयाण, म्हणजे दक्षिणायन. म्हणजे कर्कवृत्त किंवा कर्कराशीला स्पर्श करून, सूर्य पुन्हा दक्षिणेकडे निघतो. त्यानंतर दक्षिणेकडे पूर्ण जाऊन, मकरवृत्ताला किंवा मकरराशीला स्पर्श करून पुन्हा उत्तरेकडे निघतो. वास्तविक अर्थाने हे सूर्याचं चालणं वा फिरणं नसतंच. तर पृथ्वीचं स्वतःबरोबर सूर्याभोवती फिरण्यामुळे निर्माण झालेला हा आभास आहे, हे त्यामागचं खरं ज्ञान आहे.
याचं कारण आपलं पृथ्वीवरील अस्तित्व. ज्यामुळे आपल्याला हे सर्व आभासी बदल, खरे भासतात किंवा वाटतात. पण परिस्थिती वेगळीच आहे. हे वैश्विक सत्य खरतर भारतीय ऋषीमुनींना पुराण काळापासून ज्ञात होतं. म्हणूनच भारतीय खगोलशास्त्र व ज्योतिषशास्त्र, यामध्ये, या सर्व गोष्टी, पुराण काळापासून, गणितीय परिभाषेत मांडल्या आहेत. त्याचं मूळ वेदांमध्येसुद्धा सापडतं.
अनेक ऋषीमुनींनी यावर आधारित, भृगुसंहिता यांसारखे अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहून आपल्या सनातन संस्कृतीच्या ज्ञानाच्या रुंदावलेल्या कक्षा दाखवून, या जगताला उपकृत केलं आहे. हे सर्व ज्ञान हेच सिद्ध करतं की, या जगताबाहेरील अनेक गोष्टींचा परिणाम सकृतदर्शनी पृथ्वीवरील, वातावरणावर होतो. आपण हे जाणतोच की, हे जगत लहरीस्वरूपात आहे, सर्व गोष्टी लहरि रूपात प्रसारित होतात. त्यावरच सर्व काळाचं गणित ठरतं.
आपली कर्म लहरी स्वरूपात, एका विशिष्ट बिंदूपर्यंत अवकाशात पोचतात आणि त्यानंतर, ठराविक काळाने परिणाम स्वरूप, समोर येऊन, आपल्याला प्राप्त होतात. पण ते आधी त्या बिंदूपर्यंत जाऊन स्पर्श करून येतात, जो त्या प्रत्येक कर्माचा संक्रमण बिंदू असतो. यात महत्वाची गोष्ट ही, की, त्या संक्रमण बिंदूला स्पर्श करून पुन्हा मागे फिरणाऱ्या सुर्य भ्रमणाला या संक्रातीला, आपण जेव्हा शुभेच्छा देतो, तेंव्हा आपण हे ध्यानात ठेवावं, अश्या प्रत्येक कर्मसंपातबिंदूसाठी प्रत्येकाने स्वतःला शुभेच्छा देणं गरजेचं आहे.
कारण त्या कर्मसंपात बिंदूला स्पर्श करून, परत येणाऱ्या प्रत्येक कर्मसंक्रमणासाठी आणि येणाऱ्या फळाला प्राप्त करण्यासाठी आपण नेहमी तयार असावं. पण त्याआधी किंवा सर्वात आधी हो त्याआधी, कर्मसंपात बिंदूकडे निघणाऱ्या प्रत्येक कर्माचा धागा, जो आपल्यापासून सुरू होतो, त्या आपल्यापासून निघणाऱ्या धाग्याला आपल्या पासून सोडण्याआधी, प्रत्येक कर्म विचारपूर्वक, निष्ठा पूर्वक केल्यास, संक्रमण करून येणाऱ्या प्रत्येक कर्म फलाचा विचार करण्याची वेळ येणारच नाही. हे साधण्यासाठी, काय करावं याचं चिंतन, उद्याच्या भागात पाहूया.
भोग आणि ईश्वर भाग १ व २ पुस्तक स्वरूपात उपलब्ध आहे. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधल्यास, पुस्तक मागवता येईल.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१४/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment