भोग आणि ईश्वर ४१६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
एकूणच विषय, वासना, माया, मोह हे सर्व आत्म्याला ग्रासणारे साप आहेत, पण ते शर्करा वेष्टनात आहेत. थोडं अतर्क्य आणि काल्पनिक वाटतं, पण सत्य आहे. कारण हे सर्व देह,बुद्धी व मुख्यतः मन यांना ग्रासतात. त्यांच्या सेवनातून एक प्रकारचा आनंद किंवा मद प्राप्त होतो. म्हणजे त्यातून एक सुखाची अनुभूती प्राप्त होते. ती अनुभूती त्या विषय व वासनेभोवती, देह मन व बुद्धी यांना गुंतवून ठेवते.
म्हणजे मनाची देहाची धाव त्याकडे सतत होते. ज्यामुळे बुद्धी त्या विष्यसुखांना प्राप्त करण्याचे मार्ग शोधून, त्यांना देह आणि मन यांसाठी प्राप्त करण्याचं मुख्य कर्म, देहाकडून करवून घेते. म्हणजे मोह किंवा लोभ किंवा काम वा क्रोध आहेत, मन व देह यांच्या आनंदासाठी. पण देह एकटा किंवा मन एकटं प्रत्यक्ष कर्म करू शकत नाही. त्यासाठी दोघांनाही बुद्धीच्या सहाय्यची गरज असते. म्हणूनच या तिन्हींच्या एकत्र येण्याने अनेक चुकीच्या गोष्टी केल्या जातात.
सकृतदर्शनी यातील काही सांसारिक कर्मबंधनातील असतात आणि काही अनावश्यक असतात. सांसारिक कर्मातील असे षड्रिपु संगदोष, पुढील अपेक्षांना आणि त्यायोगे कर्मांना जन्म देतात, ज्या संसारोपयोगी असल्या तरी कर्मफल निर्माण करतात. त्यामुळे पुन्हा बद्धता येते.
ज्या अनावश्यक असतात, त्या अनिष्ट कर्मांना जन्म देतात आणि त्याद्वारे घातक कर्मफल निर्मिती करतात. मायेचा, मोहाचा हाच पाष आत्म्यावर निरंकुश सत्ता गाजवतो आणि ते ते सर्व करवून घेतो, जे वास्तविक अनावश्यक आहे. म्हणजे ज्यावाचून अडणार नाही, पण मन देह त्याकडे आकर्षित होऊन, त्यांच्या प्राप्तीचे भिन्न भिन्न व नैतिक अनैतिक मार्ग बुद्धी चोखाळत जाते आणि देह व मन यामागे ओढली जाते.
हीच अविवेकी बुद्धी, विचारांना विकारांच्या दावणीला बांधून, सारासार विचार व नीती बासनात गुंडाळून ठेवते. म्हणजे संसारात काम हा मात्र प्रजोत्पादन या क्रियेपुरता मर्यादित असावा आणि तोदेखील स्वस्त्रीपुरता. पण बुद्धी मन हे देहाच्या गरजांमागे, ओढले जातात आणि नन्तर मन व बुद्धी दोन्ही, त्या मोहात गुंतले जाऊन, तिन्हींना ग्रासून टाकते. मानवाच्या अधोगतीला एखादा रिपुसुद्धा पुरेसा आहे.
यातून अनावश्यक फलशृंखला निर्माण होते. ज्यांना पूर्ण करण्यासाठी, अनेक जन्मांची साखळी आपणच तयार करतो.पण ज्यावेळी हे फलरूप,वेगवेगळ्या परिणामांच्या स्वरूपात वास्तवात येतं, त्यावेळी आपण या जन्मात बरेच पुढे गेलेलो असतो किंवा पुढील जन्मात गेलेलो असतो. त्यावेळी या फलांच्या किंवा परिणामांच्या प्राप्त होण्याने, मन चक्रावून जातं, त्या परिणामांची संगती न लागल्यामुळे.
म्हणूनच या सर्वात, यथार्थाचं ज्ञान, परिणामांची बुद्धीला जाणीव आणि या सर्वांतून आत्मजागृती, ही आवश्यक ठरते. तरच विवेक आणि विचार मनावर, मन बुद्धीवर व बुद्धी मन हे दोन्ही मिळून, देहावर नियंत्रण ठेवू शकतात. यावर अजून सखोल चिंतन, उद्याच्या भागात, आवश्यक आहे. पण तोपर्यंत नामाचा श्वासात्मक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आपण करत राहूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२०/०१/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment