भोग आणि ईश्वर ७५
आज सलग पंचाहत्तर दिवस एका विषयाचा धागा धरून लिहीत आहे. यात महत्वाची गोष्ट म्हणजे रोजचं लेखन रोज करून पोस्ट करत आहे. मधल्या काळात एकवीस जानेवारीला मी माझं घर डोंबिवलीहून बदलापूरला शिफ्ट केलं. माझे सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या आशीर्वादाने आणि माझे गृहमंत्री अर्थात सौ प्राजक्ता हिच्या अमूल्य सहकार्याने हे सदर शिफ्टिंगच्या व त्यानंतरच्या त्रासातसुद्धा मी अखंड लिहू शकलो आणि आज सलग पंच्याहत्तरावा दिवस आहे. किंबहुना तिच्या साथीशिवाय इतकं लेखन, गेली पाच सहा वर्षे, करत राहणं शक्य झालं नसतं हे नक्की. त्यामुळे ती अमूल्य अशी 'मम' साथीदार आहे या सर्वांच्या मागे. अर्थात यात वाचकांचं सहकार्य , या विषयावरही निष्ठा, प्रतिक्रियेतून मिळणारं अद्भुत प्रेम याचंही मोल करता येणं अशक्य आहे. त्यामुळे या सर्वांचेच आभार मानून विषयाकडे वळूया.
गेल्या भागात आपण शेवट विकल्पावर येऊन थांबलो. मुळात एखादी गोष्ट निष्ठेने, ध्येय योजून आणि सातत्याने करायची ठरवली की, खरतर त्यात विकल्प यायला नको. विकल्प म्हणजे मी असं मानतो की, एखादी गोष्ट न करण्यासाठी आळसयुक्त मनाने, आपल्या बुद्धीला दिलेलं खाद्य आहे. कारण मन हे सदैव, चांगलं नित्य करावं लागणारं आणि मनाला काबूत ठेवू पाहणारं, कोणतंही काम करताना असहकार्य करणारच. कारण ते एखाद्या लहान मूल अथवा गायीच्या लहान बछड्यासारखं असतं.
लहान मूल बघा तुम्ही जिथे जाऊ नको असं सांगाल तिथे मुद्दाम जाणार. बाऊ होईल किंवा बुवा येईल असं म्हटलं की मुद्दाम करून बघणार. इथे सहज एक माझ्या लहानपणीचा किस्सा आठवला, आई कायम सांगते आठवण म्हणून, अर्थातच कौतुकानेच. मी अगदी लहान म्हणजे कदाचित दीड दोन वर्षांचा असेन. मी खूप लवकर म्हणजे पाच सात महिन्याचा असतानाच बोलायला लागलो आणि र हा उच्चार बोलायला लागल्यापासून स्पष्ट म्हणत आलो, असं आई सांगते. तर लहान असताना तिने मला कधी मांडीवर घेऊन, थोपटून, झोपताना सांगितलं की, डोळे मिट नाहीतर बुवा येईल, त्यावेळी, ती सांगते ,मी उठून बसायचो आणि हट्ट करायचो की, मला बुवा बघायचा आहे. असो
तर मन हे असं चंचल आहे आणि ते एरवीसुद्धा हातात येत नाही आणि सतत आणि संतत विचाराच्या धारेत पळत असतं. त्याला गती देण्याची जरुरी नाही, ते स्वयंसिद्ध आहे. क्षणात अगणित मैलांचा प्रवास करून ते पुन्हा मैलोगणती धावायला तयार असतं. अगदी ज्यावेळी अतिश्रमाने शरीर थकतं आणि विश्रांतीसाठी विसवतं, त्यावेळीसुद्धा, मन मात्र आपल्याच नादात असतं आणि ते मात्र अव्याहतपणे विचारांच्या मागे, वाऱ्यासारखं पळतच असतं. त्याचा वेगही अद्भुत आहे आणि खोलीदेखील प्रचंड आहे. मनाचा ठाव लागता लागत नाही हे सत्य आहे.
मनासारखा वैरी नाही, पण मनासारखा मित्रसुद्धा नाही. खरतर त्याच्याशी एक सखा, दोस्त, मित्र, जिवलग किंवा जवळचा आप्त यादृष्टीने पाहण्याचा प्रयत्न केल्यास ते एखाद्या सच्च्या मित्राप्रमाणे, आपल्याला पूर्ण सहकार्य करून, योग्यवेळी योग्य कामात साथ देऊन जीवनाचा आणि साधनेचा अलौकिक आनंद देतं किंवा देत राहातं,हे सत्य आहे.
मुळात आपल्याला त्याला वळवायच आहे, या नादात वा फंदात पडू नये. कारण ते प्रत्येकवेळी प्रत्येकाला शक्य होईलच असं नाही. म्हणून त्याला आपल्याशी वा आपल्याला त्याच्याशी संवाद साधून, त्याचा हात हातात धरूनच, जीवनाची मुशाफिरी करता आली पाहिजे. हे शक्य आहे, अगदी सहजपणे. हे करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मन आणि बुद्धी यांचं अतूट नातं आहे आणि त्या दोहोंची साथ या कार्यात वा सर्व कार्यात गरजेची आहे,हे ध्यानात घ्या. पण तरीही प्रत्येकवेळी मन आणि बुद्धी एकत्र जातील असंही नाही. पण मनाला समजावून सांगून बोट धरून नेलं की ते आपल्याशी छान हितगुज करतं.
इथे समर्थ रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक आठवतात. त्यांनी मनाला कधीही एकाही श्लोकात दामटून धाकाने काबूत ठेवा असं सांगितलेलं नाही. तर आंजारून, गोंजारून, चुचकारून, समजावून, एखादं लहान मूल आहे असं समजून, त्या जाणिवेने व भावनेने सर्व श्लोक लिहिलेत. कारण धाकाने काबूत आणलेलं मन तितक्याच वेगाने, उसळी मारून, जास्त हाताबाहेर जाण्याचा प्रयत्न करतं. म्हणूनच मनाच्या या प्रवृत्तीला जाणूनच आणि ते मनात योजूनच, समर्थ, त्याला संभाळून घेऊन, त्याला आपल्या सोबत घ्या असा सल्ला व त्यासाठीचा मार्ग प्रभावीपणे सांगतात. पण मनच मनाला समजावू शकेल का. नाही.
इथे एक गोष्ट लक्षात घ्या. समर्थानी मनाला समजावलं आहे. पण सहसा कोणालाही त्रयस्थ समजावतो. म्हणजेच मनाला कोणीतरी समजावलं पाहिजे, हे समर्थांना अपेक्षित आहे.तोच मार्ग मलाही अपेक्षित आहे. हा त्रयस्थ कोण तर दोन जण, बुद्धी आणि अंतरात्मा.
कसं ते पुढील भागात पाहू.
चिंतन करा, विचार येतील आणि त्यातील सद्विचार घेऊन पुढे जा, मार्ग सापडतील.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१३/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment