Skip to main content

राम अनुज भरत भाग ७५

राम अनुज भरत भाग ७५

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले

मांडविचा निरोप घेतल्यावर, भरत हा, शत्रुघ्न आणि शृतकिर्ती याना एकत्र बोलावून, शत्रुघ्नचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन म्हणाला. 

" हे शत्रू विनाशक, शत्रुघ्न आणि शृतकिर्ती, ज्येष्ठ भ्राता अधिपती श्रीराम आणि देवी सीता जर, घटना प्रवाहाच्या एका टोकाला उभे राहून, प्रत्यक्ष नियतीला सामोरे गेले असतील, तर तुम्ही दोघे, नियतीच्या घटनारूप शृंखलेच्या दुसऱ्या टोकाला आहात. अर्थातच, जे महत्तम दायित्व ज्येष्ठ भ्राता आणि देवी सीता निभावून नेत आहेत, त्याच दायित्वाच्या महत्वाच्या कार्याचा भार नियतीने तुम्हाला सोपवला आहेत. 

याचं महत्वाचं कारण म्हणजे, नियतीच्या या कोड्याचा प्रत्यक्ष भेद करणारा जितका महत्वाचा असतो, तितकाच महत्वाचा सहभाग, दुसऱ्या टोकाला उभे राहून, दुसरी बाजू कणखरपणे सांभाळणाऱ्याचां असतो. तुम्हाला या सर्वात, अत्यंत महत्तम कार्य हे आहे की, वचन बद्ध ज्येष्ठ भ्राता, चौदा वर्षे पुन्हा परत येई पर्यंत, तीनही मातांना, सांभाळून, त्यांची मानसिक व आत्मिक ऊर्जा स्थिर राखून, बांधून ठेवणं, हे कार्य करायचं आहे.

आणि हे कार्य जितकं वाटतं, तितकं सहज नाही. कारण स्वतः स्वतःला धीर देऊन सावरणं गोष्ट वेगळी आहे. पण अश्या व्यक्तींना सांभाळून पुढे नेणं, अत्यंत कठीण असतं, ज्यांचा मानसिक आधारच त्यांच्या पासून दूर गेला आहे. त्यांचं समाधान कसं आणि कोणत्या गोष्टींनी करायचं, हे अत्यंत अवघड कार्य आहे. कारण तुम्ही सर्व काही करू शकता, पण ज्येष्ठ भ्राता याना, चौदा वर्षे पर्यंत, उपस्थित करू शकत नाही, त्यामुळेच, त्यांना आत्मिक बळ देण्याचं कार्य तुम्हाला करायचं आहे. 

कदाचित यामधे,प्रसंगोपात वा मातांच्या दुःखातिरेकाने, तुम्हाला सुद्धा अतीव दुःख आणि वेदना होऊ शकतील. कारण चौदा वर्षे हा काही कमी काळ नव्हे. पण तुम्हाला प्रसंगी तुमच्या वेदना, अश्रू, दुःखं, हे मागे ठेवून, क्वचित प्रसंगी, अश्रू, करुणा , वेदना आड लपवून, स्मित वदनाने, त्यांचा भार हलका करायचा आहे. क्वचित प्रसंगी, वया मुळे, दुःखामुळे, आठवामुळे, अतीव मानसिक दौर्बल्या मुळे, त्यांचा मानसिक तोल ढासळू शकतो, पण तुम्हाला सर्व प्रसंगात, तुमचा तोलज्येष्ठ भ्राता श्रीराम, यांच्यावरील निष्ठा, दृढतेने धरून, राहावं लागेल. 

या सर्वांमध्ये, तुमच्या त्रासाची, वेदनेची, दुःखाची सांत्वना कोण करणार. पण अश्यावेळी कधीही, कोणत्याही वेळी, येऊन तुम्ही माझ्याजवळ तुमचं मन हलकं करू शकता. तरीही तुम्हाला आधार द्यायला,आर्य सुमंत, तथा कुलगुरू महर्षी वसिष्ठ निश्चितच सहाय्य भूत होतील, यात कोणतीही शंका बाळगायची आवश्यकता नाही. 

कारण राज्य कारभाराचा आणि प्रशासन व्यवस्थेची प्रदीर्घ कारकीर्द लाभलेले आणि पिताश्री स्वर्गीय महाराज दशरथ, यांच्या सोबत अनेक वर्षे काम केल्यामुळे, अनेक बिकट प्रसंगांचा अनुभव गाठीशी असलेले असे दोघेही जण आहेत. मला सार्थ विश्वास आहे की, तुम्ही दोघेही, आपलं दायित्व, पुढील चौदा वर्षे, अविरत सांभाळाल." 

इतकं बोलून, भ्राता भरताने, शत्रुघ्नला दीर्घ आलिंगन दिले. धीरोदात्त असलेले दोघेही बंधू, प्रसंगोपात, आपलं कनिष्ठपण विसरून आता दोघेही ज्येष्ठ असल्याप्रमाणे, आपल्या अश्रूंना बांध घालते झाले. श्रीराम लक्ष्मण यांच्या प्रमाणेच, हे दोघेही, प्रदीर्घ काळ एकत्रित सहवास करत असल्यामुळे, एकमेकांशी मनाने व हृदयाने बद्ध होते. त्यामुळे ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांच्या अनुपस्थित, भ्राता भरत, त्या जागेवर, मनाने दृढ भाव धरून, उभा होता आणि भ्राता लक्ष्मण याच्या जागी भ्राता शत्रुघ्न, स्थिर होता. 

शत्रुघ्न आणि शृतकिर्ती यांनी सुद्धा, भरताचा निरोप घेतला आणि तेसुद्धा आपल्या रथात आरुढ झाले. शृतकिर्ती माता कैकयीचा सोबत तिच्या रथात आणि शत्रुघ्न माता कौसल्या आणि माता सुमित्रा यांच्यासह, अयोध्येला प्रस्थान करते झाले. सर्व रथ, सैन्य, अश्वदळ, गजदळ यांच्या जाण्याकडे आणि त्याने उडालेल्या धुराळ्याकडे, एकटक पहात, आपल्याच विचारात हरवलेला भरत, निश्चल उभा होता. 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
२३/०८/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...