राम अनुज भरत भाग ५८
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
माता सुमित्रा म्हणाली.
" अरे रामा, हे काय करतो आहेस. मातेपुढे हात जोडून, कोणी कधी आर्जव करतो का. अरे का मला पापाची भागी करतोस. जसा माझा लक्ष्मण आणि शत्रुघ्न, तसाच तू सुद्धा आहेस की. जसं तू कर्तव्य श्रेष्ठ मानून, हे करतो आहेस ना, त्याचं तुझ्या कर्तव्यात, आमचा जो काही सहभाग अपेक्षित आहे, तो आम्ही प्रत्येकजण, नक्कीच देऊ. कदाचित नियतीची सुद्धा अशीच अपेक्षा असणार."
माता पुढे म्हणाली.
त्यामुळे, जे काही आपल्या परिवारात, नियती इच्छेने घडलं आहे, घडत आहे आणि यापुढेही घडेल, त्यात प्रत्येक सदस्याचा सहभाग हा नाईलाज म्हणून नसेल तर, तुझ्या कर्तव्य पालनात, आमचा उपयुक्त सहभाग म्हणून असेल. कौसल्या ताईंची कोणतीही चिंता,तू करू नकोस. मी मांडवी, शृतकीर्ती शत्रुघ्न आम्ही आनंदाने, पार पाडू. तुझ्या सुखरूप येण्याची प्रतीक्षा अत्यंत अपेक्षित आणि आतुरतेने आम्ही करत राहू.
परंतु तू या कर्तव्याच्या पथावर,कुठेही,मागचा, परिवाराचा आमच्या निष्ठेचा विचार करू नयेस. हेच सर्वथा उचित आहे. तू मात्र, जानकीची काळजी घे. तुझी चिंता व रक्षा करायला, माझा पुत्र लक्ष्मण संमर्थ आहे, हे नक्कीच."
मातेला स्मरण होतं की, आपलं हे बोलणं ऐकून, रामाच्या लोचनातून अश्रुधारा सुरू झाल्या. या सर्व आठवात, विचारात असतानाच, मांडवीच्या प्रश्नाने माता सुमित्रा, भाव समाधीतून, बाहेर आली. मांडवीने मातेला, म्हटलं. .
" माता सुमित्रा, आपण फलाहार आणि स्निग्धाहार करून घ्यावा. आपण काल रात्री फार आहार केलेला नाही आणि प्रभात समयापासूनसुद्धा काहीही अन्न ग्रहण केलेलं नाही. आपणही माता कौसल्या यांच्याप्रमाणे, वर्तन केल्यास, त्यांना सांभाळण्याचं दायित्व कोण निभावणार."
मांडवीचा हा स्नेह पूर्ण हट्टाग्रह आणि हे निर्व्याज दटावून बोलणं, सुमित्रा मातेला, मनातून भावलं. मातेने सूचक स्मित वदनाने, मांडवीला होकार देताच. मांडवीने आधीच काढून ठेवलेला,फळांचा गर सोन्याच्या वक्राकार पात्रातून आणि उत्तम फुलांचा स्वादयुक्त मधुरस सोन्याच्या पेल्या मधून, माते समोर धरला. मातेने आधी फळांचा गर आधी चाखून बघितला.
त्याचा उत्तम स्वाद, वेलची सह, अनेक पौष्टिक घटकांनी सजवलेला तो फळांचा गर, मातेने मोठ्या हर्षाने संपवला. तदनंतर,अनेक फुलांच्या मधूपासून तयार केलेला मधुरस, त्याच्या स्वादिष्टपणामुळे, पेलाभर, सहज समाप्त झाला. मातेला जरा हुशारी आली आणि पोटात काही नसल्या मुळे आलेली ग्लानी दूर झाली. त्याबद्दल मातेने अर्थातच, मांडवीचं कौतुक केलं. असा हा सासू सुनांचा, मायलेकी सम, सुसंवाद, पाहणाऱ्याच्या कौतुकाचा विषय होत होता.
जनक राजाचे राज संस्कार, चारही मुली, पदोपदी आणि प्रत्येक प्रसंगात, आपल्या कृतीतून, सहजी दाखवून देत होत्या.त्याचप्रमाणे,अयोध्येतील मातांची स्नुषांवर, लेकी समान ममता,हा समस्त अयोध्येच्या जिव्हाळ्याचा विषय होता.
इकडे हा सुखसंवाद सुरू असतानाच. तिकडे, शृतकिर्ती, जी कैकयी मातेच्या समीप बसली होती,ती माता कैकयीच्या खिन्न, उदास व दुःखी असण्याने, चिंतित होती.
ती विचार करत होती की, आज येताना, ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांनी, आर्य शत्रुघ्न यांना, माता कैकयीची विशेष काळजी घेण्यास सांगितले होते. माझं दायित्व, त्यामुळे वाढलं आहे. कारण आर्य तर, राज्य कारभार कारणाने, अनेक व्यापात व्यस्त असतील. त्याकारणाने, ज्येष्ठ भ्राता श्रीराम, यांच्या मनिषेची चिंता आपल्याला वाहणं सहज आणि स्वाभाविक आहे, जरी आर्य शत्रुघ्न यांनी तसं काही सांगितलं नाही तरीही.
ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा.
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
०५/०८/२०२३
9049353809
9960762179
Comments
Post a Comment