नाम अवतार कलियुगी - ११
पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे सृष्टिची रचना विधात्याने एक कल्पना म्हणून केली आहे. यात आपल्याच अंतरात्म्याचा परमांश पंचमहाभूतांच्या (पृथ्वी , आप, तेज , वायु व जल) सहकार्याने पृथ्वी नामक या ग्रहावर प्रस्थापित केला. आणि विधात्याचा खेळ सुरु झाला. आता यातून अनेक प्रश्न निर्माण होतात :
१. जर हा खेळ आहे तर आपण खेळातली प्यादी आहोत का
२. तस नसेल तर मग काय आहे
३. विधात्याने मुळात याची रचना फक्त स्वतःच मन रमाव याच
साठी केली असेल तर मग आपलेच प्रतिरूप निर्माण न करता सजीव, निर्जीव, जन्म, म्रत्यु, पाप, पुण्य, स्वर्ग, नरक हा द्वैताचा पसारा का निर्माण केला.
४. यातूनच निर्माण होणाऱ्या अनेक प्रश्नांची व उपप्रश्नांची दखल घेण्याचा प्रयत्न करूया.
एक नककी की मागील लेखात सांगितल्याप्रमाणेच विधात्याने सर्व सौरमंडल, ग्रह तारे, जे निदान दिसत आहे ते ते सर्व एका विशिष्ट गणितीय नियमात बांधून टाकले. जेणेकरून त्यात कोणालाही दखल देण्याची जरूर पडणार नाही. कर्म फल ही साखळी त्याचाच एक भाग आहे.
यात आपली भूमिका नक्की काय हाच मूलभूत प्रश्न आपण सध्या बघुया. एक नक्की की विधात्याच्या निर्मित नियमानुसार सर्व सृष्टिचक्र हे चक्राकार असाव. जसे सर्व ग्रह,तारे इत्यादि. म्हणजेच कर्म फल ही साखळी सुद्धा चक्राकारच असणार. म्हणजे प्रत्येक चांगल्या गोष्टी नन्तर वाईट घटना वा गोष्टी असणार, अर्थात आपापल्या कर्मानुसार. म्हणजेच एक कर्मफल भोगत असताना त्याच वेळी आपण दूसर कर्म करून पुढील कर्मफल आपल्याच साठी मांडून ठेवतो.
हेच चक्राकार चालू असणार वा राहणार. आणि हेच असेल तर मग नित्य कर्म करणे आणि पुढील जन्मी मागील बाकीं नेऊन पुन्हा हेच चक्र सुरु ठेवणे. इथे खरी मेख आहे. जिथे जिथे विधात्याने प्रश्न निर्माण केलेत , विश्वास ठेवा तिथे तिथे विधात्याने उत्तर निर्माण करून ठेवलित. पण स्वतःच निर्माण केलेल्या या जीवनचक्राची गुरुकिल्ली देऊन खुप खुबीने वेळोवेळी आपल्याला सोड़वण्यासाठी मदत केली आहे . आणि या चक्राचा भेद करून मूळ स्वरूपाकडे आत्म्याला घेऊन जाणारी ती किल्ली आहे 'भक्ति'. नवविधा स्वरुपात असलेल्या या भक्तीचे गुणवर्णन आपण अनेक ठिकाणी वाचले असेल. उद्याच्या भागात त्याचा परामर्श घेऊ.
आजपुरत इथेच थांबु. भेटूच उदया पुन्हा
श्री गुरुवे नमः
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
१२/१०/२०१७
Comments
Post a Comment