नाम अवतार कलियुगी - ४
मनाचा आणि बुद्धिचा समसमा संयोग ही एक अपूर्व गोष्ट असते, मानवाच्या बाबतीत. ती ज्यांच्या बाबत घडते ते खुप मोठी मोठी आणि गुंतागुंतीची काम लीलया करतात आणि त्यालाच भगवंतांची लीला किंवा चमत्कार म्हणता येईल. वास्तविक हा आपल्या दृष्टीने चमत्कार असला तरी ती शास्त्रीय दृष्टया साध्य आणि सिद्ध करता येण्याजोगी गोष्ट आहे व असते.
निसर्ग चक्राबाबत म्हणा किंवा एकूणच जगातल्या घडामोडींबाबत म्हणा कोणतीही गोष्ट, वस्तु, परिणाम, घटना वा फल हे कारणाशिवाय असत नाही. हे निर्विवाद सत्य आहे. मुळात तत्वतः चमत्कार असत नाही तर ते आपल्याला भासमान चमत्कार असतात, पण वास्तविक त्यामागे निश्चित कार्यकारण भाव हा असतोच असतो. कारण नियमाना तोडण्याच वा झुगारण्याच स्वातंत्र्य आणि संमति परम शक्तिला सुद्धा नाही. म्हणून आजपर्यंत एक सुद्धा दुष्ट प्राणी वा राक्षस हा, त्याला विधात्याने दिलेल्या वरदानाच्या चौकटी बाहेर जाऊन, मारला नाही हे नककीच.
तर वास्तविक मन आणि बुद्धि यानी मिळून व संवादाने वा संयुक्तपणे काम करणे अपेक्षित आहे . नव्हे तरच विधात्याच्या अपेक्षित उद्देशाकडे मानव जाऊ शकतो. पण प्रत्यक्ष पाहिल्यास हे फार थोड्या माणसांना शक्य होत. त्यापैकी काही ते या जन्मी प्रयत्न पूर्वक साध्य करतात तर काहीना ते वारसाहक्काने मागील जन्मिच्या पुण्याईने प्राप्त झालेल असत. याची अनेक उदाहरण देता येतील , काही पौराणिक दाखले आणि काही आधुनिक
१. पाचहि पांडव श्रेष्ठ होते आपल्या परिने , पण विशेष प्रावीण्य व गुणवत्ता अर्जुनाकडे होती.
२. स्वराज्य स्थापनेच्या हेतुने छत्रपति शिवाजी महाराजांनी केलेला प्रत्येक संकल्प, बुद्धि, शक्ति आणि मनाची ताकद या जोरावर आणि आई जिजाउंच्या प्रेरणेने, पुर्णत्वास पोहोचला. अजोड कर्मसिद्धांचा परिणाम .
३. स्वातंत्र्य संग्रामात सर्व मार्गानी अगणित वीरानी केलेला क्रमयज्ञ अखेर सफल झालाच.
इत्यादि.
हेच शक्य आहे, जेंव्हा बुद्धि आणि मन एकत्र एकमताने काम करत असतात तेंव्हा . म्हणजेच मन एकाग्र करून काम करतात तेंव्हा.
आता ही मनाची एकाग्रता मिळवायची कशी.आता हे पुढच्या भागात बघु.
.
श्री गुरुवे नमः
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
०४/१०/२०१७
Comments
Post a Comment