नाम अवतार कलियुगी - १२
जरी अनेक प्रकारात विभागली गेली असेल तरी माझ्या दृष्टीने भक्ति ही भक्ति आहे. आणि कोणत्याही एका प्रकारात मांडता येणारी साधिसुधी गोष्ट म्हणजे भक्ति नव्हे. परम् आत्म्याचा आणि भौतिक शरीरात वास करणाऱ्या आत्म्याचा सुंदर संगम साधून देण्याचा प्रवास म्हणजे भक्ति. दोन विलग झालेल्या जीवाना एकत्र आणण्यासाठी भगवंतानी योजलेली एक कार्यप्रणाली म्हणजे भक्ति.
कर्म करणे आणि त्याच्या फलाची वाट बघणे आणि या चक्रात अडकणे अशीच गत माणूस धरुन सर्व प्राण्याची झाली आहे. या सर्वातून बाहेर पडाव अस ज्याला वाटल त्याने लढाई जिंकण्याची तयारी केली हे नककी. म्हणजेच यातून हेच सिद्ध होत की यातून बाहेर पड़ाव हा विचार म्हणजेच कर्म त्या त्या व्यक्तीला करण गरजेच आहे. म्हणजेच पुन्हा कर्म श्रेष्ठ.
इथे एक प्रश्न उभा राहतो की , अस वाटण हे देखील पुर्वकर्मावर अवलबुन आहे का. आणि जर तस असेल तर प्रत्येकाला ती वेळ येईपर्यन्त थांबणे गरजेच आहे का. मग तस असेल तर प्रत्येक प्राण्याची त्याच्या त्याच्या कर्माच्या क्रमानुसार या फेऱ्यातून सुटण्याची वेळ कधी असेल हे परमेश्वर जाणे. मग यावर काही उपाय नाही का की मानव कोणत्याही जन्मी इच्छा झाली की यातून सुटण्याचा प्रयत्न करू शकतो.
याच उत्तर हो असच देता येईल. निश्चय आणि इच्छा ही दोन शस्त्र असतील तर कोणतही काम कठीण नाही हे नककी. पण, हा पण महत्वाचा आहे. हे करण्याची बुद्धि, इच्छा, आणि निश्चय याचा मेळ कसा, कधी जमावा याचच गणित कस सुटाव.
पाहुया पुढील भागात .
आजपुरत इथेच थांबु. भेटूच उदया पुन्हा
श्री गुरुवे नमः
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
१३/१०/२०१७
Comments
Post a Comment