नाम अवतार कलियुगी - ३
शरीरामुळे प्राप्त झालेली बुद्धि , शरीरान्तर्गत भगवंताचा अंश असलेला आणि समस्त ब्रम्हांड सामावलेला अंतर्यामी आत्मा, याना साधणारा दुवा म्हणजे मन , आणि या सर्वाची मिळून तयार झालेली व्रुत्ति ह्या काहीश्या अगम्य आणि अतर्क्य वाटणाऱ्या गोष्टी आहेत . या परस्परांशी संबंधित तरीही स्वतंत्र आणि म्हणूनच गुंता गुंतीच्या आहेत . या सर्वांचा थोड़ा विस्ताराने अभ्यास करूया
बुद्धि ही शरीरापासुन जन्मतः मिळालेली देण आहे. बुद्धिची झेप ही शरीरान्तर्गत मर्यादां वर अवलंबित असते. बऱ्याच प्रमाणात . त्याची सांगड इतर गोष्टिंशी घातली की हिच बुद्धि प्रचंड काम करते. पण ही बुद्धिमत्ता जशी आहे तशी मिळण हे पूर्वपुण्याईवर आणि कर्मफलावर अवलंबून आहे. कर्मगतिच्या नियमानुसार प्रत्येक कर्माच चांगल वाइट फळ हे योग्य वेळी म्हणजेच ते फळ पक्व झाल्यावर मिळत. (कर्म आणि कर्मफल हा एक वेगळा विषय होईल. बघुया खुप गहन आहे गुरुकृपेने जमल्यास या विषयाला हात घालीन.) पण नन्तर. यांच् बुद्धिच्या जोरावर मानवाने अपार परिश्रम आणि हुशारी यावर खुप प्रगति केल्ये. चांगली आणि वाईट बाजू ,सर्व गोष्टीना असतेच. असो.
बुद्धि प्रगत , प्रगल्भ, असण हा एक भाग आहेच, पण त्याचा वापर करण ही पुन्हा वेगळी बाब आहे . ती योग्य पद्धतीने चालण हे एक वेगळच कोड आहे. एकाग्रता असलेली बुद्धि तिचा वापर आणि त्याचे योग्य ते परिणाम हे लपत नाही . आता ही एकाग्रता जी आपला परिणाम करते ती नककी कशाने साध्य होते हे शोधल तर आपण मनापर्यंत पोचतो.
.मन हा विधात्याने मानवाला दिलेला एक विलक्षण दागिना आणि ठेव आहे. ही अशी गोष्ट आहे जीचं अस्तित्व दाखवता येत नाही, वेग पचवता येणार नाही इतका, गति अणुपासोनि ब्रम्हांड एका क्षणात , मति कुंठित करणारी आणि थक्क करणारी कर्तबगारी , आणि तरीही हाती न येण्याइतकि चपळता. या मनाची एकाग्रता साधण्यासाठी काही जण आयुष्य आयुष्य घालवतात, योग याग सर्व करतात आणि तरीही साध्य होइलच याची शाश्वती नाही. आणि एखाद्याला तेच जन्मतः साध्य झालेल असत. हे खुप मोठ गूढ गुपीत आहे.
पण हेच बुद्धि आणि मन एकत्र आले तर अनेक असाध्य वाटणाऱ्या गोष्टी सहज साध्य करू शकतात. मग त्या चांगल्या असोत वा वाईट. परिणाम न जाणता सुद्धा योग्य तो परिणाम साधतातच. ही एक अशी जोड़ी आहे ज्याच्या जोरावर मानवाने पूर्वी प्रत्यक्ष देवाला सुद्धा हतबल होण्यास भाग पाडलय , आणि प्रसंगी देवाना सुद्धा मदत करून युद्ध जिंकून दिलय असुरांविरुद्ध.
कितीही अगम्य वाटल तरी हे इतिहासात अनेक वेळा सिद्ध केलय. पण ही जोड़ी जमते कशी , कधी आणि हे गूढ साध्य होत कस. बघुया याचा पुढील प्रवास पुढच्या भागात.
श्री गुरुवे नमः
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
०३/१०/२०१७
Comments
Post a Comment