अध्यात्म विराम १६७
सगुणात असलेली मर्यादा व बंधनं जी या ब्रम्हांडात मायेच्या अस्तित्वाने, सर्वांना लागू पडतात. त्यामुळे आपण सगुण रुपातील ईश्वराला पुजतो त्यावेळी, त्या रुपाला सुद्धा ती लागू पडतात व त्या असलेल्या मर्यादा आपण स्वीकारतो, असाच याचा तात्विक अर्थ काढता येईल.म्हणजे आपल्या भक्तीच,साधनेचं फळ आपल्याला त्याचं स्वरूपात मिळतं, ज्याप्रकारे ते सगुण रूप साकार झालेलं आहे आणि असतं. म्हणजेच त्या प्राप्तीला सुद्धा मर्यादा आणि बंधनं लागू पडतात. त्या बंधनाना मान्य करून आपण ते फलित स्वीकारलं, असांच अर्थ काढता येईल किंवा काढावा लागेल.
उदाहरणार्थ, प्रभू कृपेने, या भौतिक जगतातील, एखादी गोष्ट आपण कांक्षिली किंवा प्रार्थिली आणि आपल्या पुण्याईने ती यदाकदाचित प्राप्त झाली, तरीही ती चिरंतन असू शकत नाही. स्थल कालाच्या मर्यादा, येथील प्रत्येक गोष्टीसह त्याही गोष्टींना लागू होतात. याचं कारण ती प्राप्ती, त्या विशिष्ट स्थळ, काळ आणि व्यक्तिपरत्वे असते. म्हणजे देहाचं अस्तित्व संपलं की, त्या प्राप्त गोष्टी नाहीश्या होतात किंवा होऊ शकतात. तसं नसत तर अनेक भक्तांना ईश्वराने स्वतः प्रदान केलेलं ऐश्वर्य, चिरकाल टिकून, आजही अस्तित्वात दिसलं असतं.
म्हणजेच सुदामा, वा अन्य कोणत्याही भक्ताला प्राप्त झालेली समृद्धी, आजसुद्धा अस्तित्वात दिसली असती. किंवा अगदी प्रत्यक्ष ईश्वराने निर्माण केलेल्या अनेक गोष्टी, कालौघात नष्ट झाल्या नसत्या. त्या तश्याप्रकरे नष्ट होण्यात जगताचं चलन वलन सुरळीत राहणं, हे देखील साध्य होतं. म्हणजेच सगुणातील सर्व गोष्टी जगताच्या कल्याणार्थ आहेत, असाच याचा अर्थ निघू शकतो. सगुण रुपातील भक्ती, देहाच्या, बुद्धीच्या व इंद्रिये आणि अवयव यांच्या सौख्य व समृद्धी यासाठी मानली जावी का.
थोडंसं कोड्यात टाकणारा प्रश्न आहे. पण त्याचं उत्तर आपणच आहोत. कसं ते पाहू. आपण आपली साधना व भक्ती ही जेंव्हा विशिष्ट ऐहिक उद्देश ठेवून करतो आणि त्यासाठी जेंव्हा विशिष्ट रुपाला साद घालून भक्ती करतो, तेंव्हा आपल्या भक्तीचा परिणाम म्हणून,आपण इच्छिलेले प्राप्त होईल आणि होते. पण त्याच्या अस्तित्वाला मर्यादा व बंधनं लागू पडतात आणि काळा नुरूप त्यात उणेपणा व अधिकपणा येणार वा राहणार. तो स्वीकारून पुढे जाणं हे अत्यंत आवश्यक आहे. पण हे झालं देहाच्या, भूलोकीच्या आणि जन्माला येऊन संचिताची शिदोरी घेऊन वाटचाल करताना, मागितलेल्या, अपेक्षिलेल्या गोष्टीबद्दल. त्याला असलेली बंधनं व मर्यादा स्वीकारणं हे हितावह आहे.
पण मग चिरंतन, अक्षय आणि अमर्याद प्राप्त करण्याची आपली ओढ, भूक व इच्छा ही फक्त मायेच्या आणि जगताच्या मर्यादेत, राहून मागणं व प्राप्त करणं हे गुणा तीत असलेल्या ईश्वराच्या परम तत्वाने साध्य होऊ, शकतं. पण याला भौतिक जगताच्या मर्यादा लागू न पडता, या जगतातील नाशवंत गोष्टी प्राप्त न करता, या जगतातून बाहेर पडण्याच्या मार्गावर जाण्यासाठी आवश्यक सर्व सिद्ध आणि प्राप्त करणं शक्य आहे.
यासाठी गुणरहित आणि गुणांच्या पलीकडे असलेल्या अश्या परम तत्वाला प्राप्त करण्यासाठी, तश्याच गुण रहित साधनाची आवश्यकता आहे. एक लक्षात घ्या की, या जगतात आलेल्या ईश्वराच्या सगुण अर्थात देहात अवतीर्ण झालेल्या रुपालासुद्धा, अस्तित्वाच्या मर्यादा लागल्या आणि ते देह आले आणि गेले. पण त्या देहाच्या आधी आणि देहाचं अस्तित्व सरल्यानंतर सुद्धा जे शिल्लक आहे ते नाम आणि हे नामच गुण, काल, अस्तित्व आणि देहाच्या मर्यादा यांच्या पलीकडे आहे.
याचं चिरंतन निर्गुण साधनाबद्दल आपण उद्याच्या भागात पुन्हा पुढे चिंतन सुरू करुया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२५/०४/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment