श्रीरुक्मिणी स्वयंवर ८३ (विवाहसोहळा ११) (प्रसंग पंधरावा समाप्त)
llश्रीगणेशाय नमःll
llश्रीमुकुंदाय नमःll llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll
llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
सुंदर श्वेत वारुवर स्वार होऊन स्वये श्रीरंग, रंगण्या रुक्मिणी , रंगात निघाला, वरण्या भीमकीस त्याचं काय वर्णन करावं. श्रीकृष्णाच्या वारुपुढे अभिमान , द्वेष, मत्सर , दंभ, क्रोध, काम, मद स्वतः लोटांगण घालून अंगावरून अश्व जाऊ देत आहेत. कारण त्यांचं जगणं हे त्यातच आहे. अष्टसिद्धी , चतुर्वेद ज्याचे दास आहेत ज्यांनी त्याच्यावर चवऱ्या ढाळल्या आहेत, त्यांच्यापुढे षड्रिपुंची काय बात. म्हणून त्यांना भय निर्माण झालं. अश्या तर्हेने सर्व नकारात्मक गोष्टी प्रत्यक्ष वारुपुढे लोटांगण घेऊन नष्ट झाल्यात.
वाद्यांच्या गजरात वऱ्हाड विवाहस्थानी पोचलं आहे आणि श्रद्धा कीर्ती धृती आणि विरक्ती स्वागताला उभ्या आहेत. त्यांच्या स्वागताचा स्वीकार करून कृष्णनाथाचा वारू आत प्रवेश करता झाला. प्रत्यक्ष सुरवर सोहळा पाहण्यास उपस्थित झालेत. शुद्धमती आणि भीमक यांनी पुढे येऊन कृष्णाला वारुवरून उतरून विवाहाला येण्याची विनंती केली. ज्याचा स्वीकार करून, श्रीहरी खाली उतरले. शुद्धमतीने मनकर्णिका तीर्थाचे उदक घेऊन त्याने, कृष्ण चरण धुवून त्यांचे पूजन केले.
त्यावेळी तीर्थराज कदंब प्रकट होऊन विनवू लागले हे नारायण आम्हाला आपल्या तीर्थाचा मान द्यावा. नारायणाने होकार देताच ज्या उदकाने कृष्णचरण प्रोक्षले त्या स्थळी त्या उदकाचे तीर्थ तयार झाले, ज्याला आजही मुळमाधव क्षेत्री प्रभास प्रांतात कदंबतीर्थ नावाने ओळखतात. ज्याच्या स्नानाने आजही पापनाश होतो असा प्रत्यय येतो. त्यानंतर कृष्णाला एकवार आचमन करण्यास सांगून चंदनाचा टिळा लावून पुष्पमाळा अर्पिण्यात आल्या. बाहुभूषण , हस्तमुद्रा आणि पितांबर देऊन गौरवण्यात आलं.
कृष्णाला दही आणि मध मिश्रित पंचामृत अर्पण करताना भीमक म्हणाले प्रतिगृह्यतां . आता तुम्ही प्रतिगृह्यमी म्हणावं. तसेच जसे आपण गोकुळात चोरून दधी क्षीर प्राशन करत होतात, त्याचप्रमाणे आता सर्वांसमोर लज्जा त्यागून प्राशन करावे. यावर सर्व उपस्थित लोक हास्य करते झाले. परंतु कृष्णाने प्रतिगृहयामी का म्हणू याचे तत्वतः कारण विचारता, कृष्णस्वामी पुरोहित म्हणाले आम्ही दान देतो आहोत पण तो भाव आम्ही त्यागला आहे त्यामुळे याचा आपण स्वीकार केला आहे म्हणून प्रतिगृहयामी म्हणा. त्यानुसार कृष्णाने दधी व मधु यांचं आचमन केलं आणि प्रतिगृहयामी म्हटलं.
श्रीकृष्णाने आचमन करून समस्त भीमक कुळाचा उद्धार केला आहे असे पुरोहितांनी सांगताच कृष्ण नामाचा आणि राजा भीमकाच्या जयघोषाने सर्व मंडप दुमदुमला. यानंतर कृष्णाने पुन्हा उदक आचमन केले.राजा भीमक आणि राणी शुद्धमती यांनी कृष्णहस्त धुवून उपरण्याने स्वच्छ केले. कृष्णाच्या मार्गावर सर्वत्र पायघड्या घातल्या होत्या. ज्यावरून भीमकाने हाताला धरून कृष्णाला विवाहस्थानी नेले. भीमकी निजभावे गौरीहार पुजते आहे आणि इकडे कृष्ण अंतरपाटासमोर बोहल्यावर चढते झाले आहेत आणि पुरोहितांनी मंत्रोच्चारण सुरू केलं.
या ठिकाणी स्वयं श्रीहरी , जनार्दन स्वामी आणि नाथ महाराज यांच्या कृपेने पंचदश प्रसंग समाप्त होत आहे. पुढे प्रसंग षष्ठदश
क्रमशः
ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम् वंदे जगतगुरुं ll
© ® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
२५/०२/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment