श्रीरुक्मिणी स्वयंवर ६४
llश्रीगणेशाय नमःll
llश्रीमुकुंदाय नमःll llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll
llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
रथारुढ होत रुक्मिने सारथ्याला आज्ञा केली की,
" ज्या दिशेने हे येणारे सैनिक दिसत आहेत , ज्या दिशेने कृष्ण माझ्या बहिणीला घेऊन गेलाय , त्या दिशेला वायूवेगात रथ घेऊन चल"
सारथ्याने "जशी आज्ञा" असं म्हणून रथाला गती दिली. रुक्मिने एकवार सर्व दिशेने पाहिलं. सगळीकडे सैन्याचा महापूर दिसत होता. अश्व गज पायदल सर्व शस्त्रसज्ज होते. आज्ञा मिळताच चालू लागले. चतुरंग सैन्य एक अक्षौहिणी होतं. व्यासांनी महाभारतात सैन्य अश्व गज यांची एक अक्षौहिणी म्हणजे किती याची निश्चित संख्या दिली आहे. ती पुढीलप्रमाणे.
एक अक्षौहिणी म्हणजे दोन लक्ष अठरा सहस्त्र सातशे वीर. यात एकवीस सहस्त्र आठशे सत्तर रथ असतात , तितकेच गज हे चारही बाजूने घेरून मध्ये पायदल।असते. एक लक्ष नऊ सहस्त्र तीनशे पन्नास अश्व असतात. पासष्ट सहस्त्र सहाशे दहा पायदल या संख्येने असलेल्या सैन्यव्यवस्थेला एक अक्षौहिणी म्हणतात असे महर्षी व्यास यांनी महाभारतात व पुराणात लिहून ठेवले आहे.
आपले सैन्य त्वरेने घेऊन रुक्मि यादवसैन्यावर चालून गेला. इकडे गद हलधर आदी वीर जरासंधादी पळून गेलेल्या वीरांवर हास्यविनोद करत , परतण्याचा विचार करतच होते, इतक्यात त्यांनी लांबून मोठं सैन्यदल येताना पाहिलं आणि सर्व यादववीर , अश्व,रथ, गज आयुध अस्त्र शस्त्र घेऊन समोरून येणाऱ्या सैन्याला सामोरे जाण्यास सिद्ध झाले. दोन्ही सैन्ये एकमेकांना भिडली आणि मोठे रणकंदन सुरू झाले. रणांगणात जणू रणमद खवळला.
रुक्मिने आपल्या सैन्याला आदेश देत त्वेषाने लढण्याची आज्ञा केली. तो रथासह पुढे पुढे निघाला. अनेक वीर पुढे टाकत तो एकटाच पुढे आला आणि अचानक त्याची नजर यदुनाथ आणि रुक्मिणी , जे थोडसं दूर उभे होते त्यांच्याकडे गेली. आपल्या बहिणीसह कृष्णाला पाहून रुक्मीचं पित्त खवळलं आणि मागचा पुढचा विचार न करता त्याने रथ कृष्णाच्या रथाच्या रोखाने नेला.
कृष्ण बघून खवळलेल्या रुक्मिने त्वरेने धनुष्य काढले , त्यास तीर जोडून कृष्णाच्या रोखाने धरून कृष्णाकडे पाहून क्रोधाने वदला.
"हे कृष्णा मूळचा चोर तू. पूर्ण आयुष्य गोकुळात चोरी करण्यात घालवलेस माझी बहिण देखील चोरलीस. इंद्रादी देवांना दिलेले होम हवनातील हव्य देखील तूच चोरून घेतोस. सांगताना सांगतोस सर्व देवांना दिलेत की मलाच मिळेल पण असं न करता त्यांच्या वाटचे तूच खातोस आणि देव मात्र या समाधानात राहतात कि, तुला मिळाले म्हणजे त्यांना मिळाले. पण आता समोर हा रुक्मि उभा आहे. हे चौर्यकर्म माझ्याकडे चालणार नाही. तुला परास्त करून रुक्मिणीला घेऊन जाण्यासाठीच मी आलो आहे"
ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम् वंदे जगतगुरुं ll
© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
०५/०२/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment