श्रीरुक्मिणी स्वयंवर ६३
llश्रीगणेशाय नमःll
llश्रीमुकुंदाय नमःll llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll
llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
या सर्व परत निघालेल्या राजे रजवाडे यांना राजा भीमक आणि रुक्मि सामोरे गेले. राजा भीमकाने हात जोडून नम्रपणे म्हटले.
" आपण सर्वांनी वऱ्हाडी म्हणून येणे करूनसुद्धा कोणत्याही अवताणाशिवाय माझी कन्या रुक्मिणी हिला कृष्णाकडून सोडवून आणण्याचा प्रयत्न केलात. त्याबद्दल मी समस्त प्रजेतर्फे व राज्यातर्फे आपला कृपाभिलाशी आहे. या उपकारांची फेड मी जन्मोजन्मी करू शकणार नाही. आपल्याला या कार्यात येऊन, तद्नंतर झालेल्या त्रासाबद्दल मी अत्यंत खजील आहे. आपण मला क्षमा करावी ही माझी आपल्याला नम्र विनंती आहे."
जरासंध सर्वांच्या वतीने पुढे आला. त्याने राजा भीमकाचे हात हातात घेऊन त्यांना क्षमा न मागण्याची विनंती केली. "विदर्भ राज्याचा हितचिंतक म्हणून जे शक्य होतं तेच आम्ही केलं." इतकं बोलून तो रुक्मिकडे वळला. रुक्मि रागाने लाल झाला होता. जरासंध आणि इतर सर्व राजांनी कर्तव्यकार्य म्हणून जे केलं ते त्यांच्या जागी योग्यच होतं. पण जरासंध रुक्मिच्या जवळ येताच रुक्मि गरजला
" हे महाराज जरासंध त्या कृष्णाने माझी भगिनीच नव्हे तर या राज्याची इभ्रत पळवून नेली आहे. त्यामुळे आता ती इभ्रत परत मिळवणं हेच माझं इतिकर्तव्य आहे. ते साध्य करून कृष्णाला परास्त करून रुक्मिणीस परत आणत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही.
मी हे करू न शकल्यास ब्रम्हहत्येसारख्या घोर पापाचा मी धनी होवो. मी जर रणात कृष्णाला हरवलं नाही तर साधू निंदेचे घोर पातक मला लागुदे. विद्या मिळाल्यानंतर जर गर्व झाला तर गुरू निंदेचे पातक लागते. ते पापही मला लागो जर मी श्रीपतीला हरवू शकलो नाही. आपल्याच माता पित्यांना लाथा घातल्यावर पुत्रास जी जी पातके लागतात ती सर्व मला लागोत जर मी रणात कृष्णास हरवू शकलो नाही.
साधू सज्जन व संत यांच्यावर मिथ्या आरोप केले तर ते घोर पाप ठरते. ते पापदेखील मला लागो, जर मी कृष्णापुढे अपयशी ठरलो तर. आता जर मी कृष्णास न हरवण्यात आणि रुक्मिणीस न सोडवण्यात असमर्थ ठरलो तर मी या राज्यात परत येणार नाही. कौंडिण्यपुराला कधीही तोंड दाखवणार नाही."
इतके बोलून जरासंध आणि इतर राजाचा निरोप घेऊन पुन्हा वदता झाला.
" आता तुम्ही बघाच माझा पराक्रम.तो कृष्ण ज्याला अज्ञान आहे आणि बळजोरीने माझी भगिनी रुक्मिणी हिला राक्षस पद्धतीने पळवून नेऊन वरू इच्छितो, त्याची ही योजना मी यशस्वी होऊ देणार नाही. त्याला त्याच्या या प्रमादाचा योग्य तो दंड देईनच. तो कृष्ण स्वतःस खूप मोठा योद्धा समजतो पण अजून त्याचा या रुक्मिशी सामना झालेला नाही. म्हणून माझ्या शक्तीचा त्याला प्रत्यय द्यावाच लागेल"
इतके बोलून रागाने थरथरता कापणारा, दात ओठ खात खात जाणारा आणि क्रोधाने नासिकेतून उग्र ज्वाळा येत असलेला रुक्मि मदगर्वित अवस्थेत, त्वरेने कवच बांधून व तिरकमठा आदी आयुध घेऊन कृष्ण जिथे होता त्या ठिकाणी जाण्यासाठी रथारुढ झाला आणि सारथ्यास म्हणाला.
ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम् वंदे जगतगुरुं ll
© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
०४/०२/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment