भोग आणि ईश्वर ५३१ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
उत्शृंकलपणा हा वास्तविक मनाचा मर्यादा त्यागल्या नंतरचा अवगुण म्हणता येईल. पण अगदी तितकं टोकाचं नाही, तरी थोडफार मर्यादा उल्लंघन सर्वसामान्यपणे होतं. भले प्रमाण काही अंशापासून ते काही टक्क्यांपर्यंत असू शकेल. या सर्वात उत्तम पुरुष अर्थातच भगवान श्रीराम, ज्यांनी त्या त्या समयी, त्या त्या नात्याच्या मर्यादा जपल्या, सांभाळल्या. अगदी राजा होण्याआधी पती म्हणून असलेली जबाबदारी, रावण वध करून पाळली. पण राजा झाल्यावर, नातं बाजूला ठेवून, राजाचं सर्वात कठीण असं परम कर्तव्य पार पाडलं.
पण अश्या सर्वोच्च पातळीवर मर्यादा पाळणं अशक्य असलं तरी सर्वसाधारण व्यक्ती नक्कीच काही जबाबदाऱ्या पाळते. याला कारण मनावर असलेला अंकुश. हा अंकुश किती प्रमाणात असेल, त्यावर त्या व्यक्तीचं व्यक्तित्व ठरतं. म्हणजेच समाजात वावरताना एक प्रकारची मर्यादा नक्कीच पाळावी लागते. पण ती मर्यादा बंधन म्हणून न पाळता, व्यक्तीच्या विवेकाचा भाग असेल, तर व्यक्तित्व अधिक खुलून दिसतं. न पेक्षा ते ओझं होतं आणि असं जबरदस्ती मनावर लादून घेतलेलं वा लादण्यात आलेलं बंधन कधीतरी मन झुगारून देतं.
त्यावेळी त्या व्यक्तीचा खरा चेहरा समोर येतो. म्हणजेच अश्या व्यक्तींनी मनाला घातलेली बंधनं विवेक व विचार या पायावर आधारलेली नसतात, तर ती, सोय, वा लोढणं म्हणून व मनाविरुद्ध स्वीकारलेलं असतं.म्हणून कोणतीही गोष्टीची सवय, मन देह व बुद्धी यांना, लावण्याआधी, ती मनाला विचार व विवेक यांनी पटवून द्यावी किंवा घ्यावी. कारण एकदा का मनाला कोणतीही गोष्ट पटली की देह व बुद्धी त्याप्रमाणे, ते स्वीकारून, पूर्ण क्षमतेने कृती करू शकतात.
आता कोणतीही मर्यादा ही किती स्वीकारावी आणि कुठे तिला थोडी ढील द्यावी, हे त्या त्या प्रसंगावर अवलंबून आहे. म्हणजे ज्याप्रमाणे व्यक्ती स्वातंत्र्य हे प्रसंगावर अवलंबून आहे, त्याच प्रमाणे मनाला किती सूट द्यावी किंवा किती अमर्याद व्हावं, हे प्रत्येक प्रसंगी ठरतं. म्हणजेच व्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ मी रस्त्याने जाताना एखाद्याला विनाकारण कानाखाली मारणं असा होत नाही. त्यावेळी ते मर्यादा भंग होतं. किंवा एखाद्या कडून मार मिळत असताना किंवा हल्ला झाला असताना स्वसंरक्षणार्थ
एखाद्याला मारणं नक्कीच मर्यादा पाळणं समजलं जातं.
मनाला या सर्व गोष्टी ज्ञात असल्या पाहिजेत. त्यासाठी जाणीव किंवा जाणीवा प्रगल्भ असल्या पाहिजेत. मनाला अमर्याद वागण्याची सवय लागणार नाहीं. यासाठी मनाला विचार व विवेक यांनी बांध घातला पाहिजे. जेणेकरुन, मनाला प्रत्येक प्रसंगात, विचारपूर्वक वागण्याची व निर्णय घेण्याची सवय लागेल. अश्या मर्यादेत वागणाऱ्या व विवेकी असणाऱ्या व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात यशस्वीपणे पुढे जाऊ शकतात.
या मर्यादेत, विवेकाने विचारी असण्याचा अध्यात्मात किंवा आत्मिक विकासात कसा काय लाभ होतो, यावर उद्याच्या भागात चर्चा करूया. पण तोपर्यंत नामाने नियमांच्या मर्यादेत राहण्याचा प्रयत्न करुया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१५/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment