डोळ्यात तिच्या दिसती मजला स्वप्ने सुगंधी फुललेली
निशिगंधाच्या पानांवरती दवबिंदूंची झालर ओली
क्षण एक किनाऱ्यावरती येते क्षणात हातातून निसटते
लाट जशी वाळूवरती मग नक्षी जणू की कोरून जाते
अशीच अवघड वाट मनाला, प्रेमाची ही, मोहून गेली
डोळ्यात तुझ्या दिसती ......
दाट धुके, बघ मेघ उभे हे, आतुर झाले प्रीतिसाठी
उगाच डोळ्यांच्या कोनातून लाज बावरी भेटीसाठी
एकवार ये पुन्हा अशी तू घेऊन नयनी सांज अबोली
डोळ्यात तुझ्या दिसती ........
उगाच का ते अडते पाऊल धुंदी जरी मनी असे दाटली
कोमल किरणांच्या स्पर्शाने राधेसम थरथरते मुरली
कोडे सुटणे तिच्याच हाती माझे सारे ती घेऊन गेली
डोळ्यात तुझ्या
© कवी : प्रसन्न आठवले
०२/०८/२०१८
Comments
Post a Comment