आज संध्याकाळी येताना दिवा डोंबिवली दरम्यान लोकलमध्ये लिहिलेली सहज भाव कविता
ती मोहक संध्या आठवणींचा कैफ घेऊनि आली
जणू स्वप्ने सारी तिच्या पाऊली पैंजण वाजत आली
ती आली संध्या ........
त्या मोजक्याच भेटींची
ती किनार मनी जरतारी
त्या गवतावर बसलेली
ही प्रीत अबोल हसरी
त्या गूढ हसण्यामधला जणू अर्थ उलगडत आली
ती आली संध्या ......
लाटात पसरली नक्षी
सांगते निरोप ती अवखळ
वाटते तिलाच सांगावे
हृदयात उधळले वादळ
या हृदयातील तुझीच प्रतिमा स्मित घेऊनि आली
ती आली संध्या .....
इतकेच सांगणे मजला
जमणे न वाटते होई
तू जाण मुक्या डोळ्यात
स्वप्नांची दाटी होई
त्या सुखस्वप्नांना आपुल्या हाती सये घेऊनि आली
ती आली संध्या ......
© कवी : प्रसन्न आठवले
२०/११/२०१८
१९:५४
Comments
Post a Comment