श्रीराम श्रीकृष्ण संवाद १७
परंतु .......
सर्व उपस्थित देवी देवता श्रीकृष्णांकडे प्रश्न, कुतूहल आणि उत्सुकता या भावाने बघत होते. एक क्षण थांबून श्रीकृष्ण पुढे वदले.
परंतु या सर्वात एकच साधन आहे जे कोणत्याही युगात ईश्वराला सत्व रुपात भक्तांच्या हृदयात असलेले स्थान जागृत करून देते. त्याआधारे अन्य साधनांचा आटापिटा न करता देखील त्याचा लाभ मिळवून देते.
ते म्हणजे बसल्या जागी ईश्वराचं स्मरण करून त्याच्या नामाचा घोष करणं. ते शक्य नसेल तर जमेल त्या वाणीने त्या ईश्वराच्या नामाचा पाठ करणं त्याच्या स्मरणाला जपणं , म्हणजेच जप करणं. या साधनाचा महिमा अनंत काळापासून आहे. अनेक भक्तांनी याच मार्गाचा अवलंब करून आत्मोद्धार तर केलाच पण याच नाममहात्म्याचा प्रसार व प्रचार करून जनोद्धारदेखील घडवून आणला.
काळाच्या सर्व कसोट्यांवर सिद्ध झालेल आणि भक्ती शुद्ध व सिद्ध करणार हे साधन म्हणजे ईश्वराचा प्राण आहे. स्वतः ईश्वराला सर्वात प्रिय हे त्याचं नाम आहे. नाम अवतारकार्य सुरू असताना, त्याचप्रमाणे अवतार समाप्ती नन्तर देखील
ईश्वरी अंशाच अस्तित्व चिरंतन व चिरंजीव ठेवणार एकमेव साधन आहे.
निज स्थानापासून कित्येक योजने दूर असलेल्या ईश्वराचं अस्तित्व आपल्या सर्वात निकट म्हणजेच हृदयस्थानी स्थित करणार हे एकच सहजसाध्य साधन आहे. हे अनेक जन्माचं पातक एकाच जन्मात पुसून टाकण्याचं सामर्थ्य ठेवत. नव्हे तर नित्य केलेले प्रामाणिक नामस्मरण ईश्वरास तसं करण्यास भाग पाडतं.
या नामाचा सार्थ उपयोग जगतातील प्राणीमात्रांनी करून घ्यावा म्हणून अनेक संत महंत यांनी देह चंदनासम झिजवला आणि आपल्यासह अनेकांचे कल्याण साधले. म्हणून एका अर्थी हे साध्य व साधन दोन्ही. हे साधन नित्य , अविरत व दिर्घकाळ घेतल्यास एक सिद्ध साधक मंत्र होऊ शकते. इतके याच महात्म्य आहे.
या नाम साधनेने अनेक अप्राप्य गोष्टी प्राप्त होतात. हेच स्मरण निरपेक्ष बुद्धीने व भावाने घेतल्यास कर्मफलाचा नाश होऊन उद्धाराचा व आत्मोन्नतीचा मार्ग सुकर होतो. याचा लाभ मनुष्याने करून घेणे गरजेचं आहे. नामाचे महात्म्य हे अनेक जन्म कथन केले तरी संपणार नाही असेच आहे.
सरतेशेवटी इतकंच सांगीन की कलियुगात ईश्वरप्राप्ती तसेच कर्मफलत्यागाचा सर्वात उत्तम व उन्नत मार्ग कोणता असेल , तर त्याच एकच उत्तर म्हणजे नामस्मरण करणे वा नाम घेणे. नाम घेताना नामात इतके तद्रूप व्हावे की घेणारा साधक, नाम म्हणजे साधन व ईश्वर म्हणजे साध्य हे एकरूप व्हावेत. हीच नामसाधनेची खरी कसोटी आहे.
भाग१८ अंतिम
© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment