#काल्पनिककृष्णसुभद्राकथा
काल्पनिक कृष्ण सुभद्रा कथा १३
अर्जुनाने कृष्णाकडे स्मितवदन पाहिलं आणि कृष्णाला तो म्हणाला.
"यदुश्रेष्ठा तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे एकाच शब्दात देता येईल. सर्वोत्तम. माता कुंती स्वस्थ आणि कुशल आहेत. आम्ही सर्व पांडव तुझ्या सदीच्छेने अर्थातच सुखात आहेत. आणि द्रौपदी तुझ्या कृपाशीर्वादाने अंतर्यामी शांत आणि समाधानी आहे."
" अर्जुना मी कोण आशीर्वाद आणि इच्छा व्यक्त करणारा. माझ्या इच्छेने नव्हे तर हे सर्व तुमच्या कर्माने आणि त्या कर्माच्या फलाने अधिकाराने सर्व भोगीत व मिळवीत आहात. हेच सदैव ध्यानात असू दे."
" हे केशवा पण मला तातडीने बोलावण्यामागे काय प्रयोजन ते तरी सांग उलगडून"
" इतक्यातच काय घाई करतोस. आलाच आहेस तर आज संध्या प्रहरी मथुरेत दीपोत्सवाचा कार्यक्रम आहे. त्यात प्रमुख अतिथी म्हणून तुझा सहभाग असावा अशी आता मथुरेच्या जनमानसाची इच्छा असणार. ती पूर्ण होऊ दे. त्यानंतर विश्राम कर तदपश्चात आपण निश्चितच यावर चर्चा करू शकतो. अर्थातच तुला यात काही संकोच नसावा."
" कृष्णा तुला जनमानस इतक्यात कस समजलं. बाकी माझी काही हरकत नाही"
" तू ज्याक्षणी मथुरेच्या कक्षेत आलास त्यावेळी मला इथे समाचार मिळाला. "
" म्हणजे माझ्याही मागे तुझे गुप्तचर होते तर"
कृष्ण हसून म्हणाला
" अरे तुझ्या मागे नाही सख्या. मात्र तू आलास हा संदेश लगेच मिळावा इतकीच व्यवस्था केली मी. जेणेकरून तुला माझ्या समीप लगेच येशील वा तशी व्यवस्था मला करता येईल. बर तू येते समयी मुख्य मार्गावर असलेल्या श्रीविष्णू मंदिरात जाऊन आलाच असशील."
" अस असेल तर ठीकच. हो श्रीविष्णू मंदिरात जाऊन मगच येथे आलो. या मंदिरातील भव्य सभागृहात व आतील गर्भगृहात जाऊन आतल्या पवित्र सोज्वळ आणि सात्विक श्रीविष्णुमूर्तीच दर्शन घेऊन , काही काळ तिथे ध्यान लावून बसल की मन प्रसन्न व आत्मा शांत होतो. मधुसूदना मला तर कित्येक वेळा श्रीविष्णुमूर्तीकडे पाहताना अनेक वेळा तुझ्याकडेच पहात आहोत असाच भास होतो."
कृष्णाने स्मित केलं आणि उत्तरादाखल अर्जुनाला म्हणाला
" पार्था हा तुझा माझ्यावरील अति स्नेह आहे. कारण जे मनात असतं तेच जनात दिसतं, हे याबाबत तर नक्कीच सत्य आहे. म्हणूनच तुला माझाच भास त्या श्रीविष्णू मूर्तीत होतो."
कृष्णाच्या या कथनावर अर्जुनाने माधवाला नमस्कार केला आणि दोघेही हास्यात दंग होऊन गेले. इतक्यात प्रतिहारी, मथुरेच्या मुख्य प्रशासकांचा संदेश घेऊन त्यांचा संदेशवाहक आला आहे, हे सांगण्यास आला. कृष्ण अर्जुनाकडे पाहून त्या प्रतिहारीला म्हणाला
" आम्ही लवकरच त्या स्थळी येतो आहोत असा त्यांना आमच उत्तर पाठव. अर्जुना चल तू जरा तयार हो मी देखील काही क्षणात येतोच सुभद्रेला घेऊन. मग निघू आपण. प्रतिहारी आमचे सर्वांचे रथ तयार ठेवायला सांग. "
प्रतिहारी जशी आज्ञा महाराज अस म्हणून निघता झाला.
जय श्रीकृष्ण
क्रमशः
कथा संकल्पना : प्रसन्न आठवले
२३/११/२०१८
Comments
Post a Comment