सर चार्ल्स स्पेन्सर उर्फ चार्ली चॅप्लिन
सध्या fb वर चार्ली चॅप्लिनच्या क्लिप्स पाहायला मिळत आहेत. त्यातून लहानपण पुन्हा गवसल्याचा भास होत आहे. एक गोष्ट आता त्या फिल्म्स बघताना जाणवते की, प्रत्येक फिल्म मध्ये चार्ली कंगाल, भुकेला आणि दिवस दिवस अन्न न मिळालेला असा दिसत असून देखील सतत कोणाला ना कोणाला मदत करताना दिसतो.
कारुण्याच्या वास्तव्याला हास्याची झालर घालून त्याला विनोदाच्या नजाकतीत पेश करण्याची किमया अचूक साधलेला हा कर्मवीर खर तर अनेक पिढयांच्या खुशीची , हास्याची अमाप भेट लीलया देऊन गेलेला हा अलौकिक कलाकार, चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन.
त्याची प्रत्येक कलाकृती पाहताना त्याने काळाच्या पुढे केलेला विचार, त्यातील प्रत्येक अकॅशन ही जरी चित्रित असली तरी ती इतकी नैसर्गिक वाटते की, संपूर्ण चित्रपट आजसुद्धा समोर घडत आहे असाच भास होतो. अगदी जुना काळ असूनसुद्धा आणि चित्रीकरण श्वेत श्याम असून सुद्धा.
कदाचित याची ही गोडी अशीच रहावी म्हणून असेल कदाचित, पण त्यांनी चार्लीचे चित्रपट रंगीत केले नाहीयेत, अजूनतरी. म्हणजे निदान माझ्या तरी ऐकिवात नाही. त्याचा तो श्वेतश्याम पार्श्वभूमी असलेला पडदाच जीवनाचं वास्तव आणि उदासपणा ठळकपणे दर्शवतो आणि म्हणून त्या ठळकपणावर विनोदी प्रसंग जास्त खुलून दिसतात.
तो काळसुद्धा अमेरिकेत वा एकूणच युरोप व अमेरिकेत पहिल्या महायुद्धांनतरची मंदीचा होता आणि त्याच भावपूर्ण चित्रीकरण प्रत्येक चित्रपटात दिसत. अनेक कारणांमुळे विस्थापित झालेला चार्ली आणि त्याला प्रत्येक चित्रपटात त्याच्याइतकीच वा त्याहून असहाय्य तरुणी दिसते. हा तिला मदत करायला सर्व उचापत्या करतो अडकतो, पण सरतेशेवटी निघतो.
अजून एक बाब जी जाणवली ती म्हणजे, प्रत्येक फ्रेम ही विनोद वा कारुण्य समोर पेश करेल याचा फ्रेम बाय फ्रेम चार्लीने केलेला विचार. त्यानुसार केलेलं चित्रीकरण आणि अर्थातच तितकंच दर्जेदार संकलन. बाकी प्रत्येक चित्रपटातील हरेक पात्र आपला भाव जिवंत करत. याच एक मुख्य कारण मुकपट असल्यामुळे मुद्राभिनय वा शारीरिक हालचाली याद्वारे सर्व प्रेक्षकांपर्यन्त पोचवायच असल्यामुळे त्यात अभिनय १००% ओतावा लागत होता. पण एकाही फ्रेममध्ये हा अभिनय आहे असा भास देखील होत नाही. फक्त संवादांचा व विषयाचा दुवा मिळावा म्हणून मधेच एखादी पाटी येते.
अर्थात चार्लीच्या या मुकपटांचा इतका सखोल अभ्यास करायची गरज नाही. कारण चार्लीने चित्रपट त्यासाठी बनवले नाहीत. फक्त हसण्यासाठी, अगदी खळखळून हसण्यासाठी बनवलेत. त्यामुळे कोणतीही चिकित्सा न करता पहा आणि हसा.
© लेखक : प्रसन्न आठवले
२५/११/२०१८
१२:१५
Comments
Post a Comment