#काल्पनिककृष्णसुभद्राकथा
काल्पनिक कृष्ण सुभद्रा कथा ७
खरच आपण कृष्ण हृदयात बघतोय आणि कृष्ण चहूकडे आहे. जे हातात सापडलंय अस वाटत ते दिसण्याआधीच अवकाशाला गवसणी घालताना दिसावं आणि मग मनात जाणवत जे मी मुठीत आहे असं समजलो ते तर बुद्धीच्याही पलीकडे आहे. काहीशी अशीच स्थिती नारदांची झाली होती.
स्तिमित आणि स्तंभित अश्या मनःस्थितीत असलेल्या नारदाना मुरलीने भूल घातली. काही क्षण भान हरपलेल्या नारदांची स्थिती काहीशी अशी झाली असावी
तुज साठवण्या ओंजळ रिक्त केली
तू रिक्त हाती आलास वाटले मज
भान हरपले डोळे मिटूनी पाहिले
आकाशाच्या मुठीत तू दिसला मज
या मंत्रमुग्ध वातावरणातून स्वतःला सावरत नारद विचार करू लागले, कृष्णाने नक्की काय सांगितलं असेल. सुभद्रेच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल कृष्णाने काय योजना केली असेल हे जाणून घ्यायला आलो आणि हे काय आपणच हरवून गेलो. ही श्रीहरींची नेहमीची माया आहे. मूळ प्रश्नाला बगल देऊन आपण काय करतो आहोत हे कळू न देणं हा यांचा हातखंडा आहे. पण अस हरवून चालणार नाही. नक्कीच त्यांनी बोलण्यात काहीतरी गोवून सांगितलय.
पण एक गोष्ट उलगडत नाही. वासुदेवांनी जरासंध आणि राधा अशी दोन नाव का घेतली. यांचा सुभद्रेच्या माध्यमातून मी विचारावयास लावला त्याच उत्तर नाही ना यातून दिलं भगवंतानी. आता या दोन व्यक्तिमधून सर्वात आवडत कोण हे उत्तर तर खूप सहज आहे. अर्थातच एक सर्वात मोठा शत्रू आणि दुसरी व्यक्ती हृदयाच्या सर्वात जवळची राधा.
पण यातून उत्तर कस मिळेल. हे कोड कस उलगडेल. असा विचार नारद करत असतानाच कृष्ण मुरली वादन थांबवून तितक्याच मिश्किल भावाने नारदांकडे बघून जाण्यास निघतो. नारदांची भावावस्था काय बोलू आणि काय विचारू अशी दिगमूढ झाली आहे. याच अवस्थेत नारद कृष्णाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत आहेत. कृष्ण मुरलीशी खेळत खेळत पुढे पुढे निघून जातोय. अशी भारावलेली स्थिती नारदांची आहे .
भानावर आलेले नारद या प्रश्नात पुन्हा गुंतून पडले आहेत की, वासुदेव, देवी सुभद्रेच्या प्रश्नाचं दोन सप्ताहपश्चात काय उत्तर देणार. असो सध्यातरी हे उत्तर फक्त आणि फक्त मधुसूदनांच्या हृदयात आणि योजनेत आहे आणि इतकं होऊन सुद्धा देवर्षी नारद या योजनेचा काही माग काढण्याचा विचार सुरू करतात. काय योजना करावी जेणेकरून श्रीहरींनी काय ठरवलंय हे कस जाणून घ्यावं. या विचाराने नारद अंतर्धान पावतात.
कृष्ण शस्त्रशाळेत जाऊन बलरामदादाला नवीन आलेल्या शस्त्रांच्या तपासणीत मदत सुरू करतो. दादांचा शस्त्रांचा अभ्यास खरच कौतुकास्पद आहे. शस्त्रपरीक्षा करताना अनेक शस्त्रांच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा त्यांच्या ध्यानात येतात. ज्याचा उपयोग उत्तम शस्त्र निवडीच्या कामी येतो. म्हणूनच वासुदेव शस्त्रनिवड आणि शस्त्रपरीक्षेसाठी डोळे झाकून दादांवर विसंबून आहे आणि निर्धास्त सुद्धा.
जय श्रीकृष्ण
क्रमशः
कथा संकल्पना : प्रसन्न आठवले
१४/११/२०१८
Comments
Post a Comment