श्रीरुक्मिणी स्वयंवर ५
llश्रीगणेशाय नमःll
llश्रीमुकुंदाय नमःll llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll
आता नाथाना देखील काळजी वाटू लागली आणि त्यांनी निष्ठापूर्वक भगवंताचा धावा सुरू केला आणि काही क्षणात जगतपालक, महाविष्णुअवतारी, शंख चक्र गदाधारी पद्म पितांबर परिधान केलेले भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले.
नाथानी आणि विप्रवरानी प्रभूंच्या चरणांवर लोटांगण घातलं. भगवंतानी त्यांचे अश्रू पुसत दोघांनाही आपल्या जवळ घेतलं. अशक्यातलं शक्य होऊन समोर दृश्यमान स्वरूपात घडत होतं.
त्यावेळी नाथांच्या घरी उपस्थित असलेल्या लोकांच भाग्य थोर ज्यांना प्रत्यक्ष भगवंतांच दर्शन नाथांमुळे याची देही याची डोळा घडलं. भगवंतांना पाहून नाथ म्हणाले
"भगवंत आपण आमच्या घरी चाकरी केलीत आणि या पापाचे मला भागीदार केलेत. "
भगवन्त म्हणाले
" एकनाथ महाराज आपणच मला आपल्या चाकरीचा लाभ फार लाभू दिला नाहीत. या गोष्टीची खंत मात्र आहे मला."
नाथ आणि विप्रवर हात जोडून म्हणाले
" भगवंता पण आपल्याला श्रीखंड्याच्या रुपात बघण्याची इच्छा आहे. तेवढी इच्छा पुरवा."
हे दोघेही बोलले मात्र भगवंत त्वरित श्रीखंड्याच्या रुपात प्रकट झाले. आपल्या लाडक्या श्रीखंड्याला पाहून नाथाना आणि विप्रवराला अत्यानंद झाला. नाथ श्रीखंडयाना म्हणाले
" अरे श्रीखंड्या आलास बारा वर्षांपूर्वी तेंव्हा बटू होतास आणि आता तुझं लग्न करण्याचा घाट घालणार होतो आम्ही. ती संधी आमच्या हातून हिरावून घेतलीस."
भगवंत यावर बोलले
" लग्न, नाथ माझी अनेक लग्न झालीत अनेक जन्मात. जर करायचंच असेल तर माझ्या एखाद्या लग्नावर एखाद काव्य लिहा. जे वाचून अनेक पिढयांच कल्याण होईल."
एवढं बोलून भगवंत अंतर्धान पावले.
अस म्हणतात की भगवंताच्या आज्ञेवरून नाथानी श्रीरुक्मिणीस्वयंवर हा काव्यग्रंथ लिहिला. या काव्यरूप ग्रंथात नाथानी भक्तीरसाची, आत्मरूपाची सुरेख शब्दात मांडणी केली आहे. ज्याच्या पठणाने आणि चिंतनाने जन्मजन्मीचे दोष व पाप यातून मुक्ती मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे.
या सर्वांचा विचार करून पुढील भागापासून विस्ताराने नाथानी मांडलेलं श्रीरुक्मिणीस्वयंवर काव्य, गद्यरूपात व माझ्या शैलीत, माझे सद्गुरू श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि स्वतः श्रीएकनाथ महाराज यांच्या आशिर्वादाने सादर करण्याचा मनोदय आहे. यासर्व थोर व्यक्तींबरोबर वाचकांची सदिच्छा बरोबर असतील याची मला खात्री आहे.
त्यामुळे पुढील भागापासून आनंद घेऊया श्रीनाथमहाराज विरचित श्रीरुक्मिणीस्वयंवर.
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परामानंदम कृष्णम वंदे जगतगुरुं ll
ll श्रीएकनाथमहाराज की जय ll
© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणामस्तू ll
Comments
Post a Comment