श्रीरुक्मिणी स्वयंवर १
llश्रीगणेशाय नमःll
llश्रीमुकुंदाय नमःll llदेवी रुक्मिणी नमोनमः ll
संतश्रेष्ठ व जनार्दन स्वामी शिष्य श्री एकनाथ महाराज यांनी पुण्यकृपेने ज्या अमूल्य ग्रंथाची निर्मित केली, ती सुद्धा प्रत्यक्ष श्रीयोगेश्वराच्या आज्ञेवरून. त्या अद्भुत अश्या विषयाची ओढ एक लेखक व कवी म्हणून लागली नसती तरच नवल वाटलं असतं. अश्या चिरतरुण विषयावर लिहायला खर तर गुरूआज्ञा असावी लागते. पण आपल्या बुद्धीला मिळालेली सदवर्तनाची प्रेरणा हीच गुरूआज्ञा मानून आणि या कार्यात ते प्रत्यक्ष श्रीकृष्ण रुपात पाठीशी आहेतच , हे मनात योजून या विषयावर माझ्या अल्पमतीने लिहायला सुरुवात करतोय.
मुळात हा विषय इतका मनोवेधक आणि चित्ताकर्षक आहे की माझ्यातील कलाकार हा काही लिहिण्यास आतुर आहे. मूळ कथानक जसच्या तसं ठेवून विषयानुरूप त्याची गोडी वाढवण्याचा प्रयत्न करतोय. यात वाचकांच स्थान हे प्रत्यक्ष परमेश्वर स्वरूप आहे. कारण आपण केलेल्या लीलांचा आनंद जनरुपात येऊन पुन्हा पुन्हा घेण्यासाठीच जणू, अनेक जणांना या विषयावर लिहिण्याची प्रेरणा भगवंतानी दिली नसती. माझ्या माहितीनुसार स्वतः श्रीव्यास , श्रीनाथमहाराज, महानुभाव पंथीय कवी नरेंद्र यांनी ९०० ओव्याचा लिहिलेला अर्धा काव्यग्रंथ , सखारामतनय अर्थात साखरामसुत नावाच्या कवीनेही हा ग्रंथ काव्यरूपात लिहिला आहे.
अश्या या दिव्य विषयाची आणि वर नमूद केलेल्या ज्ञात व अज्ञात ग्रंथ , काव्य, व नाट्याच्या पार्श्वभूमीवर मी देखील माझ्या शक्ती व बुद्धीने या विषयावर लिहिण्याचा यत्न करणार आहे. यात जर काही उणे वा न्यून असेल तर तो माझ्या अल्पमतीचा भाग समजावा आणि जर भावण्यासारखे असेलच तर ती नाथमहाराज कृपा समजावी. विषयाला सुरवात करण्याआधी हे एवढं विस्ताराने लिहिण्याचं प्रयोजन एकच की, वाचताना हे सर्व ध्यानात ठेवून वाचावे.
भगवान श्रीकृष्ण ज्याची अत्युच्च कृपा प्रत्यक्ष श्रीनाथांवर इतकी अपार होती की, त्यांना श्रीखंड्याच्या रुपात बारा वर्षे राहून सेवा करण्याचा मोह आवरला नाही. अस मानतात की, जगतमाऊली संतश्रेष्ठ श्रीज्ञानोबा माऊली यांना त्यांच्या अल्प जीवनामुळे गुरुसेवेचा अलौकिक आनंद उपभोगता आला नाही. म्हणून त्यांनी पैठणात श्रीएकनाथ महाराज या रुपात जन्म घेऊन, श्रीजनार्दन स्वामींची अलौकिक , अपूर्व अशी सेवा करून कृपाप्रसाद प्राप्त केला होता.
मुख्य विषयाआधी इतकी प्रस्तावना लिहिल्यानंतर मुख्य विषय दुसऱ्या भागापासून सुरू करूयात.
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परामानंदम कृष्णम वंदे जगतगुरुं ll
ll श्रीएकनाथमहाराज की जय ll
© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणामस्तू ll
Comments
Post a Comment