भोग आणि ईश्वर ६०६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
भौतिक कारणं आणि त्याचे मनावर किंवा मानसिकतेवर होणारे परिणाम, हा स्वतंत्र विषय आहे. पण संक्षिप्त पणे विचार करताना,यामधे दोन प्रकार मुख्यतः होऊ शकतात एक म्हणजे आपल्या नियंत्रणाबाहेर असलेले भौतिक घटक आणि आपल्या अर्थात मानवी नियंत्रणात असलेले भौतिक घटक. यातील आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या घटकांवर आपण चिंतन व चर्चा करणं हे निरर्थक आहे. पण यामधे आपल्याला लक्षात घेण्या सारखी गोष्ट ही की, यातील सकारात्मक घटकांनी आपण जास्त वाहावत जाता कामा नये आणि नकारात्मक घटकांनी आपण निराश होता कामा नये.
याचं कारणच हे आहे की, या घटकांवर आपलं कोणतंही नियंत्रण नाही, अर्थातच आपण या घटकांशी जुळवून घेऊनच पुढे जाऊ शकतो.यामधे नैसर्गिक घटक, सामाजिक घटक, आर्थिक घटक, पारिवारिक घटक, राजकीय घटक असे अनेक भौतिक जगतातील घटक असू शकतात. या सर्वांचा एकत्रित आणि वेगवेगळा विचार केल्यावर लक्षात येईल की, मानसिकता घडायला या गोष्टी सकारात्मक असणं आपण इच्चेमध्ये आणू शकतो.
पण त्या इच्छेमागे आत्मशक्ती, इच्छाशक्ती याचं पाठबळ जोडून काही प्रमाणात आपल्याला सुसंगत परिणाम होतील किंवा होऊ शकतील, हे पाहिलं पाहिजे. उदाहरणार्थ, आर्थिक चणचण असणाऱ्या पडत्या काळात, आपण व्यक्तिगत व कौटुंबिक पातळीवर, आर्थिक नियोजन, गुंतवणूक इत्यादी करून, काही जबाबदाऱ्या नीट पार पाडू शकतो, जेणेकरून अश्या बाह्य कारणांचे परिणाम आपल्यावर फार होणार नाहीत आणि ते न झाल्यामुळे आपल्याला कमी मानसिक/ शारीरिक व आर्थिक नुकसान कमी सोसावे लागतील.
जे भौतिक घटक आपण नियंत्रित करू शकतो, त्यांच्या बाबत, आपण प्रथमपासून स्वतःवर सुनियोजित बंधन राहतील याची काळजी घेणं जरुरीचं आहे. या सर्वात आपल मानसिक संतुलन,राखण्यासाठी आपण नियमित मनाचे व्यायाम करणं गरजेचं आहे. मानसिक व्यायाम म्हणजे मनाला अती श्रमातून दर ठराविक काळानंतर स्वस्थता अर्थात शांतता मिळत राहील, हे पाहिलं पाहिजे.
मनाला एकाग्र करणं, हा यावरील उत्तम मार्ग आहे. यासाठी एकाग्रता प्राप्त करण्याचे विविध उपाय, नामस्मरण, ध्यान धारणा इत्यादी आचरणात आणून, मनाला नित्य स्वस्थ व सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रोजच्या ताणतणावात मनाचं आरोग्य हे टिकवून ठेवण्यासाठी मुद्दामहुन मनाला शांतता प्राप्त होत राहील हे बघितल पाहिजे. त्यासाठी नियमित प्राणायाम, आसनं करत राहून, मनाची शक्ती व ऊर्जा कायम राहील हे पाहिलं पाहिजे.
भौतिक कारणांवर चर्चा केल्यावर आता उद्या रासायनिक कारणांवर चिंतन करूया. पण तोपर्यंत आपण नामाने स्वास्थ्य व स्वस्थता लाभेल हे देखील पाहिलं पाहिजे.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता. त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२९/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment