भोग आणि ईश्वर ६११ (१डिसेंबर, २०२० पासून प्रतिदिन अखंड)
ईश्वर स्वतः त्याच्या नियमांनी बद्ध आहे, हे नक्कीच. तो त्या नियमांना बदलणार नाही आणि त्याविरुद्ध जाणार नाही हे देखील शतशः सत्य आहे. पण तरीही दयेचा सागर आणि करुणेचा अपार पर्वत असलेला ईश्वर, स्वतः नक्कीच काहीतरी व्यवस्था करण्यास, समर्थ आहेच. पण त्यासाठी तो ईश्वर काहीतरी ठोस व्यवस्था नक्कीच करणार, हे उघड आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे, आजपर्यंत त्याने ब्रम्हांडातील केलेली प्रत्येक निर्मिती ही एक उत्तम व्यवस्थेचं उदाहरण आहे.
म्हणूनच या गुंतागुंतीच्या ब्रम्हांड व्यवस्थेतून, सहजी बाहेर पडण्यासाठी, ज्ञान, सांख्ययोग, कर्मयोग इत्यादी अनेक योग असल्याचं, वेद, पुराणं, अवतार, ऋषी मुनी, साधु संत, महात्मे, यांच्या उदाहरणातून दाखवून दिल्यानंतर सुद्धा,त्याचं ईश्वराने मात्र दया आणि करुणेपोटी, आपल्या सारख्या सर्वसामान्य जनांना, एक इतका सोपा मार्ग घालून व सांगून दिला आहे की, त्या मार्गाचा अवलंब करण्याचं नुसतं ठरवलं तरी, त्या संकल्पाने सुद्धा तो ईश्वर हरखून जातो आणि त्या संकल्प करत्याच, हित, क्षेम, कुशल ईश्वर पाहतो.
नव्हे तसं वचनच त्याने स्वतः, अप्रत्यक्षपणे, अनेकदा, अनेक उदाहरणांनी आणि या भुलोकी स्वतः येऊन, अर्जुनाच्या माध्यमातून, दिलं आहे. त्या वाचनाचं महत्व म्हणजे आपण तीन प्रकारांनी, यावर मार्गक्रमण करू शकतो. एक म्हणजे त्या महाशक्तीला शरण जाऊन, अर्थात त्या शक्तीपुढे नतमस्तक होऊन, तिच्या चरणी लीन होऊन हे साधू शकतो. यामधे ही लीनता, ही शरणागत वृत्ती अखंड राखून मार्गस्थ होणं हे अभिप्रेत आहे.
दुसरा मार्ग म्हणजे स्मरण करून. अर्थात शरणागती ही यामधे अध्याहृत आहे. आपल्या नित्य कर्मात रत राहून, मात्र त्या परम दयाळू, जगत उद्धारक ईश्वराच्या मूळ स्वरूपाचं किंवा त्याच्या, ब्रम्हांडात प्रकट झालेल्या कोणत्याही रुपाचं स्मरण नित्य करत राहून, त्याच्या दयाळू अंतःकरणात, दयेचा ओलावा निर्माण करून, आपल्या या आणि पुढील अनेक जन्मातील गुंता सोडवून घेता येऊ शकेल.
इथे स्मरण करणे म्हणजे, संसाराच्या प्रपंचाच्या सागरात, त्याच्या कर्तृत्वाचे, उद्धारक स्वरूपाचे, आपल्याला झालेले विस्मरण संपून, विषयाचे, मायेचे, अज्ञानाचे, संभ्रमाचे, निर्माण झालेले मळभ, आच्छादन, अंमल, दूर होऊन, ज्ञानाचा अखंड प्रकाश प्राप्त व्हावा, यासाठी त्याची करुणा भाकणे.
या दोन मार्गांबद्दल जाणून घेतल्यानंतर, आपण तिसऱ्या मार्गाबद्दल, उद्याच्या भागात चिंतन करूया, पण प्रपंचाची चिंता सोडून आणि नामाचा हात धरून.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता. त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०३/०८/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment