भोग आणि ईश्वर ६१४ (१डिसेंबर, २०२० पासून प्रतिदिन अखंड)
आपल्याकडे एक म्हण आहे की दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. पण हे अध्यात्मात जास्त सत्य आहे. कारण सामान्यपणे देह, जो चर्मचक्षूना दिसतो, त्याच्या संदर्भात आपण सर्व भाव भावना किंवा एकूणच सर्व प्रपंच करतो. याचं कारणच आहे की, जे डोळ्यांना दिसतं, ते सत्य. याबाबत एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी की, बुद्धीला काही प्रमाणात आणि मनाला संपूर्णपणे, देहाच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टींचं ज्ञान, जाणीव, आकलन, अनुमान, अवलोकन होऊ शकतं.
अवलोकन यासाठी म्हटलं की, देहाच्या नेत्राप्रमाणे, मनाला आणि बुद्धीला, स्वतःचे नेत्र अर्थात चक्षु असतात, ज्यांना जाणीवा म्हटलं जातं. म्हणून मन, जर सक्षम किंवा शिक्षित असेल तर, या बुद्धीचे आणि मनाचे हे नेत्र उघडून चक्षुपलीकडील जग पाहू किंवा समजू शकतं. म्हणजे डोळे आणि कान यांच्या पलीकडे जग नक्कीच जाणता येतं. हे जरी सहजसाध्य नसलं, तरी बुद्धीला व मनाला त्याची सवय किंवा शिक्षण असावं लागतं का, किंवा असं शिक्षण घेऊन या गोष्टी आत्मसात करता येतात का.
यावर विचारपूर्वक चिंतन करतांना हे लक्षात येईल की, या गोष्टी किंवा ही देणगी, उपजत असावी लागते. म्हणजे ही कला किंवा ही उपलब्धी सर्वानाच साध्य नसते. काही जणांना दैवी देणगी म्हणून बुद्धी, मन यांच्या सहाय्याने, डोळ्यांना न दिसणाऱ्या, पण मनाला जाणवणाऱ्या अनेक गोष्टी समजू शकतात. म्हणजे ही एक प्रकारची शक्ती आहे, जी काही जणांना प्राप्त असते.
अश्या प्रकारच्या शक्तीला अतींद्रिय शक्ती किंवा intuition अथवा telepathy म्हणतात. ज्यायोगे मानवी देहाच्या पलीकडे असलेल्या अनेक गोष्टी किंवा कित्येकवेळा पुढे घडणाऱ्या घटना वा प्रसंग समजतात. अश्या प्रकारचे संकेत किंवा अतींद्रिय संदेश प्राप्त होऊ शकतात. पण ही दैवी देणगी आहे की, अध्यात्मिक, वाटचालीचा एक प्रगत टप्पा आहे, याचा विचार केल्यास, लक्षात येतं की, साधनेच्या मार्गात, ज्यावेळी एखाद्या जन्मात काही प्रगती होते, त्याचा काहीनाकाही लाभ, त्या आत्म्याला आणि मनाला प्राप्त होतो.
असा लाभ, आत्म्याच्या प्रगतीतील प्राप्ती किंवा उपलब्धी असणाऱ्या अनेक गोष्टी आत्मा आपल्या सोबत घेऊन पुढे जातो. मुळात, जरी त्या विशिष्ट जन्मातील, विशिष्ट देहाने, त्या टप्प्यापर्यंत जाण्यास सहाय्य केलेलं असलं, तरी त्याचा खरा हक्कदार हा आत्मा आणि त्यासोबत जाणारं मन असतं. कारण देहाला प्राप्त गोष्टी या देहा सोबत संपतात. पण कर्माचे भोग वा उपभोग, पुढील देहासाठी आत्मा घेऊन जातो.
याचं न्यायाने, मागील जन्मात, देह संपेपर्यंत, प्राप्त केलेलं ज्ञान, जाणीवांची प्रगती, मानसिक बौद्धिक आणि आत्मिक शुद्धी व विकास या गोष्टी आत्मा मनोमय कोषात घेऊन, पुढील देहाच्या व जन्माच्या प्रवासाला निघतो. ज्याप्रमाणे एखादा प्रवासी, प्रवासाला निघण्या पूर्वी, सोबत शिदोरी घेऊन निघतो. त्याच प्रमाणे आत्मा, देहाने प्राप्त केलेल्या कर्मबंधनासह अश्या अनेक गोष्टी सोबत घेऊनच पुढे जातो.
हा विषय एका भागात संपणारा नसल्यामळें, आपण हे चिंतन पुढील भागात सुरू ठेवूया. पण आमच्या मनाला नामाची लागलेली गोडी न सोडता.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता. त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०६/०८/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment