श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग १९
भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदाम् ।
तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम् ॥३६॥.
भवबीज. भव म्हणजे संसाररूप सागर, जन्ममृत्यूचा फेरा, कर्मबंधनाची शृंखला. बीज म्हणजे या सर्वांची निर्मिती करणारं बी. म्हणजेच सहा शत्रू काम, क्रोध,लोभ, मोह, मद आणि मत्सर. या प्रत्येकाची उपअंग वा उपप्रकार आहेत. जसे क्रोधातून इतर विकार, मद यातून अहंकार इत्यादी. या भवबीजांचं समूळ उच्चाटन करून आत्मोन्नती साधल्यास जन्ममृत्युच्या फेऱ्यातून सुटका होऊ शकते. त्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. जसे अष्टांगयोग याग, भक्ती, कर्म, ज्ञान इत्यादी नऊ मार्ग शास्त्राने सांगितले आहेत. ज्यांचा अवलंब करून प्राणी मोक्ष, मुक्तीच्या मार्गाकडे क्रमणा करू शकतो. हे सर्व एकप्रकारचे यज्ञ आहेत जे ह्या भवबीजांना जाळून वा ज्ञानाने दूर सारून मार्ग सुकर करतात.
अश्या अनेकविध मार्गपैकी एकाचा अवलंब करून भवबीजातून आपली सुटका करून घेता येईल. या सर्व मार्गानी भवाचं हे बीज नष्ट करता येऊ शकतं. भर्जन म्हणजे
उष्णतेच्या सहाय्याने पदार्थामधील अशुद्ध तत्व बाष्परूपाने बाहेर काढून पदार्थ शुद्ध करणे. असे हे भवबीज भर्जन करण्याचं काम अनेक जन्मजन्मांतरीच्या पुण्याईच्या आधारे वा त्या जोरावर मनुष्य साध्य करू शकतो आणि अंती मोक्षप्राप्तीच्या मार्गाला जाऊ शकतो. हेच अनेक जन्माचं कार्य भवबीज भर्जन करण्याचं काम रामनाम साध्य करतं. इतकं अलौकिक महत्व या रामनामाच्या जपाला, स्मरणाला, चिंतनाला आहे.
छत्तीसाव्या श्लोकातील वरील दोन परिच्छेद मुद्दाम उद्धृत केले, वाचनाला सातत्य येण्यासाठी.
अर्जन म्हणजे कमवणे संपादित करणे. इथे ऋषींवर सुख आणि संपदा असे दोन शब्द वापरत आहेत. संपदा हे भौतिक सुखाशी निगडित परिमाण वा शब्द म्हणता येऊ शकतो. संपदा म्हणजे फक्त ऐश्वर्य, वैभवच नव्हे तर ते कमावण्याची , मिळवण्याची साधनं. इंग्रजीत संपदाचा अर्थ रिसोर्सेस असा आहे. कदाचित तोच अर्थ श्रीबुधकौशिक ऋषींना देखील अभिप्रेत असावा.
कारण संपत्ती, ऐश्वर्य, वैभव हे चिरकाल टिकणारं नसतं. त्याला जशी आवक आहे तशीच जावक पण आहे, आय आहे तशी व्यय सुद्धा आहे, मिळकत आहे तसाच खर्च आहे. पण साधनं म्हणजे ते धन दौलत वा ऐश्वर्य कमावण्याचं साधन वा मार्ग हे जर प्राप्त झाले तर माणूस काळाच्या ओघात नष्ट झालेलं वैभव, संपत्ती, संपदा पुन्हा मिळवू शकतो. म्हणजेच अर्जनं संपदाम म्हणजे प्रत्यक्षात संपदा न मिळता ते कमावण्याचं साधन, मार्ग मिळणे.
सुख या शब्दाचा अर्थ जे प्राप्त झाल्याने मनाला आनंदाची अनुभूती मिळते आणि आत्म्यास शांती लाभते ते. ऐहिक सुख हे क्षणभंगुर आणि भवबंध वाढवणारे असते. जे सकृत दर्शनी सुख देणारे वाटले तरी अंती जन्ममृत्युच्या बंधनात बांधणारे आहे. ते जरुरीप्रमाणे मिळाले तरी कार्यभाग साधतो. पण भौतिक सुखापेक्षा आत्मिक उन्नती करणारे सुख हे श्रीबुधकौशिक ऋषींना अभिप्रेत आहे. म्हणजेच संपदा मिळवण्याचं साधन व ऐहिक सुख जरूरीपुरते पण पारमार्थिक सुख अमाप देणारे असे हे रामनाम आहे.
तर्जन म्हणजे दटावणे, दरडावणे, धमकावणे. यमदूत हे मृत्यू येणाऱ्या जीवाला परलोकी घेऊन जाण्यासाठी येतात, हे सनातन धर्मशास्त्र सांगतं. परंतु त्याची प्राण्याला अकारण , अवेळी भीती वाटून जीवाचे जगणे कठीण होऊन बसू शकते. मृत्यू हा ज्यासमयी यायचा त्यासमयी येणारच. परंतु तो येण्याआधी माणूस हा त्याच्या भीतीने अर्धा खचून जातो. अश्या अकारण वाटणाऱ्या भीतीला ऋषींनी यमदूत म्हटलं आहे. त्यामुळे रामनामाने ही अकारण भीती रहात नाही. मनुष्य कधीकाळी येणाऱ्या मृत्यूसाठी आताचा बहुमूल्य वेळ मानसिक भयगंडात वाया घालवणार नाही.
या अर्थाने तर्जनं यमदूतानाम. कारण भगवंत स्वतः कधीही कर्मानुसार येणाऱ्या जन्ममृत्युच्या साखळीत हस्तक्षेप करत नाहीत. म्हणून मृत्यू टळण्याच्या योगापेक्षाही त्याचं अकारण वाटणारं भय नक्कीच दूर होऊ शकतं. परंतु क्षीण जरी जीवनयोग असेल तर रामनामाच्या प्रभावाने तसा जीवनयोग प्राप्त होऊ शकतो. अर्थात ते व्यक्तीच्या कर्मानुसार ठरेल.
गर्जन म्हणजे दणाणून सोडणारा ध्वनी. रामनामाची शक्ती इतकी श्रेष्ठ आहे की, या श्लोकातून निर्माण होणारी कंपनं ही एखाद्या सिंह गर्जनेप्रमाणे आपल्या लक्ष्यावर वार करते वा त्या गर्जनेप्रमाणे आपले कार्य करते.म्हणजेच छत्तीसाव्या श्लोकांचा अर्थ असा की, रामनामाचा जाप केल्यानंतर त्या कंपनांचा ध्वनी गर्जना करत आपल्या लक्षप्राप्तिकडे जातो. त्यायोगे, भवाबीजाचा नायनाट होऊन मोक्षप्राप्तीचा मार्ग सुलभ होतो, त्यायोगे मनुष्य इहलोकी ऐश्वर्य प्राप्तीसाठी सक्षम होऊन असे धन वा ऐश्वर्य कमावतो जे अक्षय असेल, त्यायोगे मनुष्य परमसुखाची प्राप्ती करतो वा त्याची अनुभूती करतो, त्यायोगे अपमृत्यूचे भय व मृत्यूबद्दलचे अकारण आणि यावेळी वाटणारे भय नष्ट होते, अशी ऊर्जा, शक्ती रामनामाच्या जपाने प्राप्त होते.
श्रीराम जयराम जय जयराम !!! 🌷🙏🙏
भाग १९.....
© ® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
२९/१०/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment