श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग १३
संनद्ध: कवची खड्गी चापबाणधरो युवा ।
गच्छन्मनोरथोSस्माकं राम: पातु सलक्ष्मण: ॥२१॥
रामो दाशरथि: शूरो लक्ष्मणानुचरो बली ।
काकुत्स्थ: पुरुष: पूर्ण: कौसल्येयो रघुत्तम: ॥२२॥
वेदान्तवेद्यो यज्ञेश: पुराणपुरुषोत्तम: ।
जानकीवल्लभ: श्रीमानप्रमेय पराक्रम: ॥२३॥
इत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्त: श्रद्धयान्वित: ।
अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशय: ॥२४॥
रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससम् ।
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नर: ॥२५॥
आता इथे श्रीबुधकौशिक ऋषी श्रीराम यांच्या काही वैशिष्ट्यांची माहीती देत आहे. श्रीराम व लक्ष्मण कसे आहेत तर सतत तत्पर संनद्ध कवचधारी, खड्गधारी, चाप आणि बाण अर्थात धनुष्य आणि बाण घेऊन सुसज्जीत असलेले, युवा अवस्थेतील असे हे श्रीराम आणि यांसह लक्ष्मण हे सतत माझ्या मनोरथांच्या पुढे पुढे राहून माझं रक्षण करोत. मनोरथ म्हणजे मनाचा अश्व असलेला देहरूपी आत्म्याचा रथ. अर्थात मनातील इच्छांच्या पुढे उभे राहून ते माझ्या इच्छाचं रक्षण करोत. याचा एक अभिप्रेत असलेला अर्थ हा देखील आहे की मला त्या इच्छा येवोत ज्या प्रभूंनी पूर्तता करणं योग्य आहे. म्हणजे माझ्या इच्छा सात्विक असाव्यात, सीमित असाव्यात.
रामाची अनेक नामाभिधान दाशरथी, राम, शूरवीर, लक्ष्मण ज्यांचा दास आज्ञाकारी, अनुयायी आहे, बलवान, जे काकूस्थ अर्थात पुरंजय राजाच्या वंशातील आहेत, पुरुषोत्तम आहे, जे स्वयंपूर्ण आहेत, कौसल्यापुत्र आणि रघुकुलश्रेष्ठ आहेत. इथे एकूण दहा राम नामाभिधान सांगितली आहेत. म्हणजे एकप्रकारे हा दहा रामनामाचा श्लोक आहे असं म्हणायला हरकत नाही. पुढच्याच श्लोकात अजून सात नावं आहेत. बघूया.
वेदांतवेद्यो म्हणजे वेदांना अविद्य अर्थात वेदांना देखील ज्यांचं वर्णन करणं वा शब्दातसांगणं अशक्य आहे, असे. यज्ञेश म्हणजे सर्व यज्ञाचा स्वामी, स्वीकृतकर्ता, फल देणारा, पुराणपुरुषोत्तम म्हणजे पुराणात ज्या देवाचं वर्णन आहे त्यामुळे जो त्याही आधीचा आहे, जानकीचे वल्लभ अर्थात जानकीचे पती वा जानकीला सर्वात प्रिय असलेले, श्रीमान म्हणजे श्रीमान अर्थात जे चित्त वृत्ती यांनी श्रीमंत आहेत, अप्रमेय म्हणजेच ज्याची काहीही वा कशाशीही तुलना होऊ शकत नाही आणि पराक्रमी. अशी ही अजून सात नाव पुढील श्लोकात आली आहेत. म्हणजे एकूण सतरा नाव असलेले दोन श्लोक आहेत.
अश्या प्रकारे या, अर्थात इति एतानी याचा अर्थ म्हणून अश्या माझ्या विविध नावांनी युक्त माझ्या नामाचा जाप मदभक्त अर्थात माझे भक्त श्रद्धायुक्त अंतःकरणाने करतील त्यांना अश्वमेध यज्ञाहून अधिक पुण्य प्राप्त होईल यात कोणतीही शंका नाही. मदभक्तचा अजून एक अर्थ आहे नामाचा मद चढलेले किंवा नामात हरवून गेलेले भक्त.
दुर्वादलासम अर्थात मृदू वा मितभाषी. दुर्वा हे शीतलतेचं प्रतीक आहे म्हणजे शांत शीतल स्वभावाचे, श्यामवर्णी, कमलनयन पितांबर नेसलेल्या श्रीरामाच्या या अनेकानेक दिव्य परिणाम असलेल्या व प्रभावी अश्या नामानी त्यांची नित्य स्तुती जे करतील ते संसारी असूनही संसारी न गणले जाता पुण्यवान समजले वा गणले जातील.
श्रीराम जयराम जय जयराम !!! 🌷🙏🙏
भाग १३.....
© ® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
२३/१०/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment