श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग ७
जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः ।
स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥६॥
करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् ।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥७॥
आपल्या देहातील शीर, भालप्रदेश, दृष्टी, श्रुती, घ्राणेंद्रिय, मुख यांच्या रक्षणार्थ रामनामाची जपावली मनात योजल्यांनातर ऋषींवर पुढे सांगतात, आपल्या जीभेचं रक्षण विद्यानिधी स्वतः करोत. जिव्हेचा मुख्य उपयोग हा विद्याभ्यास करून त्याच्या प्रसारासाठी आहे वा असावा अशी शास्त्राची अपेक्षा आहे. म्हणून खूप ज्ञानीजन हे अत्यंत मार्मिक आणि गरजेचं बोलून जिव्हेचा सदुपयोग ज्ञान जतन करून त्याचा वापर करण्यासाठी करतात.
म्हणून हे मर्म या ठिकाणी श्रीबुधकौशिक ऋषी सांगतात की याच कारणासाठी आपल्या जिव्हेचा सदुपयोग करणाऱ्या जनांसाठी श्रीराम, जे स्वतः विद्येचा निधी अर्थात विद्येचे उगमस्थान आणि आश्रयदाते आहेत ते विद्यानिधी या रुपात करोत. इथे अजून एक बोध होतो प्रभूंच्या जीवनातील विद्यार्जनाचं पर्व संपलं असही यातून सुचवायचं असेल.
कंठ हा मुख्यतः स्वरयंत्र धारण केलेला भाग जिथून प्रभुनामाचा जाप यावा या अपेक्षेने ऋषींवर सांगतात की, भरताने ज्यांना सदैव वंदन केलं असे श्रीराम हे त्या कंठाचं रक्षण करोत. मुख्य मुद्दा हा की, कंठातील स्वरांचा उपयोग नामाचा जाप करण्यासाठी करा आणि त्यासाठी उत्तम उदाहरण हे भरताचं आहे. ज्याने जन्मापासून देहत्यागापर्यंत रामनाम सोडून दुसरं काहीही केलं नाही. ज्याला प्रत्यक्ष श्रीरामाची सावली मानलं जातं आणि ज्याच्या समान दर्जा हा प्रभूंनी फक्त हनुमंताला दिला. असा हा भरत आपला आदर्श असावा हा यातील मुख्य भाग ध्यानात घ्यावा.
वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात विद्या ग्रहण करताना अनेक दिव्य आयुध प्रभूंनी आत्मसात केली. त्याचप्रमाणे महर्षी विश्वामित्र यांच्या सह यज्ञ रक्षणार्थ गेल्यावर त्यांनी देखील प्रभूंना अनेक दिव्य आयुध दिली. असे हे दिव्य आयुध प्राप्त व ज्ञात असलेले श्रीराम माझ्या स्कंध म्हणजे खांदा या भागाचं रक्षण करोत. पूर्वीच्या काळात धनुष्य बाणाचा भाता व आताच्या काळात रायफल बंदुका ठेवण्यासाठी खांद्यांचा वापर होतो, युद्ध परिस्थितीचा विचार करता. त्यामुळे या अवयवाचं रक्षण दिव्य आयुधधारी श्रीराम करोत हा भाव योजून स्तोत्र पठणात पुढे जाऊया. अर्थातच अस रक्षण प्रभू सत्कृत्य करणाऱ्या आणि सद् रक्षणार्थ शस्त्र हाती घेतल्याचंच करतील हे नक्कीच.
माता सीतेच्या स्वयंवरातील एक पण असलेलं शिवधनुष्य जे उचलणं भल्या भल्या राजाना जमलं नाही ते शिवधनुष्य लीलया उचलून त्याला प्रत्यंचा लावताना ते भंगलं. हे ज्यांनी साधलं ते प्रभू श्रीराम माझ्या भुजाचं रक्षण करू दे. असे हे कार्मुक भंग करणारे प्रभू श्रीराम माझ्या बाहुना योग्यवेळी स्फुरण देऊन सन्मार्गी व सत्कार्य करण्याची प्रेरणा देवोत. इथे आता आपण या श्लोकांच्या माध्यमातून रामायणाच्या महत्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. कारण शिवधनुष्य भंग पावलं, राजा जनकाचं इप्सित साध्य झालं आणि मंगलमय मुहूर्तवेळी राजकुमारी सीतेने श्रीरामांना वरमाला घालून पती म्हणून स्वीकृत केलं. श्रीराम सितापती झाले.
अश्या या सितापती श्रीरामानी माझ्या करांचं रक्षण करावं जेणेकरून ते कर कोणतंही अनुचित कार्य करणार नाहीत आणि सदा दोन्ही कर प्रभूंच्या चरणी जोडले जातील. कर म्हणजे मनगटापासून पुढचा अंगुलीसह हाताचा भाग. सीता स्वयंवरात शिवधनुष्य भंग झाल्यानंतर, ही गोष्ट अंतर्ज्ञानाने जाणून, प्रत्यक्ष जमदग्नीपुत्र श्रीपरशुराम अर्थात जामगन्य, तिथे प्रकट झाले. तेसुद्धा श्रीमहाविष्णूंच उग्ररुप, शीघ्रकोपी.
परंतु त्यांचा राग शांत करून त्यांना आपल्या चतुर्भुज स्वरुपाचं दर्शन घडवून, आपल्या अवताराचं प्रकटीकरण प्रभूंनी केलं. ज्यामुळे शीघ्रकोपी श्रीपरशुराम यांचा राग शांत झाला आणि शुभाशीर्वाद देऊन ते अंतर्धान पावले. म्हणून प्रभूंना जामगन्यजीत संबोधलं जातं. असे हे जामदग्न्यजीत म्हणजेच शांतस्वरूप श्रीराम माझ्या हृदयी नित्य निवास करू देत. या हृदयमंदिरी त्यांची मूर्त विराजित राहूदे. शरीराच्या मध्यभागाचं संरक्षण खर आणि दूषण यांचा नायनाट करणारे प्रभू करोत.
खर आणि दूषण यांचा वध प्रभूंनी नाशिक येथे असताना केला. म्हणजेच कथासूत्र वनवासातील श्रीराम, या टप्प्यावर आलं आहे, असा याचा अर्थ होतो. सदर श्लोकाच्या दुसऱ्या वाक्यातील अर्धा भाग उद्या पाहूया.
श्रीराम जयराम जय जयराम !!! 🌷🙏🙏
भाग ७ .....
© ® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
१६/१०/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment