गोग्रासवाडी (डोंबिवली) १
जुनी डोंबिवली या माझ्या लेखमालेत आज माझं लहानपण जिथे गेलं त्या गोग्रासवाडीबद्दल
वयाची पहिली २० वर्ष जिथे काढली म्हणजेच लहानपणाच्या सर्व आठवणी जिथे दडलेल्या आहेत. ती वाडी म्हणजेच गोग्रासवाडी. त्यावेळी डोंबिवली बाहेर असलेली, निसर्ग सौन्दर्याने परिपूर्ण अशी वाडी म्हणजेच गोग्रासवाडी. जिथे एकेकाळी म्हणजे साधारण १९३६ मध्ये गोपालकृष्ण या प्रभातच्या बोलपटाच जवळ जवळ संपूर्ण चित्रीकरण झालं होतं (तिथल्या एका गोठ्यावर तसा संगमरवरी दगड त्यावेळी तरी होता. ज्यावर १९३६ मध्ये प्रभात चित्र मंदिराने चित्रीकरणाला जागा दिल्याबद्दल रु.२०००/- देणगी दिल्याचा उल्लेख होता) . जिथे पूर्वी मुंबईतून लोक हवापालटाला येत असत.
मुळात आज हे सर्व आठवण्याचं कारण, आजच संध्याकाळी गोग्रासवाडीतल्या शनीमंदिरात गेलो होतो. काही काळ तिथे मंदिराच्या पायरीवर बसलेलो असताना, गत काळाच्या आठवणी स्मृतिपटलावर फिरल्या आणि मन अचानक कित्येक वर्षे मागे गेलं.
जिथपासून मला आठवतंय तिथपर्यंत मागे गेलो. त्यावेळी संत नामदेव पथावर जिथे एक गेट वा कमान होती, तिथे साधारण गोग्रासवाडी सुरू व्हायची. तिथून आत आलं की दोन्ही बाजूला मोकळा भाग साधारण शेती असल्यासारखा पण त्यावर झाडी उगवली होती आणि दोन्ही बाजूला प्रत्येकी ४,५ झाड होती. त्यांनतर डाव्या हाताला राधानिवास ही चाळ. त्याच्यासमोर लोकमान्य गोग्रास भिक्षा संस्थेचा फलक असलेलं गेट. त्यातून आत गेल की उजव्या हाताला संस्थेची कचेरी आणि तिथेच त्यामागे असलेल्या एका घरात एक गुजराथी कुटुंब राहात असे. त्यावर संस्थेचा हॉल होता . ज्यामध्ये कधी कधी छोटे मोठे कार्यक्रम होत असत.
त्याकचेरीला लागूनच ३,४ घर असलेली छोटी चाळ होती. त्यात पहिल्या बिऱ्हाडात राजा जोशी हे गुरुजी म्हणजे पूजाअर्चा सांगणारे राहात होते. त्यांच्याच शेजारी एखाद्या बाबांसारखी दाढी, मिशी व डोक्यावर केस असलेले म्हातारेसे, म्हणजेच वय झालेले आणि संस्थेने नेमलेले व संस्थेच्या मंदिरात पूजा करणारे पुजारी राहात होते. हे उत्तरप्रदेशी होते.
इथून पुढे श्रीकृष्णाच मंदिर होत, म्हणजेच अजूनही आहेच. जिथे गायीचा गोठा होता. म्हणजे गोठा आणि मंदिर एकत्र होत असे म्हटल तरी चालेल. मंदिर बऱ्यापैकी मोठं होत. आत अंदाजे ७,८ गायी होत्या. २ मोठे आणि जुळे वाटतील असे बैल होते. त्यांची नावं केशव माधव होती. याच मंदिरात लहान असताना , खेळताना, शाळेतून येता जाता वा सहजसुद्धा अनेक वेळा गेलो आहे. त्या मंदिरात शिरतानाच गायींच्या शेणाचा एक सुंदर वास येत असे. सुंदर यासाठी की, मला स्वतःला हा वास कुठेही आला तरी, या मंदिराची आठवण जागी करतो.
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
३०/०७/२०१८
Comments
Post a Comment