ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास १०१
हे लक्ष्मणा एवढे सांगून आणि आपल्या पुत्र व परिवाराचे सांत्वन करून
राजा नृग तयार करण्यात आलेल्या गुहेत शाप भोगण्यासाठी प्रस्थान करता झाला. या कथनानंतर लक्ष्मणा तुला अजून काही ऐकायचे असेल तर अशीच एक रोचक कथा मी तुला सांगू इच्छितो. "यावर लक्ष्मण त्वरित उत्तर देता झाला.
"हे नरश्रेष्ठ राजा आता आपण ऐकवली ती कथा अद्भुत आहेच पण राजधर्माचे पालन राजाने न केल्यास काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण देखील आहे. म्हणून हे राजन मला अश्या धर्मोपदेशक कथा ऐकायला नक्की रुची येईल. किंबहुना अश्याच धर्मपरायण संस्कारी कथा कितीही ऐकल्या तरी मन भरत नाही. त्यामुळे अजून एखादी कथा आपण जर सांगणार असाल तर मला ती ऐकायला नक्कीच आवडेल. "
लक्ष्मणाचे हे बोल ऐकल्यावर प्रभू श्रीराम पुढे सांगू लागले.
"हे लक्ष्मणा आपलेच पूर्वज महान राजा ईक्षवाक, ज्यांच्या नावाने हा वंश सुरु आहे त्यांचा बारावा पुत्र ज्याचे नाव राजा निमी होते ते अत्यंत पराक्रमी आणि धर्मनिष्ठ होते. याच राजा निमी यांनी महान तपस्वी गौतम ऋषींच्या आश्रमाजवळ , देवलोकासम , किंबहुना त्याहून अद्भुत अशी वैजयंत नावाची एक नगरी वसवली होती. ज्या मध्ये महापराक्रमी राजा निमी यांनी वास करण्यास सुरवात केली. तिथे राहात असताना राजा निमी यांच्या मनात विचार आला कि, माझ्या पिताश्रीना प्रसन्न करण्यासाठी मी एक असा यज्ञ करिन जो अनेक वर्षांपर्यंत चालेल.
असा विचार मनात येताच राजा निमी याने आपले पिताश्री अर्थात महाराजा मनू यांचे पुत्र महाराज इक्षवाकु यांना त्याविषयी विचारणा केली. महाराज इकश्वाकु यांनी सहर्ष त्यास अनुमती दिली. पिताश्रींची अनुमती प्राप्त होताच राजा निमी यांनी सर्वप्रथम यज्ञासाठी कुलगुरू ब्रम्हर्षी वसिष्ठ यांना आमंत्रण पाठवले. हे लक्ष्मणा तदनंतर राजा निमी यांनी ऋषी अत्री , ऋषी अंगिरस आणि ऋषी तपोधन यांनाहि आमंत्रण दिले. या आमंत्रणावर ब्रम्हर्षी वसिष्ठ यांनी निमीला सांगितले कि,
"हे राजन तुझ्या आमंत्रणाआधी मला स्वर्गाधिपती इंद्र याचे आमंत्रण आले आहे आणि ते पूर्ण करून मी तुझ्या प्रासादी यज्ञ पार पाडण्यास येईन. "
एवढे बोलून ब्रम्हर्षी वसिष्ठ स्वर्ग लोकी इंद्रदेवाकडे यज्ञासाठी प्रस्थान करते झाले. ब्रम्हर्षी वसिष्ठ ऋषींच्या गमनानंतर गौतम ऋषींनी आपल्या अधिपत्याखाली यज्ञाची धुरा सांभाळण्याचा निर्णय घेतला. राजा निमी सर्व ऋषी आचार्य गण यांना सोबत घेऊन हिमालयाजवळ आपल्या नगराबाहेर एका पवित्र स्थानी यज्ञास प्रारंभ केला. जवळ जवळ पाच हजार वर्षे पर्यंत यज्ञ करत होते. पाच हजार वर्षांनंतर इंद्राकडचा यज्ञ पूर्ण करून ब्रम्हर्षी वसिष्ठ पुन्हा राजा निमिकडे परत आले आणि येऊन पाहिलं तर गौतम ऋषींनी यज्ञ संपन्न केला होता.
हे पहिले मात्र, ब्रम्हापुत्र ब्रम्हर्षी वसिष्ठ कोपायमान झाले आणि राजा निमीची प्रतीक्षा करू लागले. दुर्दैवाने राजा निमीला निद्रा येत असल्यामुळे राजा निमी निद्राधीन झाले. हे समजल्यावर क्रोधयुक्त ब्रम्हर्षी वशिष्टांनी राजा निमी याला शाप दिला कि तू माझ्या येण्याची प्रतीक्षा न पाहता यज्ञ पूर्ण केलास आणि आता मला न भेटताच तू निद्राधीन झालास, याकारणे मी तुला शाप देतो कि, तू शरीरहीन होशील अर्थात तू मृत्यू ला प्राप्त होशील."
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment