(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - ५०
श्रीब्रम्हदेव तथास्तु म्हणून अंतर्धान पावले.
इकडे नारदांनी त्वरेने गोकुळीं प्रस्थान केले आणि राधे समोर प्रकट झाले.
"नारायण नारायण. "
राधेने देवर्षी नारदाना चरणस्पर्श करून नमस्कार केला आणि म्हणाली
" हे महाराज आपण या दुःखी अभागी राधेला का भेटण्यास आला आहात. "
"राधे तू जितकी व्यथित आहेस, तितकाच किंबहुना जास्तच
व्याकुळ आणि आर्त मी आहे तुझं दुःख आणि तुझी श्रीकृष्णांप्रति भक्ती बघून."
" महाराज मी भक्ती विरह काही जाणत नाही. इतकंच जाणते की, मी इतकी पापी आहे की माझ्या भेटीसाठी माझं सर्वस्व असलेला कृष्ण, कान्हा येऊ शकत नाही. आपल्या आराध्याच साधं दर्शन सुद्धा प्रारब्धात असू नये, हा काय योग आहे माझ्या भाग्यात. कदाचित माझी अनेक वर्षांची पापं या जन्मी एकत्र जमून माझा छळ करण्यासाठी आपल्या सहस्त्र हातानी माझ्या कृष्णाला माझ्याकडे येण्यापासून , मला भेटण्यापासून अडवत असतील आणि त्यामुळे इच्छा असून सुद्धा कृष्ण माझ्या भेटीसाठी येऊ शकत नाही. त्याहून दुर्भाग्य हे की या विरहाच्या काळात कोणीही माझ्या मदतीला येऊ शकत नाही. अर्थात हे देखील सत्यच आहे की, जिला प्रत्यक्ष परंमेश्वर सहाय्य करू शकत नाही त्याची मदत कोण करेल."
" कृष्णप्रिये राधे, इतकी निराश नको होऊस. थोड धैर्य धर."
" आपण देखील मला कृष्णप्रिये म्हणून हिणवता आहात ना ? कारण जर खरच मी कृष्णाची प्रिय असते तर त्याने मला असं अव्हेरून , साधं दर्शन सुद्धा न देता निघून जाण्याचा यत्न केला नसता. "
" नाही राधे तू आता दुःखात आहेस म्हणून अस म्हणते आहेस. कारण तुझं स्थान थेट श्रीकृष्णांच्या हृदयात आहे. त्यामुळे तुझ्या प्रत्येक श्वासाचा माग आणि प्रत्येक हुंदक्यांची जाग, त्यांच्या काळजात जाणवते. कदाचित इथून गेल्यापासून कित्येक रात्री ते नीट निजले देखील नसतील. कार्यव्यस्तता हे तर जनांना सांगायला कारण आहे, वा आपले भाव लपवायला एक कारण. अन्यथा मधुसूदन तुला क्षणाचा एक अंश देखील विसरू शकत नाहीत. हे मर्म तू सुद्धा जाणतेस राधे आणि म्हणूनच मी तुला यथार्थ साद घातली, कृष्णप्रिये. श्रीकृष्णांना दोनच गोष्टी या जगात प्राणप्रिय आहेत एक मुरली आणि दुसरी राधा बावरी तू. म्हणून दोघांचं स्थान हृदयात आहे. "
"महाराज मुरली तर माझ्याहून प्रिय आहे कान्हाला. मी जाणते हे. "
" आता कशी छान बोललीस राधे. तुला असच पाहायचं होतं, सुंदर मनस्थितीत म्हणूनच मी आलोय खास तुला प्रसन्न करायला आणि तुझा मनोदय पूर्ण करायला."
नारदांच्या या वाक्याने अचानक राधेला मनोमन अतिशय आनंद झाला आणि त्याच हर्षात तिने देवर्षीना पुन्हा नमस्कार केला. राधा नारदाना म्हणाली
" महाराज आपण खरच मला माझ्या प्राणप्रिय कृष्णाची भेट घडवणार आहात. मी आपले हे उपकार अनंत जन्मांपर्यंत फेडू शकणार नाही. पण मी काय केल्याने कृष्ण मला भेटेल ते आपण मला कृपा करून सांगावे. मी आपल्या कथनानुसार करायला तयार आहे"
" तुला बाकी काहीही करायचं नाहीये. पण कृष्णाला तुला आर्ततेने, कळवळून, व्याकुळ होऊन साद घालायची आहे, अगदी अंतरातम्यातून. जेणेकरून ती थेट श्रीकृष्णांच्या हृदयात पोहोचेल."
" नक्की पोहोचेल ना महाराज माझी साद कृष्णापर्यंत"
" होय राधे भगवंत अत्यंत दयाळू आहेत. परंतु त्यांना हृदयातून कळवळून घातलेली साद नक्की पोहोचते. त्याकरता भाव भक्तिमय व प्रेमरूप, अंतःकरण पवित्र व निर्मळ आणि हेतू शुद्ध हवा. त्यांनतर कोणत्याही शारीरिक वा बाह्य परिस्थितीचा परिणाम न होता ती साद थेट भगवंताच्या अंतर्मनात पोहोचते. आपण तितक्या आर्ततेने विनवणी करत नाही आणि आंतरिक हेतू प्रामाणिक नसतो. त्यामुळे सर्वसामान्य जनांना याचा अनुभव येत नाही. तुझं तस नाहीये राधे. तू तर मुळातच कृष्णप्रिया आहेस आणि त्यातही विरहाने व्याकुळ आहेस. तेंव्हा तुझी साद तुझ्या आराध्यापर्यंत निश्चित पोहोचेल. त्याकरता माझे आशीर्वाद आणि सदिच्छा देखील तुझ्या पाठीशी आहेत."
"परंतु तद्नंतर काय महाराज"
"तद्नंतर, ऐक सांगतो"
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment