भोग आणि ईश्वर ५९४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करण्यात येईल.
मागेच सांगितल्याप्रमाणे, आपल्या मनातील प्रबळ इच्छा, आकांक्षा, आसक्ती आणि त्यातून घडणारी कर्म हे तीव्र लहरींचे स्त्रोत आहेत. त्यामुळे, त्यांना कधिनाकधी इच्छित स्थानी पोचून, आपलं लक्ष साधावं लागतं. त्यांच्याकडून ते घडवून घेण्यासाठी लागणारी ऊर्जा व शक्ती मनाची कार्यशक्ती, मनच त्या लहरिंमागे लावतं. म्हणूनच बरेचदा आपल्यालाच आश्चर्य वाटतं की, हे माझ्याकडून घडलं की, ब्रम्हांडाबाहेरील कोण्या शक्तीने करवून घेतले.
जरी एखाद्या शक्तीने असे कार्य केले असेल, हे काही प्रकरणात सत्य मानलं तरी, त्या शक्तीला आवाहन, आपणच आपल्या तीव्र इच्छाशक्तीने, केलं. ज्यामुळे विश्वात संचार करणारी, ती शक्ती जागृत होऊन, आपल्या कार्यार्थ, आपल्या प्रयत्नांना साथ देती झाली. यामागे सुद्धा एक विज्ञान आहे. जे विधात्याने हे जगत निर्माण करताना, घडवून आणलं. किंबहुना या जगताचा आधार फक्त आणि फक्त विज्ञानच आहे. बाकी चमत्कार वगैरे गोष्टी आपल्या त्रिमिती जगतातील, आपल्या तुटपुंज्या ज्ञानामुळे, आपल्याला समजलं नाही, म्हणून माहीत नसलेल्या कारणाला, आपणच तात्पुरतं दिलेलं नाम, म्हणजे चमत्कार हे आहे.
ज्यावेळी आपल्याला या बाह्य ब्रम्हांडातील अनेक गूढ व रहस्य मय गोष्टी ज्ञात होतील, त्यावेळी, या सर्व चमत्कारा मागे असलेली खरी तार्किक, तात्विक आणि वैज्ञानिक कारणं समजतील. याच प्रमाणे, मनाच्या बाबत, मनाच्या निर्मितीपासूनच, ईश्वराने त्यात अमर्याद शक्ती व ऊर्जा भरून ठेवली आहे. ज्यांना त्याचा प्रत्यय, अनुभूती व प्रचिती येते, त्यांना त्याचा सदुपयोग वा दुरुपयोग करण्याचं तंत्र अवगत होतं.
पण ज्यावेळी ही अमर्याद शक्ती, दुरव्यवहार, दुरुपयोग करण्या साठी वापरली जाते, त्यावेळी एका ठराविक पातळीपर्यंत किंवा काळापर्यंत , त्या व्यक्तींना त्यात यश येतं. पण पुन्हा कर्म सिद्धांतानुसार त्यांना, अधोगतीला प्राप्त व्हावच लागतं. पण मुळात अशी शक्ती ज्ञात होणं किंवा माहीत होणं, हीच खूप मोठी उपलब्धी आहे. मनाचं हे सामर्थ्य माहीत करून घेण्यासाठी, मनाला आधी शांत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
कारण संघर्षरत किंवा समस्याग्रस्त मनाच्या ऊर्जा व शक्ती, या विभागल्या जातात. ज्यामुळे त्यांचा योग्य प्रमाणात वापर होऊ शकत नाही. म्हणूनच आपलं लक्ष्य ठरवलं पाहिजे आणि त्या लक्षावर केंद्रित करता किंवा होता आलं पाहिजे. ज्याला इंग्रजीमध्ये focused म्हणतात ते. त्यामुळे मनाच्या ऊर्जा व शक्ती, या एकाच लक्षावर केंद्रित होऊन, त्याचा, विद्युत चुंबकीय आणि लेझर तंत्रासारखा वापर होतो.
यासाठी आपण आजूबाजूची अनेक focused वा लक्ष केंद्रित करून, यश प्राप्त केलेली, अनेक उदाहरणं घेऊन पडताळा अर्थात क्रॉस चेक करू शकतो. पण मुळात असं केंद्रित होण्यासाठी मनापुढे, एखादं ध्येय, लक्ष किंवा aim असणं अत्यंत आवश्यक आहे. जसं ध्यान करताना किंवा meditation करताना, मिटलेल्या किंवा उघड्या डोळ्यासमोर किंवा कानांना, काही लक्ष दिलं जातं. त्यामागचं मुख्य प्रयोजन, मनाला त्या लक्षाचा वेध लागणं, हे असतं. म्हणूनच मनाला असं लक्ष देऊन त्याला एकदा केंद्रित म्हणजे focus केलेल्यांना, थोडं यश ते अमाप यश, प्राप्त होऊ शकतं. हे मनाच्या केंद्रित होण्याच्या शक्तीवर अवलंबून आहे.
ज्यावेळी मनाला असं कोणतंही लक्ष नसतं, त्यावेळी मनाच्या ऊर्जा आणि शक्ती, या उपयोगात न येता, अर्थात non usable राहून, त्या चुकीच्या मार्गावर वळतात. ज्यामुळे, एखादी उपयुक्त व गुणवान व्यक्ती अनेक चुकीच्या गोष्टी करून, आपलंच भवितव्य पणाला लावू शकते. यासाठी मनाचं लक्ष केंद्रित होणं, किंवा तसं ते करणं आवश्यक आहे. ते कसं करावं, यावर उद्याच्या भागात, चर्चा करूया. तोपर्यंत, आपण नामाची मात्रा, रोज घेतच राहूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१७/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment